कस्तुरबा प्राथमिक शाळा गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही करा - NNL

 नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे


नांदेड|
नांदेड येथील कस्तुरबा प्राथमिक शाळा ताजनगर येथील एका शिक्षिकेचा राजीनामा दर्शवून इतर शिक्षकांची भरती करण्याचा प्रकार संस्थेने केला आहे. या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी उपशिक्षणाधिकारी डी.एस. मठपती यांना नेमून शाळेविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश नांदेड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी आज दिले.

शिक्षण समितीची सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेस ज्येष्ठ सदस्य व्यंकटराव पाटील गोजेगावकर, लक्ष्मणराव ठक्करवाड, साहेबराव धनगे, संध्याताई धोंडगे व अनुराधा पाटील यांची उपस्थिती होती. बैठकीचे प्रास्ताविक प्राथमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी केले. शाळा बांधकामाचा निधी व शालेय नियोजनाची माहिती त्यांनी दिली. यावेळी सर्व गटशिक्षणाधिकारी यांचा आढावा घेण्यात आला. आठवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या असून विद्यार्थी उपस्थिती, ऑनलाइन शिक्षक याबाबतची माहिती घेण्यात आली. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी जिल्ह्यातील आठवी ते बारावीच्या 603 शाळा सुरू झाल्याची माहिती दिली. सर्वच शिक्षकांना शंभर टक्के उपस्थित ठेवण्याची सूचना लक्ष्मणराव ठक्करवाड यांनी केली. साहेबराव धनगे यांनी त्यास अनुमोदन दिले.

शिक्षकांनी अपंगांचे बोगस प्रमाणपत्र लावून बदलीचा लाभ घेतला आहे. या प्रकरणी चौकशी करण्याबाबत वेळोवेळी सांगण्यात आले होते. अद्याप त्याची चौकशी झालेली नाही. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची सूचना सदस्यांनी केल्या. चौकशी समिती गठीत करण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. कोविड काळात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांची दखल घ्या. चांगले शैक्षणिक काम करणाऱ्यांना सन्मानित करा आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यावर भर देण्याचे आवाहनही शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले. सभेस क्रीडाधिकारी मारावार, पाठक उपशिक्षणाधिकारी डी. एस. मठपती, बंडू आमदूरकर, सर्व गट शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी