प्रधानमंत्री,मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवेदन
नांदेड। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा नांदेड शाखेच्या वतीने इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नू )च्या मार्फत चालविण्यात येतं असलेला ज्योतिषशास्त्र ह्या विषयावर बंदी घालावे या मागणीचे निवेदन प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले
महाराष्ट्रामध्ये इग्नू ( इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ) यांचा ज्योतिषशास्त्र हा विषय सुरू करू नये कारण महाराष्ट्राला संतांची आणि समाज सुधारकांची शेकडो वर्षाची परंपरा लाभलेली आहे. आपल्या भूमीचा बुद्धीच्या देशा असा उल्लेख केला जातो. संत चक्रधर स्वामी पासून ते थेट संत गाडगे महाराजांपर्यंत येथे प्रबोधनाची परंपरा आहे.तर दुसऱ्या बाजूला महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ते प्रबोधनकार ठाकरेपर्यंत समाज सुधारक येथे होऊन गेलेत त्यांची परंपरा चालू ठेवणे, हे प्रत्येक महाराष्ट्रातील सुज्ञ युवकाचे कर्तव्य आहे.
मात्र अशावेळी इग्नू तर्फे यंदाच्या वर्षापासून ज्योतिष शास्त्र या विषयात पदवी आणि पदविका हे अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.खगोल शास्त्रज्ञ ज्योतिषाला मान्यता देत नाहीत ज्योतिषाचा अभ्यासक्रम सुरू करणे म्हणजे लोकांना अंधश्रद्धेच्या दरीत लोटण्यासारखे आहे.
समाज विज्ञानाच्या दिशेने जाण्या ऐवजी अज्ञानाच्या दिशेने ढकलला जाईल हे थांबवण्यासाठी आपण इग्नू च्या ज्योतिष शास्त्र या अभ्यासक्रमाला मान्यता देऊ नये ही विनंती निवेदनातून निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी,नांदेडचे तहसीलदार किरण आंबेकर यांना केली आहे.
या निवेदनावर जिल्हा संघटक प्रा.इरवंत सुर्यकार,जिल्हा सचिव बालाजी गायकवाड,महिला संघटिका वर्षा गुंडले, शहर संघटक प्रा.देवीदास इंगळे,ईश्वर आडे,हनमंत कंदूरके, प्रा.नालंडे डी.आर.,सदस्या ज्योती ढवळे, कपिल धुतराज,अभिमन्यू गुंडले,सूर्यकांत गायकवाड, राजेश गोडबोले आदींच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर करण्यात आले.