नकोशीला फेकून देणाऱ्या मातापित्यावर कार्यवाही करा - सामाजिक कार्यकर्ता रामदास रामदिनवार
हिमायतनगर| एका मातेने ४ दिवसाच्या भ्रूणाला जन्म देताच मरण्याच्या उद्देशाने फेकून दिले आहे. हि घटना हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर ते विरसनी मध्ये असलेल्या नाल्याजवळ ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. यानंतर आता पोटच्या गोळ्याची वैरिणी कोण? याची चर्चा शहरात होत असून, ‘माता न तू वैरिणी’ या म्हणीची प्रचिती आजच्या या घटनेवरून होताना दिसते आहे.
हिमायतनगर तालुक्यात सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. नदी नाल्याला पूर वाहतो आहे, अश्यात ४ दिवसापूर्वी जन्मलेल्या एका नवजात चिमुकल्या (भ्रूण) बालिकेस मारण्यासाठी फेकून दिल्याची खळबळजनक घटना हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर - विरसनी रस्त्यावरील नाल्याजवळ उघडकीस आली आहे. हिमायतनगर शाहशल सामाजिक कार्यकर्ते रामदास रामदिनवार हे आपल्या मित्रासह कामानिमित्त माध्यमार्गाने जवळगावकडे दुपारी ४ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. दरम्यान यांची दुचाकी मौजे घारापुर - विरसनी येथील नदीकडे मिसाळांच्या नळाजवळ आली असता अचानक चिमुकल्या बालकाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी दुचाकी उभी करून आजूबाजूला पाहणी केली असता, नाल्याच्या कडेला एका (पिशवीत) थैलीमध्ये ४ दिवसाची अत्यन्त सुंदर (भ्रूण) बालिका आढळून आली. त्यांनी लागलीच पुढील गावाकडील काम सोडून देऊन चिमुकल्या बालिकेस घेऊन हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालय गाठले.
तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी श्री नाईक यांनी चिमुकल्या बालिकेची तपासणी केली असता ती सुखरूप आहे. बालिका कुणाही आहे हे माहित नाही, जोपर्यंत तपास लागत नाही. तोपर्यंत सदर बालिका नांदेड येथील शिशुकगृहात सुरक्षिततेच्या उद्देशाने पाठविली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आणि पोलिसांना चिमुकल्या बालिकेसंदर्भात कळविण्यात आल्याचे सांगितले. एकूणच ४ दिवसाची भ्रूण (बालिका) आढळून आल्यानंतर शहरांसह तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. ते बाळ जन्माला आल्यानंतर मारून टाकऱ्यांच्या उद्देशाने फेकून दिले असावे काय?, हे बाळ अनैतिक संबंधातून जन्मलेले असावे..? कुमारी मातेचे बाळ असावे..?, अन्यथा कुमारी मातेचा अवैध गर्भपात केला गेला असावा..? अश्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
या घटनेची माहिती मिळताच हिमायतनगरचे पोलिस तपास करीत घटनास्थळाकडे रवाना झाले असून, याबाबत पोलीस डायरीत पंचनाम्यानंतर नोंदणी घेतली जाणार आहे. आता उद्यापासून त्या बाळाच्या आईचा शोध लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. हे बाळ का फेकण्यात आले? याचा अद्याप उलगडा झालेला नाही. एकीकडे बेटी बचाव, बेटी पढाव असा नारा देऊन शासन जनजागृती करत असताना आज उघडकीस आलेली हि घटना अत्यंत निंदनीय आहे या घटनेचा तपास लवकरात लवकर लावून बालिकेच्या माता - पित्याचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता रामदास रामदिनवार यांनी केली आहे.