नांदेड| गत एक वर्षापासून कोरोना आजाराने थैमान घातलेले आहे. परंतु राज्यातील सर्वच बाजारपेठा उघडण्यात आल्या,ताळेबंदी शिथिल झाली अजूनही वारकऱ्यांची आषाढी पायी वारी खंडित होऊ नये यासाठी सक्षमरित्या काहीच निर्णय नाही.
संपूर्ण राज्यभरातून वेगवेगळ्या मार्गांनी वर्षानुवर्षे पायी दिंडी सोहळे चालतात,पायी दिंडी सोहळा प्रमुख,चालक,महाराज समवेत पायी वारी करणारे वारकरी सरकारच्या निर्णयाबद्दल तीव्र नाराज आहेत. वारकऱ्यांचे आराध्यदैवत श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिर बंद करणं म्हणजे हिन्दु धर्माची परंपरा खंडित करण्याचा प्रयत्न होय,मुख्यमंत्री म्हणून महापूजा करण्याचा नैतिक अधिकार त्यांना अजिबात नाही. प्रत्येक वारकरी हा पवित्र चंद्र भागेत स्नान करुन भक्त पुंडलिकाचे दर्शन घेऊनच पांडुरंगाचे दर्शन शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतूनच घेत असतो.
शासकीय विश्रामगृह येथे स्नान करुन महापूजेला जाणं हे मात्र वारकऱ्यांच्या नियमानुसार नाही, आदिगुरु शंकरा पासून चालत आलेली संतांची परंपरा,निस्वार्थपणे पायदळ पंढरपूर वारी करणारे वारकरी वर्षानुवर्षे ७००-८०० किलोमिटर चालत जाण्याची परंपरा जोपासत आलेत,पुढेही जोपासणारा वारकरी आहे,याचा गांभीर्याने शासनाने विचार करावा.
राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री महोदयांनी वारकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन गांभीर्याने परत विचार करावा! वारकऱ्यांना आषाढी पायी वारीला परवानगी मिळावी. यासाठी दि.२१ जून २०२१ सोमवार या दिनी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सर्व वारकरी संघटनांचे पदाधिकारी महाराज व जिल्ह्यातील पायी दिंडी सोहळा प्रमुख,चालक,महाराज मंडळीने एकदिवसीय भजनी आंदोलन सकाळी ११ वाजता करण्याचा निर्णय घेतलेला आहे,वारकऱ्यांच्या वारीला परवानगी दिली तरच महापुजेला महत्त्व आहे. असेही असंख्य वारकऱ्यांनी मत व्यक्त केले.
वारक-यांची आषाढी वारी खंडित होऊ नये म्हणून,प्रत्येक दिंडीच्या किमान ११ तरी वारकऱ्यांना परवानगी देण्यात यावी,हा राज्यभरातून होणारा पायी दिंडी पालखी सोहळा इतिहास परंपरा संशोधन इ.स.न. १५९४-२०१९ पर्यंत अविरतपणे चालत आलेला आहे,गत वर्षापासून खंड पडल्याने वारकऱ्यांच्या मनाला खंत लागली आहे. अशी प्रतिक्रिया सदाशिव पवळे चिखलीकर अध्यक्ष - पायी दिंडी पालखी सोहळा इतिहास परंपरा संशोधन केंद्र, नांदेड यांनी दिली.