सुट्टीतील गृहपाठासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक अॅप उपयुक्त वाटतात: सर्व्हे - NNL

७७% विद्यार्थ्यांना शंका आणि प्रश्नांचे निरसन करण्यासाठी शैक्षणिक अॅपची मदत झाली  



मुंबई| भारतातील बहुतांश भागात उन्हाळी सुट्या सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर शैक्षणिक प्रक्रियेवर तसेच सुटीतील गृहपाठ करण्यासाठी विद्यार्थ्यांना आलेल्या समस्यांवर प्रकाशझोत टाकण्यासाठी ब्रेनली या जगातील सर्वात मोठ्या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मने नुकतेच एक सर्वेक्षण केले. विद्यार्थी त्यांच्या शिक्षण प्रवासात मदत म्हणून शैक्षणिक अॅप्स आणि ऑनलाइन रिसोर्सचा वापर वाढवत असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

या सर्वेक्षणात १,७५८ विद्यार्थी सामील झाले होते. ७७% विद्यार्थ्यांनी सांगितले की सुट्टीतील गृहपाठाविषयी शंका आणि प्रश्नांचे निरसन करण्यासाठी त्यांना शैक्षणिक अॅपची खूप मदत झाली. त्यामुळे नव्या काळातील विद्यार्थ्यांच्या जीवनात अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म महत्त्वाची भूमिका बजावत आहेत, हेच यावरून अधोरेखित होते. कोणत्या विषयात जास्त मदत लागते, असे विचारल्यास एक तृतीयांश (३३%) विद्यार्थ्यांनी गणिताची निवड केली. त्यानंतर इंग्रजी (१७%) आणि विज्ञान (१५%) असे सांगितले गेले.

सर्वेक्षणात असेही आढळून आले की, विद्यार्थी त्यांच्या हॉलीडे होमवर्कमध्ये मदत घेण्यासाठी ब्रेनलीसारखे ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म (२८%) वापरत आहेत. माहितीच्या डिजिटल स्रोतांना विद्यार्थी जास्तीत जास्त प्राधान्य देत आहेत. याद्वारे भारतातील के-१२ शैक्षणिक स्थितीत मोठा बदल होतोय, हे दिसून येते. या परिवर्तनामुळे पारंपरिक स्टॅटिक, रोट-लर्निंग आधारीत पद्धतींऐवजी ज्ञान मिळवणे आणि देवाण-घेवाणीची प्रक्रिया ही अधिक वेगवान, प्रतिसाद देणारी आणि समाजाभिमूख झाली आहे.

बहुतांश (६७%) विद्यार्थ्यांनी मान्य केले की, हॉलीडे होमवर्क करताना त्यांनी एकत्रितपणे समवयस्करांची मदत घेतली. तर त्यापैकी ५८% विद्यार्थ्यांनी यासाठी त्यांच्या पालकांची मदत घेतली. प्रतिसाद दिलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी समवयस्कर, मित्र, आणि वर्गमित्रांसमोर कल्पना मांडणे किंवा त्यांच्यासोबत काम करणे पसंत केले. बौद्धिक प्रश्नांसाठी मित्रांची मदत घेण्यावरून असे दिसून येते की, तरुण विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेत अधिक स्वावलंबी आणि आत्मविश्वासू होत आहेत. डिजिटल कनेक्टिव्हिटी टूल्स आणि ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे अशा प्रकारचे सामूहिक काम होत असल्याने, त्यांच्या सहज उपलब्धतेमुळे शिक्षण प्रक्रियेत हा प्रवाह दिसून येत आहे.

महामारीच्या विविध प्रभावांमुळे, लोकांच्या मानसिक आणि आकलनक्षमतेवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊनदरम्यान हॉलीडे होमवर्क करणे खूप तणावपूर्ण होते, असे ७०% विद्यार्थ्यांनी मान्य केले. त्यांच्या समवयस्करांसोबत न राहता येणे, तसेच प्रत्यक्ष वर्गात न बसता येणे यासह महामारीमुळे आलेले विलगीकरण आणि तणाव या सर्वांमुळे अनेक संधींची कमतरता विद्यार्थ्यांना जाणवली. या सर्व घटकांमुळेही विद्यार्थ्यांनी आपल्यासारख्याच समस्या जाणवणाऱ्या समविचारी मित्रांसोबत संवाद साधण्यासाठी त्यांच्यासोबत डिजिटल पद्धतीने कनेक्ट होण्यास प्राधान्य दिले.

ब्रेनलीचे चीफ प्रॉडक्ट ऑफिसर, राजेश बिसाणी म्हणाले, “महामारीच्या उद्रेकानंतर, भारताच्या शालेय क्षेत्रात, उदयास येणारे प्रवाह अधोरेखित करण्याचा उद्देश या सर्वेक्षणामागे आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना अजूनही वर्गखोलीबाहेर शिक्षण घेण्यात अडथळे येत आहेत. एडटेकद्वारे त्यांना माहितीच्या विश्वसनीय स्रोतांची विस्तृत श्रेणीच उपलब्ध होते. घरात राहून शिक्षण घेताना वैयक्तिक गरजा आणि प्राधान्यांकरिता विद्यार्थी अधिक आत्मविश्वासाने लर्निंग प्लॅटफॉर्म वापरत आहेत. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना जास्तीत जास्त सुविधा पुरवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जेणेकरून जागतिक शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात तरुन जाण्यासाठी ते अधिक सक्षम होतील."

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी