हिमायतनगर| शहर परिसरात बुधवारी दुपारपासून धुवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ढगांचा कडकडाट विजांचा कडकडात सुरू झालेल्या पावसाच्या पाण्याने शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर घसरगुंडी निर्माण झाली आहे. यामुळे अनेक वाहनधारक घसरून पडत असून, अडचणीत आलेले नागरिक रस्ताचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या नावाने बोटे मोडत आहेत.
गेल्या चार महिन्यापासून तळपत्या उन्हामुळे आणि गरमीमुळे नागरिक हैराण झाले होते. मृग नक्षत्राच्या दिवशी रिमझिम पाऊस झाला. त्यांनतर बुधवारी दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या धुंवाधार मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, मुरवणे पाऊस झाल्यानंतरच शेतकरी पेरणीच्या मार्गाला लागणार आहे, यासाठी शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली असून, बी-बियाणे खरेदीसाठी झुंबड केल्याचे दिसून आले आहे. आज झालेल्या पावसाने परिसरातील नदी नाले ओढे वाहू लागले असून, विहिरी, बंद पडलेले बोरला पाणी आल्याने पिण्याच्या पाण्याची सोया झाली आहे. त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
मागील चार वर्षापासून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्यामुळे आणि संथ गतीने चालू असल्यामुळे नागरिकांना या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आनंद अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या शहरातून सुरु असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून ठेवण्यात आल्यामुळे या झालेल्या पावसामुळे सर्वत्र चिखलमय वातावरण निर्माण झाले आहे. या रस्त्याने जाताना दुचाकी तर सोडाच चार चाकी वाहनांना सुद्धा मोठ्या जिकरीने रस्ता पार करावा लागत आहे. आणखी जर मोठा पाऊस झाला तर किनवट - हिमायतनगर - भोकर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने वडगाव येथील घारगाव येथील नाल्यावरून नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे खैरगाव येथील नाल्याचा रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे चार तास वाहतूक थांबली होती तसेच सवना येथील पुराचे पाणी वाहू लागल्याने हा मार्गही बंद झाल्याने नागरिकांना घर गाठण्यासाठी 30 ते 40 किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागला होता.
आज दुपारी झालेल्या धुंवाधार पावसामुळे शहर परिसर नाल्यातील घाण थेट रस्त्यावर आली असून, सराफ लाईन, चौपाटी परिसर, उमर चौक ते परमेश्वर मंदिर कमान, लाकडोबा चौक, आंबेडकर चौक, बाजार चौक, बजरंग चौक, यासह इतर ठीक ठिकाणच्या चौकात नाल्याचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी रस्त्यावर आले होते. या पावसामुळे शहरात दुर्गंधी पसरली होती. नगरपंचायतीने याची दखल घेऊन शहरातील नाल्यावर आढकलेले पाणी वाहण्यासाठी वाट मोकळी करून द्यावी. अन्यथा शहरांमध्ये साथीचे आजार पसरून डेंग्यू, चिकनगुनिया, डायरिया, ताप, सर्दी खोखला आदींचे रुग्ण वाढण्याची भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे
हिमायतनगर शहर परिसरात सुरू झालेल्या पावसाने गेल्या चार महिन्यापासून अनेक नागरिक पाणीटंचाईचा सामना करत आहेत. पाण्याची पातळी वाढावी आणि उन्हाळाभर पाणी पुरावे त्यासाठी अनेक नागरिकांनी छतावरील पाण्याचे पुनर्भरण केले आहे. या पावसाचे पाणी त्या पुनर्भरणाच्या वाटेने विंधन विहिरी मध्ये जाऊन पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. अशाच पद्धतीने सर्वांनी पाण्याची पातळी वाढण्यासाठी आपल्या विहीर, बोअरचे पुनर्भरण करून घ्यायला हवे. तरच भविष्यात पाणी टंचाईच्या काटकटीपासून दूर राहता येईल.