नांदेड| प्रत्येकाचं जगणं वेगळेपण अधोरेखित करत असतं. आपल्या वाट्याला आलेले अनुभव शब्दबद्ध करून पुढच्या पिढीसाठी प्रवाहित करण्याचे काम आत्मचरित्र करीत असतात. मोतीराम राठोड यांच्या आत्मकथनात प्रांजळपणा आणि प्रामाणिकपणा आहे. प्रांजळपणे लिहिलेलं मराठीतलं हे पहिलं आत्मकथन आहे असे उद्गार ज्येष्ठ लेखक समीक्षक जगदीश कदम यांनी आज काढले.
विष्णुपुरी येथील ग्रामीण तंत्रनिकेतन संस्थेत मोतीराम राठोड लिखित आठवणींचं गाठोडं या आत्मचरित्राचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते .यावेळी त्यांनी समग्र आत्मकथनातील अनेक पैलूंचे दर्शन घडवलं .जे भोगले, अनुभवलं ते उत्कटपणे या आत्मकथनात मध्ये मांडलेलं आहे. स्वतःचा बडेजाव नाही किंवा कुठले अतिरेकी विचार नाहीत. शाहू-फुले-आंबेडकरी प्रेरणा आणि समतेचे विचार या सबंध आत्मकथनातून प्रकट होताना दिसतात. जीवनाविषयीची अवाजवी तक्रार नाही .तत्त्वनिष्ठ माणसाचे हे प्रामाणिक कथन आहे असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखक विजय वाकडे होते .
प्रारंभी प्रास्ताविक आत्मचरित्राचे लेखक मोतीराम राठोड यांनी केले. त्यांनी यावेळी पुस्तक लेखनामागची प्रेरणा आणि पुस्तक लेखन करताना आलेल्या अनुभवांचे विश्लेषण केले. मंचावर राज्याचे पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, पूर्व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे, प्राचार्य वसंत बिरादार ,पूर्व शिक्षण अधिकारी शिवाजी खुडे, तंत्रनिकेतन चे प्राचार्य विजय पवार, संगत प्रकाशनचे संजय सुरनर आदींची प्रमुख उपस्थिती होती .
पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी या आत्मकथनाचे स्वागत केलं. या आत्मकथनात समग्र जीवनातील अनुभवांची सलगपणे मांडणी केली असून हे अनुभव अत्यंत प्रगल्भ आहेत. अशा पद्धतीचे प्रवाही लेखन पुढील पिढ्यांना मार्गदर्शन ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले .अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी कपाळे यांनी त्यांच्या जीवनातील शैक्षणिक अनुभव सांगत मोतीराम राठोड यांचा आत्मचरित्र शिक्षकांना दिशादर्शक असल्याचे सांगितले.
कवी विजय वाकडे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना विद्यापीठांनी लेखकांची दखल घेतली पाहिजे आणि अवतीभवती लेखन करणाऱ्या लेखकांना शोधून त्यांचे साहित्य विद्यापीठीय अभ्यासक्रमात समाविष्ट केले पाहिजे असे मत व्यक्त केले .कार्यक्रमास संगीता अवचार डॉ.विलास ढवळे यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार डॉ. मारुती कसाब यांनी मानले.