विनापरवाना जप्त साठ्याची रेती चोरणाऱ्यावरील कार्यवाही थंडबस्त्यात -NNL

कार्यवाही झाली नाहीतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची भेट घेणार - देवसरकर 



हिमायतनगर,अनिल नाईकपैनगंगा नदिच्या काठावर असलेल्या दिघी येथे महसुलने जप्त केलेली रेती गावातील काही प्रमुखाच्या साक्षीने उचलून विक्री केली जात आहे. या प्रकरणी सबंधितांवर कार्यवाही करावी अन्यथा अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा देऊनही कोणतंही कार्यवाही झाली नसल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. त्यानंतर तहसीलदारनी ठेकेदारावर फौजदारी कार्यवाही करण्याचे दिलेल्या लेखी अश्वासनाने आंदोलन मागे घेतले. मात्र यातून सरपंचाला सपशेल बाहेर काढण्याचा प्रयत्न झाला आहे. कार्यवाहीच्या आश्वासनाला तीन दिवस लोटूनही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्ष युवा तालुका प्रमुख विद्यानंद देवसरकर यांनी केला. तसेच रेतीचोरून नेणारे सरपंच व गुत्तेदारावर कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची लवकरच भेट घेऊन मागणी करू, यावरही काही झालेनाहीतर तीव्र आंदोलन केले जाईल असे त्यांनी सांगितले आहे.


यापूर्वी दिघी येथील ट्रॅक्टरने हिमायतनगर शहरातील रुख्मिनी नगर भागात रेती विनापरवाना आणून टाकण्यात आली. त्यामुळे मागील महिन्याच्या 13,14, 15 तारखेच्या रात्रीच्या सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या वाहनांच्या चालक व मालकावर कार्यवाही करावी अशी मागणी शिवसैनिक राम गुंडेकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देऊन केली होती. त्याची चौकशी गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. त्यांनतर वटफळी, कामारवाडी येथील कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयास कुलूप लावण्याचा इशारा दिला होता. यावेळीही तहसीलदारांनी लेखी आश्वासन देऊनही हालचाली केल्या असल्याचे दिसत नाही. त्यामुळे हिमायतनगर शहरासह तालुक्यात राजरोसपणे रेतीची वाहतूक करून जादा दराने विक्री केली जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रेतीची साठेबाजी करण्यात आल्याचे स्पष्ट होते आहे.


दि.२४ रोजी दिघी येथून जप्त केलेली रेतीची चोरी करून रस्ता कामासाठी वापरली जात आहे. महसूलने स्थानिक सरपंचाच्या ताब्यात दिलेल्या रेतीची चोरी करणाऱ्या दोन्ही दोषींवर कार्यवाही करा या मागणीसाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन केलं. वाळू माफिया विरोधात आंदोलन सुरू असताना जप्त करण्यात आलेली रेती घरकुल लाभार्थींना मोफत वाटप करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी तहसीलदारांनी आंदोलनाची दखल घेऊन तासाभरात तहसीलदार डी.एन. गायकवाड यांनी कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर अर्धनग्न आंदोलन मागे घेण्यात आले.


तहसीलदार हिमायतनगर यांनी दि.२३ रोजी काढलेल्या आदेश पत्रात म्हंटले आहे कि, दिघी येथे जप्त करण्यात आलेल्या ४१ ब्रास रेती साठी पोलीस पाटील विलास कदम यांच्या ताब्यात देण्यात आला होता. त्या साठ्यातील वाळू सरपंच गायकवाड ,सुनील वानखेडे यांनी गावात सुरु असलेल्या सीसी रस्त्याच्या कामात वापरण्यासाठी दि.२० जून रोजी विनापरवाना वाळू उचलून नेली .त्यामुळे संबंधितांवर कार्यवाही करावी असे पोलीस पाटलांनी कळविले होते. त्यावरून जवळगाव सज्जाचे तलाठी याना सुनील वानखेडे यांचेवर फौजदारी कार्यवाही करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे. तसेच हिमायतनगर पोलिसांना सुद्धा कळवून FIR ची कॉपी कार्यालयास सादर करण्याचे बाबत निर्देश दिले असल्याचे पत्रात म्हंटले आहे. मात्र या नांतर देखील महसूलच्या लोकांनी पळवाटा काढत सरपंचावर कार्यवाही होऊ नये म्हणून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी