२३ जुलै रोजी नागपूरमध्ये वितरण
नागपूर| आदिवासींच्या आरोग्यावर किनवट येथे काम करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अशोक बेलखोडे यांना या वर्षीचा ‘डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण २३ जुलै २०२१ रोजी नागपूर येथे केले जाणार असल्याची माहिती सी.मो.झाडे फाऊंडेशनचे विश्वस्त नारायण समर्थ यांनी दिली. फाऊंडेशनतर्फे नागपूर येथे चालविण्यात येणाऱ्या श्री. सत्यनारायण नुवाल गुरुकुल व्यसनमुक्ती केंद्रातर्फे देशात सर्वोत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. १ लक्ष रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ. गिरीश गांधी राष्ट्रीय सामाजिक कार्य पुरस्काराची सुरुवात २०१३ मध्ये करण्यात आली असून दिल्लीचे ज्येष्ठ गांधीवादी डॉ. एस. एन. सुब्बाराव, पुण्याचे ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी, दिल्लीचे कर्मयोगी रवी कालरा, धारणी मेळघाटचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे, गुवाहाटीच्या अर्थतज्ज्ञ डॉ. अलका सरमा, सरहदचे संस्थापक संजय नहार, गडचिरोलीतील कुरखेडा येथे आदिवासींसाठी काम करणारे डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख या दाम्पत्यास हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. अशोक बेलखोडे यांनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेने नांदेड जिल्ह्यातील आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यात साने गुरुजी रुग्णालयाची स्थापना केली आहे. भारत जोडो युवा अकादमीच्या माध्यमातून हा प्रकल्प चालविण्यात येतो. रुग्णसेवा आणि आदिवासींच्या सामाजिक पुनर्वसनासाठी डॉ. बेलखोडे गेले तीन दशके समर्पित भावनेने कार्य करीत आहेत.