नांदेड (अनिल मादसवार) ग्रंथ हेच माणसाचे खरे मार्गदर्शक आणि गुरु असून ग्रंथ हे माणसाला संकटावर मात करण्याची शक्ती देतात तसेच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जगाविषयीचे अमाप ज्ञान माणसासमोर ठेवतात, असे प्रतिपादन नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय, नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह शेजारी आयोजित "नांदेड ग्रंथोत्सव -2017" चे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव हे होते तर महापौर शीलाताई भवरे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापिठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. केशव सखाराम देशमुख, जेष्ठ साहित्यीक डॉ. हंसराज वैद्य, सहाय्य्क ग्रंथालय संचालक अ. मा. गाडेकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आ. गंगाधर पटने, डॉ. श्याम तेलंग, किशोर भवरे, भुजंग पाटील, बळवंत जोशी, बी. जी. देशमुख, निर्मलकुमार सुर्यवंशी, नि. म. वडगावकर, राजेंद्र हंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे आ.पाटील म्हणाले की, मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा असल्या तरी ग्रंथवाचन ही एक चौथी मुलभूत गरज आहे. यातून माणसाला जीवनासंबंधी दिशादर्शन होते. ताणतणावाच्या परिस्थितीत माणसामध्ये रागाचे प्रमाण खुपच वाढले असून ग्रंथ माणसाला शांत राहण्यास मदत करतात. इंटरनेटमुळे अनेक विषयांची माहिती सहज मिळत असली तरी पुस्तके वाचण्याची आवड सर्वांनी निर्माण करणे गरजेचे आहे. नांदेड ग्रंथोत्सव हा वाचनावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींचा एकत्र येण्याचा आनंद सोहळा आहे. नांदेड जिल्हा ग्रंथालय कार्यालय हे खऱ्या अर्थाने ग्रंथाचा प्रचार, प्रसार व वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी तळमळीने झटत असल्याबद्दल आमदार श्री. पाटील यांनी कार्यालयाचे अभिनंदन केले.
अध्यक्षस्थानावरुन डॉ. प्रभाकर देव म्हणाले, वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी सर्वांनी नियमित वाचन करण्यासोबत आपल्या भागातील इतिहासाची माहिती ठेवणे हे देखील उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी महापौर शीलाताई भवरे यांनी नांदेड महापालिकेचे ग्रंथालय व ग्रंथ प्रचाराच्या कामात विशेष लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. तेलंग, डॉ. देशमुख, ॲड. गंगाधर पटने, डॅा. हंसराज वैद्य, अशोक गाडेकर यांनी आपल्या मनोगतात ग्रंथाचे महत्व सांगून नांदेड ग्रंथोत्सव उपक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविकात जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांनी वाचकाला चांगल्या पुस्तकांची खरेदी एकाच ठिकाणी करता यावी, ग्रंथाचा प्रचार, प्रसार करुन वाचक व प्रकाशकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न "नांदेड ग्रंथोत्सव" मध्ये करण्यात आला आहे. नांदेड ग्रंथोत्सवात चांगले ग्रंथ खरेदीसह विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
सुरुवातीस भव्य ग्रंथदिंडीचे शहरातील मुख्य रस्त्यावरुन आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथदिंडीत बंजारा नृत्य पथक, भजनी मंडळ, लेझीम पथक, वासुदेव गोंधळी, पारंपारिक वेशभुषेतील विविध कलाकार, विद्यार्थी, स्काऊट गाईड यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रंथालय चळवळीचे कार्यकर्ते, ग्रंथप्रेमी व मान्यवर सहभागी झाले होते. ग्रंथदिंडीच्या प्रारंभी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास जिल्हाधिकारी संतोष पाटील, महापौर शीलाताई भवरे, डॉ. अच्युत बन, डॉ. श्याम तेलंग यांनी पुष्पहार अर्पण केले तसेच ग्रंथपालखीत ठेवलेल्या भारताच्या संविधान ग्रंथाचे पुजन केले. ग्रंथदिंडीचा समारोप कार्यक्रमस्थळी झाला. मान्यवर, नागरिकांनी ग्रंथप्रदर्शन व विक्री दालनास भेट देऊन ग्रंथ खरेदी केले. सुत्रसंचालन देवदत्त साने यांनी केले तर आभार प्रताप सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील साहित्यिक, ग्रंथपाल, ग्रंथप्रेमी, पत्रकार, नागरिक आदी उपस्थित होते.