अवैध कीटकनाशके, खतविक्री विरोधात कृषी आयुक्तालयाची राज्यभर कार्यवाही

२ कोटी २० लाखांचा माल जप्त

मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) अवैध कीटकनाशकांच्या विक्रीला प्रतिबंध घालण्यासाठी कृषी आयुक्तालयाने राज्यभर भरारी पथकांच्या माध्यमातून कार्यवाही केली आहे. अकोला, सांगली, जळगावसह राज्यातील विविध भागांमध्ये केलेल्या कार्यवाहीनंतर विनापरवाना तसेच कालबाह्य कीटकनाशके,
रासायनिक खते विक्री करणाऱ्या दुकानांवर तसेच उत्पादन कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. साधारण २ कोटी २३ लाख रुपये किमतीच्या कीटकनाशकांच्या अवैध साठ्याची जप्ती करण्यात आली आहे. हा साठा साधारणतः २० हजार ७७१ लिटर आहे, अशी माहिती निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण संचालक मच्छिंद्र घोलप यांनी दिली.  


राज्य शासनाच्या कृषी विभागाने राज्यभर कृषी आयुक्तालय स्तरावर भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या भरारी पथकांनी अकोला येथे विक्रेते, वितरकांचे गोदाम तसेच साठवणुकस्थळांची तपासणी केली. या छाप्यात चार कंपन्यांकडे कीटकनाशक विक्रीचा परवाना नसताना कीटकनाशकांची साठवणूक, वितरण व विक्री होत असल्याचे आढळून आले. या कंपन्यांच्या परवान्यांमध्ये कीटकनाशकांचा समावेश नसताना त्यांनी त्याची साठवणूक, वितरण व विक्री केल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असून कीटकनाशक जप्त करून त्यांचे  विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत. या कार्यवाहीत कृषी रसायन एक्सपर्ट प्रा.लि., केमिनोव्हा इंडिया प्रा. लि., एफएमसी इंडिया प्रा.लि., बायोस्टॅड्ट इंडिया प्रा.लि. या कंपन्यांचा एकूण १९७.५२ लाख रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा विक्री बंद किंवा जप्त करण्यात आला आहे. तसेच भारत इन्सेक्टीसाईड, मे.रेनबो क्राप हेल्थ लि. या कंपन्यांच्या गोडावूनमधून एकूण २६ लाख ६६ हजार रुपये किमतीचा कीटकनाशकांचा साठा जप्त केला आहे. हा साठा साधारणतः २० हजार ७७१ लिटर इतका आहे.

खत उत्पादन कंपन्यांवरही कार्यवाही
सांगली जिल्ह्यातील कार्यवाहीत दोन खत उत्पादक कंपन्यांवर  फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भरारी पथकाने मे.मायक्रो लॅब, कुपवाड एमआयडीसी या ठिकाणी छापा घातला. तेथे एका ट्रकमध्ये एका बॅगमधून सेंद्रिय खत मे.क्लासवन ॲग्रो बायोटेक ॲण्ड फर्टिलायझर (येळावी, ता. तासगाव) या कंपनीचे खत मे. मायक्रो लॅब या कंपनीचे नाव PROM (Phosphate Rich Organic Manure) खत म्हणून रिपॅकिंग केले जात होते. दुसऱ्या ट्रकमध्ये ५० किलोच्या १२० पोती PROM या नावाने भरल्याचे आढळले. तसेच गोदामात सिलीकॉन व सेंद्रिय खताचा साठा आढळला.  या उत्पादकास या खतांचा उत्पादन व विक्री परवाना नाही. या कंपनीने खत नियंत्रण आदेश व जीवन आवश्यक अधिनियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या कारवाईत ५०.८५ मे.टन खत साठा (किंमत रु. ६ लाख २६ हजार ६५०) व दोन ट्रक (अंदाजे किंमत रु. १५ लाख) जप्त करण्यात आले व या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुपवाड एमआयडीसी येथील मे.भाटिया भूमिपुत्र ट्रेडको प्रा.लि. या खत उत्पादक कंपनीचे गोदाम तपासणी केली असता सिलीकॉन व दुय्यम अन्नद्रव्ये मिश्र खताचे विना परवाना उत्पादन व विक्री केल्याचे आढळले. या कंपनीने खत नियंत्रण आदेश व जीवन आवश्यक अधिनियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या कारवाईत १६३.१७ मे.टन खत साठा (किंमत रु.२ लाख ७८ हजार ३०७) जप्त करण्यात आला व या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ॲम्पल ॲग्रो केम इंडस्ट्रीज उत्पादीत नागलवाडी (ता. चोपडा, जि.जळगाव) या कंपनीचा पाण्यात विद्राव्ये खत ०:५२:३४ चा नमुना अप्रमाणित आल्याने (मुलद्रव्यात P ५२ ऐवजी ५१.१५ ने कमी, K ३४ ऐवजी ३३.७७ ने कमी) मे.ॲम्पल ॲग्रो केम इंडस्ट्रीज (इंदौर, जि.जळगाव) कंपनीस निर्गमित केलेले विक्री प्राधिकार पत्र कायम स्वरूपी रद्द करण्यात आले आहे. तसेच उत्पादक मे. ॲम्पल ॲग्रो केम इंडस्ट्रीज (इंदौर, जि. जळगाव) व वितरकांवर नांदेड जिल्ह्यात या प्रकरणात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलैपासून या कारवाया करण्यात येत आहेत. क्षेत्रिय स्तरावरील गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी अधिक जागरूक राहून तसेच स्थानिक स्तरावर सर्व संबंधित घटकांशी समन्वय ठेऊन प्रभावी संनियंत्रण करावेत, असे निर्देश कृषी आयुक्तालयातील निविष्टा व गुणवत्ता नियंत्रण संचालक यांनी दिले आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी