नांदेडच्या कारागृहात निधी उपलब्ध नसल्याने जनरेटर बंदच

नांदेड, रामप्रसाद खंडेलवाल नांदेड येथील जिल्हा कारागृहात ७ लाख रुपयांचा जेनरेटर असतांना त्यात डिझेलसाठी निधी उपलब्ध नसल्याने वीज  गेली तर जिल्हा कारागृहात अंधार पसरतो. आजही कांही अशीच परिस्थिती रात्री ८.३० पर्यंत म्हणजे वृत्त लिहिपर्यंत होतीच.

नांदेड येथे वर्ग - २ चे जिल्हा कारागृह आहे. या कारागृहात २०० कच्या कैदाची राहण्याची कायदेशीर सुविधा असतांना येथे
जवळपास ४०० पेक्षा जास्त कच्चे कैदी ठेवले जातात. कारागृहात कैदी आणण्याच्या वेळेला कांहीच बंधन नसते. त्यामुळे २४ तासातील कोणत्याही क्षणी पोलीस गुन्हेगाराला न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कारागृहात नेऊन सोडतात. आज सायंकाळी ६ नंतर अर्थात अंधार पडल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने आरोपींना कारागृहात टाकण्यासाठी गेलेल्या पोलीस पार्टीला कारागृह परिसरात दिसणारा अंधार अचंबीत करीत होता. आपल्या गाडीच्या लाईटच्या उजेडात कारागृहाच्या गेटपर्यंत पोलीस पार्टीने आपला प्रवास पूर्ण केला तेंव्हा कारागृह रक्षक मेणबत्त्या आणि आपल्या मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात तेथे आपले काम चालवत होते. कोणाचा चेहरा कोणाला स्पष्ट दिसत नव्हता. अशा परिस्थिती मेणबत्ती आणि मोबाईच्या बॅटरी उजेडात कारागृह सुरक्षा रक्षक आणि पोलीसांनी आपले काम पूर्ण केले.

या बाबत अधिक माहिती घेतली असता ज्या-ज्या वेळी वीज जाते. त्या-त्या वेळी हीच परिस्थिती असते अशी माहिती प्राप्त झाली आहे. नांदेडच्या कारागृहात वीजेच्या जोडणीला खंड पडला तर त्याच्या सुविधेसाठी ७ लाख रुपये खर्च करून आणलेले जनरेटर उपलब्ध आहे. पण या जनरेटरमध्ये डिझेल टाकण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने हे जेनरेटर नेहमी बंद असते. कारागृहात रात्रीच्या वेळी वीज गेली तर अत्यंत दुर्धर परिस्थिती तयार होते. कारण पोलीसांनी एखादा गुन्हेगार आणला तर त्याला मुख्य दरवाज्यातून आत घेणे, त्यानंतर त्याची रजिस्टरला नोंद करणे आणि त्यानंतर दुसरे गेट उघडून आरोपींच्या कक्षात सोडणे सायंकाळी ६ वाजता आरोपींचे कक्ष सुध्दा बंद केले जातात. वीजेच्या अभावी मेणबत्त्या आणि उपलब्ध असलेल्या मोबाईलच्या उजेडात ही सर्व कामे करणे अत्यंत अवघड आहे. कारागृहाच्या भिंतीला चार ठिकाणी मचाणवर उभे राहून पोलीस रात्रभर पहारा देत असतात चारही बाजूला मोठमोठे विद्युत दिवे आहेत. ते विद्युत दिवे बंद झाले तर त्या पोलीसांना भिंतीसोबत कोणी असमाजिकतत्त्व कांही चूकीची आणि बेकायदेशीर कृत करत असेल तर कांहीच दिसणार नाही. महाराष्ट्र शासन आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या वल्गना करीत असतांना नांदेड कारागृहात उपलब्ध असलेल्या जनरेटरमध्ये डिझेल टाकण्यासाठी निधी उपलब्ध नाही. तर अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाची प्रशंसा लिहावी तेवढी कमी आहे.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी