नांदेड(खास प्रतिनिधी)नांदेड वाघाळा महानगरपालिकेतील नगररचना विभागातील तत्कालिन प्रभारी नगररचनाकार खुशाल कदम यांना आज तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत एकच खळबळ माजली आहे.
तत्कालिन आयुक्त सुशिल खोडवेकर यांची बदली झाल्यानंतर त्यांनी या कालावधीत विविध कामांना मंजुरी दिली होती. यात मंजुरी देत असताना संबंधित
विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ संचिका मंजुरीसाठी माझ्याकडे द्या, असे सांगितले होते. यात नगररचना विभागातील तत्कालिन प्रभारी नगररचनाकार खुशाल कदम या अधिकाऱ्यांचा पहिला बळी ठरला असून मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांनी निलंबनाची नोटीस काढली आहे.
खोडवेकर यांनी बदली झाल्यानंतर म्हणजे दि.26 एप्रिल ते 6 मे या कालावधीत अनियमितता केले असल्याची तक्रार शिवसेनेचे महानगराध्यक्ष बाळू खोमणे यांनी राज्य सरकारकडे केली होती. याची गंभीर दखल घेऊन शासनाने दि.25 रोजी मुंबई महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना सविस्तर चौकशी करण्यासाठी नांदेड येथे पाठविले होते. त्यांनी दि. 25 रोजी येथील शासकीय विश्रामगृहात दिवसभर चौकशी करुन तात्काळ शासनाला अहवाल तात्काळ सादर करणार आहेत. चौकशीच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे दि.26 रोजी शासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नगररचना विभागातील तत्कालिन प्रभारी नगररचनाकार खुशाल कदम यांनी बांधकाम परवानगीत अनियमितता असल्याचे आढळून आल्याने त्यांना कामावरुन निलंबीत करण्यात का येवू नये, असे आदेश शासनाने मनपा आयुक्त समीर उन्हाळे यांच्याकडे पाठवून तात्काळ कारवाई करण्यास आदेश दिले. यावरुन मनपा आयुक्त उन्हाळे यांनी खुशाल कदम यांना निलंबीत करण्यात आल्याचे नोटीस दि.26 रोजी काढली आहे.