60 वर्षांपासून शहरवासीयांना बसस्थानकाची प्रतीक्षा

हिमायतनगरला बसस्थानक केंव्हा होणार...? 
60 वर्षांपासून प्रवाशी व शहरवासीयांना प्रतीक्षा
 

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर शहरासारख्या तालुक्याच्या ठिकाणी मागील  60 वर्षापासून   बसस्थानक नसून प्रवाशांना बसण्यासाठी साधे टीन शेडही नाही. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मंदिराच्या मैदानात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली व समाधीच्या ओट्यावर उन्हात व पावसात बसून प्रवाश्यांना एस.टी. बसची वाट बघावी लागत असल्याचे सध्याचे चित्र आहे. परिणामी श्रीक्षेत्र असेलल्या परमेश्वर नगरीत ये - जा करणार्यांना अनंत अडचनीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात आजवर अनेक पुढारी होऊन गेले तरी सुद्धा हा प्रश्न अजूनही रेंगाळत असून, हि प्रलंबित मागणी कधी पूर्ण होईल..? असा सवाल जनता विचारत आहे. 
 
तालुका तिथे आगार.. या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी मागील दहा वर्षाच्या काळात सर्वत्र झाली. त्यावेळी नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यात बसस्थानका बरोबर आगराचाही प्रश्न निकाली काढल्या गेला होता. मात्र नव्याने तालुका होऊन 17 वर्ष लोटलेल्या हिमायतनगर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी आगार तर नाहीच. परंतु साधे बस स्थानक सुद्धा बांधण्यात आलेले नाही. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिराच्या मैदानात एस.टी.बसेस उभ्या केल्या जातात. या ठिकाणाहून विदर्भ - तेलंगणा आंध्रप्रदेश - मराठवाडा आदी ठिकाणच्या गाड्यांची वर्दळ नेहमीच सुरु असते. तसेच रेल्वे रुंदीकरणानंतर एक्सप्रेस व पैसेंजर रेल्वगाड्या ह्या सकाळ, दुपार व सायंकाळी ठराविक वेळेत येतात. जास्तीत जास्त प्रवाश्यांना बसचे वेळापत्रक कुठे आहे हे माहीत नसल्यामुळे खाजगी वाहनाने प्रवास करावा लागतो आहे. तर जेष्ठ नागरिक मात्र बसने प्रवास करण्यासाठी तासनतास भर उन्हात व पावसात वाट पाहत बसतात. प्रवाश्यांची हि समस्या लक्षात घेता परमेश्वर मंदिर कमेटीने बस उभ्या करण्याची सोय केलेली आहे. मात्र येथे टीनशेड नसल्यामुळे उन्हाळ्यात ऊन आणि पावसाळ्यात  पावसाचा सामना करावा लागतो आहे. तालुक्यातील 53 ग्रामपंचायतीच्या वाडी - तांड्यातील व बाहेरगावाहून ये - जा करणाऱ्या प्रवाश्यांना एस.टी.महामंडळाच्या या दुर्लक्षित कारभारामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

मागील 60 वर्षापासून येथिल काही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थामुळे झालेल्या ओढाताणीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे जेष्ठ नागरिक सांगतात. खरे पाहता बसस्थानक हे रेल्वे लाईन नजीक असायला हवे मात्र या राजकीय व्यक्तींच्या मतभेदामुळे बसस्थानकाचे भिजत घोंगडे अजूनही जैसे थेच दिसत आहे. हिमायतनगर तालुका केवळ रस्ते, नाल्या, बांधकामाच्या विकासात आघाडीवर असून, महत्वाच्या बसस्थानकाच्या प्रश्नात अजूनही मागेच आहे. आगामी काळात हिमायतनगर शहरात बसस्थानक होईल कि..? नाही.. असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या तालुक्याचे विद्यमान आमदार शिवसेनेचे आहेत, मागील शिवसेनेचे तत्कालीन आमदार सुभाष वानखेडे यांच्या कार्यालयात हिमायतनगर ला तालुक्याचा दर्जा मिळाला. आता नविर्वाचीत आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या कार्यकाळात तरी हिमायतनगर येथील बसस्थानकाचा प्रश्न मार्गी लागेल का..? अशी रास्त अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी