इनरव्हील क्लब नांदेडचा पदग्रहण सोहळा संपन्न -NNL

जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर व सिईओ वर्षा ठाकूर यांची उपस्थिती



नांदेड| महिलांनी आपल्‍यातील सुप्‍त गुणांना वाट मोकळी करुन द्यावी. आपले गुण जोपासून आपली वेगळी ओळख निर्माण करावी असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांनी केले. नांदेड येथील इनरव्हील क्लबच्‍या नुतन पदग्रहण सोहळा नुकताच संपन्‍न झाला, त्‍योळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांची उपस्थिती होती.


गतवर्षीच्या अध्यक्षा डॉ. पुष्पा गायकवाड यांनी नव निर्वाचित अध्‍यक्षा किर्ती सुस्तरवार यांच्याकडे पदभार सोपविला. नुतन कार्यकारणीत सचिव डॉ. विद्या पाटील, कोषाध्यक्ष सुधा सुकाळे, आय.एस.ओ. मीनाक्षी पाटील, एडीटर उमा श्रीनिवासन, उपाध्यक्ष डॉ. विमल यन्नावार, सहसचिव गायत्री तोष्णीवाल, क्लब करस्पॉडन्ट सोनाली देशमुख व रत्ना जाजू यांची वर्णी लागली. कृष्णा मंगनाळे यांच्‍या इनरव्हील प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्‍यानंतर मान्‍यवरांच्‍या हस्‍ते दीप प्रज्वलन करण्‍यात आले.


यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर- घुगे यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सर्व महिला एकत्रित आल्या तर कोणतेही काम तडीस नेऊ शकतात. सुनियोजीत कार्याने समाजकार्य व स्वतःसाठी वेळ देता येतो हा बहुमूल्य मंत्र त्‍यांनी यावेळी दिला. तसेच मल्टिटास्किंग करायचे तर स्वतः परिपूर्ण व्हा, स्वतःसाठी जगा, आंनदी रहा असा सल्‍लाही त्‍यांनी यावेळी दिला. तसेच इनरव्हीलच्या अध्यक्षा किर्ती सुस्तरवार यांनीही पुढील कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली.


या कार्यक्रमात नंदीग्राम रोटरीच्या नुतन अध्यक्षा डॉ. सारिका झुंजारे, सचिव डॉ. पूनम शेंदारकर यांचा सत्कार करण्यात आला. दरवर्षीप्रमाणे 'बेस्ट स्कुल ट्रॉफी' उमा श्रीनिवासन यांच्या ऑक्सफर्ड इंग्लीश स्कुल यास तर सावित्रीबाई फुले दत्तक योजने अंतर्गत कु. अपेक्षा दवणे हिला दत्तक घेण्यात आले. आशिष केंद्रे या विद्यार्थ्यास बेस्ट स्टुडंट ट्रॉफी देण्यात आली. कोरोना काळात अविरत कार्य करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस अधिकारी तसेच सफाई कर्मचा-यांना इनरव्हील क्लबच्‍या वतीने वृक्ष, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्‍यात आला. तर कोरोना योध्दा म्‍हणून डॉ. शुभांगी पतंगे, डॉ. चित्रा पाटील, डॉ. भारती मडवई, डॉ. सारिका झुंजारे, डॉ. पुनम शेंदारकर, डॉ. प्रतिमा पाटील, डॉ. मिनल पाटील, डॉ. विद्या पाटील, डॉ. पुष्पा गायकवाड, डॉ. मुग्धा देशपांडे, डॉ. अरूणा देशमुख, डॉ. सुरेखा कोरोना योध्दे पुरस्कारीत करण्यात आले.


याप्रसंगी निरामय या प्रथम बुलेटीनचे प्रकाशन प्रमुख पाहूण्‍यांच्‍या हस्ते करण्यात आले. नविन सदस्यांचा सत्कार रोपटं देऊन करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय कल्याणी हुरणे यांनी केला. स्वागतगीत सुनिता तोष्णीवाल व रेखा शर्मा यांनी सादर केले मागील वर्षाचा अहवाल डॉ. पुष्पा यांनी मांडला. दिपाली आवाळे यांच्या सुंदर नृत्याने कार्यक्रमात रंगत आली. सुजाता मैया यांना बेस्ट इनरव्हील लेडी ट्रॉफी प्रदान करण्यात आली तर सुत्रसंचलन पोर्णिमा श्रीवास्तव यांनी केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रामुख्याने सौ. उमा श्रीनिवासन व त्यांच्या शाळेतील सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी आशा लव्हेकर, सुष्मा काला, मीना काबरा, लता प्रेमचंदानी, माया निहलानी, कांता दरक, उर्मीला सोनी, जयश्री पावडे तसेच सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी