पांदन रस्ता झाला मोकळा..

अखेर पोलिस बंदोबस्तात अतिक्रमित पांदन रस्ता झाला मोकळा..शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाची अडचण झाली दूर
हिमायतनगर(अनिल मादसवार) अनादीकालापासून चालू असलेल्या हिमायतनगर - सरसम बु. पांदन रस्तावर एका भूमाफियांनी रात्रीतून ट्रेक्टरचा नांगर फिरविला होता. याची कुणकुण लागताच  परिसरातील शेतकर्यांनी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही प्रकरण निकाली निघत नव्हते. त्यामुळे जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांची भेट घेतल्यानंतर अखेर स्थळ पंचनामा करून दि. ३१ मे रोजी पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आल्याने शेतकऱ्याच्या खरीप हंगामाचा तिढा सुटला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही वर्षापासून तहसील कार्यालय परिसर व राज्य रस्त्यावरील भूखंडाला सोन्याचा भाव आला आहे. त्यामुळे काही भूमाफिया सक्रिय झाले असून, ज्या ठिकाणी अतिक्रमण करत येईल अश्या संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. असाच काहींसा प्रकार नांदेड - किनवट रस्त्यावरील जलसंपदा विभाग वसाहत व कार्यालयाच्या पाठीमागे झाला. येथून निघणार्या हिमायतनगर - सरसम पांदन रस्त्यावर एका भूमाफियाने गेल्या १० दिवसापूर्वी अचानक रात्रीला नांगर फिरविला होता. हि बाब परिसरातील शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने सर्वांच्या वतीने शंकर वानखेडे, विठ्ठल हरडफकर, श्रीनिवास मारुड्वार, माधव पाळजकर, रामराव हरडफकर, राहुल मोतेवार, प्रशांत मारुडवार यांच्यासह अनेकांनी रीतशीर तक्रार तहसीलदार यांच्याकडे देऊन अतिक्रमन काढण्याची मागणी केली होती. रस्ता नांगरल्याने या भागातील अनेक शेतकऱ्याच्या खरीप हंगामच्या पेरणीपूर्व मशागतीच्या तयारीची कामे खोळंबली. अगोदरच गेल्या तीन वर्षापासून होत असलेली सततची नापिकी आणि आता शेतीकडे जाणार्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे या भागातील शेतकरी अडचणीत आले होते. 

तक्रार देऊनही भूमाफियांनी बनावट रजिस्ट्री अन्य कागदपत्रे दाखून या जागेवर आपला दावा असल्याचे सांगत प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. जवळ येत असलेला खरीप हंगाम आणि वाद वाढत जाउन हंगाम अडचणीत येणार असल्याचे लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या  शिष्टमंडळाने हक्काच्या पांदन रस्त्यासाठी जिल्हाधिकारी सुरेश काकांनी यांची भेट घेतली होती. त्यामुळे गेल्या दि. २७ शुक्रवारी तहसीलदार गजानन शिंदे यांनी जायमोक्यावर जाउन स्थळ पंचनामा केला यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकर्यांनी पांदन रस्ता मोकळा करून देण्याची मागणीचे निवेदनाद्वारे केली होती. याची दाखल घेत गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचे आदेश तहसीलदार यांनी काढले. दरम्यान कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून पोलिस बंदोबस्त मागविला होता. त्यानुसार आज दि. ३१ मे रोजी उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांच्या उपस्थितीत जवळपास दोन पोलिस उपनिरीक्षक व ६० ते ७० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. आणि भूमिअभिलेख प्रशासनाच्या वतीने मार्क आउट करून दिल्यानंतर तीन जेसीबी मशिन द्वारे जुना सर्वे क्रमांक ३२६ मधील ३३ फुट रुंदीचा पांदन रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाल्या काढून मोकळा करण्यात आला आहे. सदर रस्ता हा नांदेड - किनवट रस्त्यापासून निघून थेट हिमायतनगर शहरातील खडकी रस्त्याला जाउन मिळतो. हा रस्ता मोकळा करून देण्यासाठी महसूल, पोलिस, भूमिअभिलेख प्रशासनाने शेतकऱ्यांची प्रमुख समस्या निकाली काढल्यामुळे खरीप हंगामातील मोठी अडचण दूर झाली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे भूमाफियाचे मनसुबे उधळले असून, अश्याच शहर व परिसरात अनेक ठिकाणी भूमाफियाकडून रस्ते, तथा शासकीय जमिनीवर डोळा ठेवून अतिक्रमण केले जात आहे. या प्रकारच्या विरोधात प्रशासनाने विशेष मोहीम राबवावी अशी रास्त मागणी शेतकरी, नागरिक करीत आहेत.

अतिक्रमित भूमाफिया मोकाटच...

आजच्या पांदन रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्यात आले असले तरी अतिक्रमण करणाऱ्या भूमाफियावर प्रशासनाने सध्या तरी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने. भूमाफिया व त्यांना  सहकार्य करणाऱ्या भूमिअभिलेख, महसूल कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अद्याप मोकाटचा असून, भूमाफियासह त्यांना सहकार्य करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यावर जिल्हाधिकारी यांनी कठोर कार्यवाही करावी अशी मागणी सुजान नागरीकातून केली जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी