जनावराच्या डॉक्टरच्या विरोधात पशुपालक - शेतकऱ्यांचा उद्रेक

मनमानी कारभाराला कंटाळून पशुवैद्यकीय दवाखान्याला लावले कुलूप 

हिमायतनगर(वार्ताहर)गेल्या काही महिन्यापासून येथील जनावराच्या डॉक्टरने पशु पालकांसोबत  जनावरासारखेच वागणे सुरु करून मनमानी कारभार चालविला आहे. वाट्टेल तेंव्हा दवाखाना बंद करून लसीकरणाच्या नावाखाली अनुपस्थित राहण्याच्या कारभाराला शेतकरी व पशु पालक वैतागले आहेत. दि.२४ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ११.३० पर्यंत थांबूनही डॉक्टरसह कर्मचारी आले नसल्याने संतप्त शेतकर्यांनी उद्रेक करत दवाखान्यास कुलूप लावून तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, येथील पशुवैद्यकीय अधिकारी कार्यालयात गत काही वर्षापासून पशुवैद्यकीय अधिकारी श्री बिरादार यांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. रुग्णालय उघडण्याची वेळ ठरवून दिली असताना वेळेवर न उघडणे, बुधवारी आठवडी बाजारच्या दिवशी दुपारच्या ठराविक वेळेच्या अगोदर गेट बंद करून ठेवणे, विचारपूस करणार्यास व जनावरे घेवून येणार्यास ताटकळत ठेवणे, उपचारासाठी आलेल्या रुग्णांना औषधी बाहेरून आणावयास लावणे, शासकीय योजनांची माहिती शेतकरी व पशुपालकांना न देणे, विचारणाऱ्या शेतकर्यांना उडवा - उडवीची उत्तरे देवून कामचुकारपणा करणे, स्थानिकला राहत असल्याचे भासवून भोकर येथून ये - जा करणे यामुळे पशुपालक व शेतकर्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला तर काहीना आपली जनावरे गमवावी लागली आहेत. असे अनेक प्रकार मागील काळात घडले असून, जखमी जनावरांसह वन्य प्राण्यांना तासंतास विव्हळावे लागले तर परमेश्वर मंदिराचा लाखो रुपये किमतीचा कठाळ्याला विव्हळत प्राण गमवावे लागल्याचे उजेडात आले आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरून अनेक वर्तमान पत्रातून बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या आहेत. परंतु वरिष्ठ अधिकारी अश्या कामचुकार डॉक्टरास अभय देत असल्याने मनमानी कारभाराची सीमा पार केली आहे. असाच काहींसा प्रकार दि.२४ शुक्रवारी पुन्हा एकदा घडला असून, सकाळी ७ वाजता हिमायतनगर शहरासह तालुक्यातील सिरंजणी, एकघरी, पवना, खडकी बा., घारापुर, पळसपूर, पिछोंडी आदीसह अनेक गावातील पशुपालाकानी आपली जनावरे त्यात गायी, गोऱ्हे, शेळ्या, कुत्रे, बैल, म्हैस आदीसह अनेक मुक्या पशूना उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले होते. परंतु नेहमी प्रमाणे लसीकरणाच्या नावाखाली स्वतः पशुवैद्यकीय अधिकारी श्री बिरादार हे स्वतः तर अनुपस्थित होतेच तर या ठिकाणी कार्यरत अन्य कर्मचारी सुद्धा गैरहजर दिसून आले. त्यामुळे शेतकर्यांनी तब्बल ४ तास वाट पाहून अखेर जनावरे विव्हळत असल्याने पत्रकारांना बोलावून असुविदेच्या गर्तेत सापडलेल्या पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या मनमानी कारभाराची पोलखोल केली. यावेळी अनेकांनी संबंधित डॉक्टरास दूरध्वनीवरून विचारणा केली असता, आमचे लसीकरणाचे काम सुरु आहे असे सांगून हात झटकण्याचा प्रयत केला. त्यामुळे संतप्त पशु पालकानी रुग्णालयास कुलूप लावून मनमानी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध केला. जोपर्यंत डॉक्टर उपस्थित होणार नाहीती तोपर्यंत कुलूप काढणार नाही असा पवित्र घेतला होता. तब्बल ११ .४५ वाजता रुग्णालयात कर्मचारी दाखल झाले, सकाळपासून तळपत्या उन्हात पाण्यावाचून विव्हळणाऱ्या जनावराना तातडीने उपचार मिळावा म्हणून पशु पालकांनी लावलेले कुलूप काढून उपचार करवून घेतला. यावेळी उपस्थित दत्ता दंडेवाड, शिवदर्शन गड्डमवार सिरंजणी, दत्ता टारपे पिछोंडी, श्याम म्याकलवाड सिरंजणी, बळीराम फुलके हिमायतनगर, मारोती राऊलवाड पवना, विश्वनाथ कळले खडकी बा, बाबुराव कत्तुलवाड, पापा दंडेवाड, सलाम अब्दुल कुरेशी हिमायतनगर यांच्यासह अनेक गावचे पशुपालकांनी संबंधित डॉक्टरची  उचलबांगडी करून कर्तव्यदक्ष अधिकार्याची नेमणूक करण्याची मागणी केली आहे.  

याबाबत दत्ता दंडेवाड म्हणाले कि, येथे शासनाकडून औषधी पुरवठा होत असला तरी डॉक्टरच्या नियोजनशून्य कारभारामुळे काही औषधी कालबाह्य झाली असून, रुग्णालयात ठेवली आहे. काही महागडी औषधी आपल्या मर्जीतील मेडिकल स्टोर्स मध्ये ठेवून पशुपालकांना औषधी नसल्याचे सांगून विकत अनन्यास भाग पडत असल्याचे बोलून दाखविले. 

याबाबत पशुधन विकास अधिकारी श्री बिरादार यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि, मला लसीकरणाचे टार्गेट दिले आहे. त्या निमित्ताने मी नांदेडला गेलो आहे. कर्मचारी बाहेर गावात  लसिकारणाला गेले आहेत, आजच्या प्रकारामुळे मी यानंतर लसीकरण करणार नाही असे वरिष्ठांना सांगितल्याचे ते म्हणाले.  असे असले तरी थोड्या वेळाने ते हिमायतनगर शहरात फिरताना दिसून आल्याने त्यांच्या कामाचुकार पणाचा पुन्हा एकदा पशु पालकांना अनुभव आला.   

याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री गोहोत्रे यांच्याशी दोन वेळा दूरध्वनीवरून ११.४४ वाजता संपर्क केला असता आय कॉल यु लेटर अश्या प्रकारचा मेसेज पाठविला. दुसर्यांदा १.२८ मिनिटानी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. यावरून वरिष्ठ अधिकारी कामचुकार डॉक्टरास अभय देत असल्याच्या प्रकाराला दुजोरा मिळत आहे असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी