शेकडो तक्रारी नंतरही पाणलोट कार्यक्रमाला गती..
कृषी विभागाचा उद्देश संशयाच्या भोवर्यात
हिमायतनगर(अनिल मादसवार)
कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी व उपोषणे झाली. त्यानंतरही पाणलोटाची कामे घाई घाईने उरकण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यामागे कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उद्देश काय..? असा संशय नागरीकामध्ये निर्माण होत आहे.
सविस्तर असे कि, राष्ट्रीय पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत गावासह शेती व शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्दात हेतूने राज्य शासनाने प्रत्येकी गावास कोटीच्या जवळपास निधी उपलब्ध करून दिला आहे. आणि पाणलोट अभियान पारदर्शी राबविण्याच्या सूचना शासन निर्णयानुसार दिले असले तरी लोण्याच्या गोळ्यावर डोळा ठेवून कृषी विभागातील अधिकार्यांनी नागरिकांना पाणलोट अभियानाची जुजबी माहिती देत एकाला चलो रे कार्यक्रम हाती घेतला आहे. खरे पाहता एका ठिकाणी तीन वर्ष एकच अधिकारी राहू नये असे असता देखील गत अनेक वर्षापासून याच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या काहींनी मनमानी कारभारच चालूच ठेवला आहे. यामुळेच कि काय गत वर्षी राबविण्यात आलेल्या गावात पाणलोटाच्या विविध विकास कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची ओरड अनेक गावातील नागरीकाकडून झाली. कित्येकांनी चौकशी करून अनेक वर्षापासून ठाण मांडून बसलेल्या कृषी विभागातील कृषी सहाय्यक, सुपरवायजर व कृषी अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी तहसील कार्यालयासमोर उपोषण मांडून केली. परंतु तत्कालीन अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि मैनेजमेंट मध्ये तरबेज असलेल्या कृषी विभागाच्या सुपरवायजरणे कोणतेही बिंग फुटू दिले नाही. याविषयी कृषी विभागाशी संपर्क साधून अनेक वेळा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु कृषी विभागातील अधिकारी ताकास तूप लागू देत नसल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. सिंचनाचा स्त्रोत वाढविण्यासाठी शेती सपाटीकरण, नाला सरळीकरण, पाण्याचा स्तर वाढविण्यासाठी चर टाकणे व बांधणे, आदीसह अनेक कामे करण्यात येत आहेत. मात्र कृषी विभागातील अधिकारीच पाणलोट अभियानाच्या उद्देशाला कात्री लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रत्येकी शेतकऱ्याच्या शेतात ५० ते ६० हजाराचा खर्च दाखवून शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचे काम कृषी सहाय्यक सुपर वायजर व कृषीअधिकार्यांनी केले आणि अजूनही करत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. त्यामुळेच कि काय तालुक्यातील टेंभी परिसरात नव्याने चालू केलेल्या कामात थातूर - माथुर पद्धतीने जुन्याचा कट्ट्यावर कट्टे टाकले जात आहेत. तर नाल्याची खोली अंदाजपत्रका प्रमाणे न करता शासनाचा निधी गिळंकृत करण्याचा प्रकार यंदाच्या पाणलोट कामात केला जात असल्याचे प्रत्यक्ष दर्शी दिसून येत आहे. हा सर्व प्रकार कृषी सहाय्यक सुपर वायजर व कृषी अधिकारी यांच्या संगनमताने केला जात असून, त्यांच्या संपत्तीची चौकशी केल्यास भ्रष्टाचारातून माया जमविल्याचे उघड होईल..? असा सूर नागरीकातून उमटत आहे.