बोगस मजुरांचा जादा भरणा


हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यात करण्यात आलेल्या वृक्ष लागवड व संगोपनाच्या कामात सामाजिक वनीकरण विभागाच्या लागवड अधिकारी, सहाय्यक लागवड अधिकारी, रोजगार सेवक व दलाल कार्यकर्त्यांनी मिळून वाहनाने काम करून घेवून बोगस मजुरांचा भरणा दाखवीत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. अशी तक्रार पळसपूर येथील ११ खर्या मजूरदारांनी वर्षभरापासून मजुरीचा मोबदला न दिल्याने तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यावरही न्याय न मिळण्यास वेळ प्रसंगी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबविण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, सामाजिक वनीकरण विभाग हदगाव रेंज अंतर्गत येणाऱ्या हिमायतनगर कार्यक्षेत्राचा कारभार मोतेवार नामक महिला अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला असून, ते नांदेड शहराच्या ठिकाणी राहून कारभार चालवितात. तसेच सहाय्यक लागवड अधिकारी श्री ढवळे हे सुद्धा देखरेख करता. मागील वर्षीच्या काळात पळसपूर ते हिमायतनगर रोडवर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणे, झाडे लावणे, पाणी टाकणे व संगोपन करणे हि कामे डेली वेजेस वरील मजुर मार्फत करण्यात यावे यासाठी लाखोचा निधी उपलब्ध झाला होता. सदरची कामे बोगस पद्धतीने करण्यात आली असून, यातील काही कामावर मजूर तर काही कामावर मजुरांना न लावता कागदावरच पूर्ण केली आहेत. हा भ्रष्टाचाराचा प्रकार लक्षात येताच तत्कालीन लागवड अधिकारी श्री ठाकूरवार यांनी काही महिने सुट्टी घेवून पुन्हा पदावरून निरोप घेवून या कटकटीतून सुटका करून घेतली. तत्कालीन अधिकारी शेख व सध्याचे लागवड अधिकारी सौ मोतेवार, तत्कालीन सहाय्यक लागवड अधिकारी मुरगुलवाड यांच्या सांगण्यावरून रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्री सूर्यवंशी, संगणक ऑपरेटर खुडके आणि दोन दलाल व रोजगार सेवक यांनी संगनमत करून कामावर मजूर असल्याचे दाखविले. एवढेच नव्हे तर या कामात मोठ्या प्रमाणात बोगस मजुरांचाच भरणा करून कोणतेही काम नियमाप्रमाणे न करता शासनाची रक्कम परस्पर पोस्टच्या खात्यावर जमा व उचल केली आहे. हा सर्व प्रकार कामावर असलेल्या खर्या मजुरांना माहित असताना काही अंशी का होईना हाताला काम मिळते व मजुरी मिळेल या आशेने तोंड बंद ठेवले होते.

मात्र नूतन लागवड अधिकार्यांनी पदभार स्वीकारल्यापासून वंचित मजुरांनी अनेकदा मजुरीची मागणी केली. परंतु गावातीलच स्वयंघोषित अधिकारी व दलालांनी आज देवू उद्या देव..असे म्हणत मजुरी देण्यास टाळाटाळ केली आहे. वर्ष उलटले तरी देखील मजुरी मिळत नाही तर बोगस भरणा केलेल्या मजुरांच्या नावाने मोठ्या प्रमाणात शासनाकडून आलेली मजुरी दिल्या गेल्याचे समजताच हक्कापासू वंचित असलेल्यांनी सरकारी कार्यालय गाठून या भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली आहे. आज घडीला येथील कामावर केवळ दोन मजूर आहेत, तरीदेखील जादा मजुरांच्या नावाने मजुरी उचलून हिमायतनगर येथील दलाल सेवकांनी शासनाला लुटण्याचा प्रकार सुरु ठेवला आहे.

तसेच येथील रोजगार सेवक श्री भीमराव ढोणे यांनी तर या भागातील मजुरांची पोस्टाची खाते पुस्तिका आपल्याच घरी ठेवून घेतल्याने खरे मजूरदार व बोगस मजूरदार याचा ताळमेळ लागणे कठीण झाले असून, यामुळे मजुरांची मजुरी परस्पर उचलण्यात हे महाभाग यशस्वी होत आहेत. असा आरोप करीत येथील खर्या ११ मजुरांनी जिल्हाधिकारी धीरजकुमार, उपविभागीय अधिकारी दीपक घाडगे, तहसीलदार हिमायतनगर यांना निवेदन देवून आमच्या हक्काची मजुरी आम्हाला मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच लागवड अधिकारी, रोजगार सेवक व दोन दलालावर शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक व भ्रष्टाचार केल्या प्रकरणी पोलिस कार्यवाही करावी अशी मागणी गणेश वानखेडे, चांदराव बोंबीलवार, पुंजाराम वानखेडे, बाबुराव भावराव वानखेडे, संभाजी घोडगे, जिजाबाई वानखेडे, शिवाजी वानखेडे, मुकिंद वाडेकर, बाबुराव परमेश्वर वानखेडे, लक्ष्मण साहेबराव वानखेडे, भुजंगराव बोंबीलवार, पिंटू अवधूत वानखेडे, संजय कोमलवाड, सुभाष कांबळे, आनंद गायकवाड यांच्यासह अनेकांनी केली आहे.

या बाबत लागवड अधिकारी सौ. मोतेवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता इस नंबर पे कोई जवाब नाही दे रहा अशी धून पद्धतीची सूचना कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

तर सध्याचे सहाय्यक लागवड अधिकारी श्री ढवळे यांच्याशी संपर्क केला असता, ते म्हणाले कि, मी महिन्याभरापूर्वी चार्ज घेतला आहे. माझ्याकडे मस्टर व इतर कारभार देण्यास श्री मुरगुलवार व ढोणे यांनी भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पडू नये म्हणून टाळाटाळ केली होती. माझ्या पाहणीत हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर, कारला, मंगरूळ, आदी ठिकाणच्या वृक्ष लागवड कामामध्ये मोठ्या प्रमाणात बोगस पणा दिसून आला, त्यातील बहुतांश कामांची मी प्रत्यक्ष ठिकाणावर जावून दोन मजुरांना घेवून सुधारणा केली आहे. दि.२८ रोजी एस.डी.एम.साहेबांनी पाहणी केली असून, आगामी काळात भ्रष्ट कारभाराला मी थारा देणार नसल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले.

अपहाराचा वाद गौतमच्या दरबारात
-------------------------
मागील चार दिवसापासून हिमायतनगर तालुक्यातील पळसपूर येथील रोहयोच्या कामात झालेला भ्रष्टाचार व कामातील अपहार प्रकारची चर्चा जोरदारपणे सुरु आहे. मजुरी न मिळालेल्या मजुरांनी शासकीय अधिकार्यांना तक्रार तर दिलीच उलट तक्रार का करता म्हणून धमकी दिल्याने काही मजुरांनी पोलिस निरीक्षक अनिलसिंह गौतम यांची भेट घेवून प्रकार कथन केला आहे. त्यावरून संबंधित अपहार करते यांना त्यांनी बोलावून तंबी देत तातडीने मजुरांचा मोबदला देण्याचे सुचित केले. तसेच या संबंधीची माहिती महसूलच्या वरिष्ठांना सांगून खर्या मजुरांना न्याय मिळून देण्यासाठी लक्ष देण्याचे सांगितले. पोलिस निरीक्षक गौतमच्या दरबारात आल्यानंतर तरी खर्या मजुरांना न्याय मिळेल काय..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी