वाऱ्यामुळे उरली -सुरली पिके आडवी..
बळीराज्याच्या चिंतेत भर
बळीराज्याच्या चिंतेत भर
हिमायतनगर(वार्ताहर)तालुका परिसरात विजांचा कडकडात व वादळी वाऱ्यात बुधवारी ३ वाजता पावसाने हजेरी लावली असून, पाऊस कमी तर विजांचा कडकडाट जास्त असा अनुभव हिमायतनगर वासियांना आला असून, दरम्यान परिसरात वीज कोसळून गाय - म्हैस ठार झाली असून, हरी कोंडीबा बोथीन्गे हा शेतकरी जखमी झाला आहे.
ऐन बुधवारच्या आठवडी बाजारच्या दिवशी दुपाई ३ वाजेच्या दरम्यान अचानक जोरदार वादळी वारे, विजांचा कडकडाट व पावसाला सुरुवात झाली. अर्धातास झालेल्या या पावसामुळे व्यापारी व ग्राहकांची तारांबळ उडाली होती. शहर व काही परिसरात पाऊस झाला परंतु ग्रामीण भागात बर्याच ठिकाणी पाऊस पडला नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान विजांच्या कडकडाटात सिरंजनि शिवारातील वीज कोसळल्यामुळे आखाड्यावर बांधून असलेली कचरु नारायण वासुदेव या शेतकर्याची गाय दगावली आहे. यात शेतकर्याचे ३० हजाराचे नुकसान झाले आहे. तर हिमायतनगर शहरा नजीकच्या गणेशवाडी शिवारातील आखाड्यावर वीज कोसळून हरी कोंडीबा बोथीन्गे या शेतकर्याची दुभती म्हैस ठार झाल्याने ५० हजारचे नुकसान झाले आहे. तर या घटनेत हरी नामक शेतकरी जखमी झाला असून, त्याच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. बुधवारच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे परिसरातील शेतातील उभी कापसाची पिके आडवी झाल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. अगोदरच शेतकरी कोरड्या दुष्काळाने नुकसानीत आलेल्या पिकामुळे हैराण असून, उर्वरित पिकांना जपताना बुधवारी पाऊस कमी तर वारे जास्त आल्यामुळे उरली -सुरली पिकांचे नुकसान झाल्याने ऐन पोळ्याच्या सानापुर्वीच शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे.