दुष्काळाचे बाशिंग

बैलपोळ्याला कोरड्या दुष्काळाचे बाशिंग



नांदेड(अनिल मादसवार) बळिराजासाठी आनंदाची पर्वणी असलेल्या बैलपोळा सणानिमित्ताने शहरातील बाजारपेठ सजली आहे. बळिराजाचे दैवत आणि शेतीत राबणा-या बैलांना सजविण्यासाठी आवश्यक साहित्यांच्या दरात गतवर्षीच्या तुलनेत दीडपटीने वाढ झाली असून, मोठा पाऊस झाला नसल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतक-यांना वाढत्या महागाईत कोरड्या दुष्काळाच्या सावटाखाली हा सण साजरा करण्यासाठी कसरतच करावी लागणार आहे. तर बहुतांश शेतकरी साध्या पद्दतीने हा सन साजरा करून केवळ नैवेद्यावर समाधान मानण्याची वेळ आल्याचे सांगत आहेत. 

दर वर्षी श्रावण मासाची समाप्तीच्या अमावस्येदिवशी येणारा हा बैलपोळा सण यावर्षी सुद्धा त्याचा मुहूर्तावर आला आहे. शहरी भागात बैलपोळ्यास विशेष महत्त्व नसले तरी ग्रामीण भागात हा सण शेतकरी, सामान्य नागरिक, मजूरदार,व्यापारी अत्यंत उत्साहात साजरा करतात. या सणानिमित्ताने शहरातील जुना मोंढा, वजिराबाद रोड, यासह नांदेड रस्त्यावरील काही दुकाने महाराजा गोंडा, महाराणी गोंडा, काळा कंटा, कमरी, मटाटी, गजरा, घुंगर माळा, कवडी माळा, मणीमाळा, झुला, बाशिंग, सूत दोरी, नॉयलॉन दोरी अशा साहित्यांसह बैलांची शिंगे रंगविण्यासाठी आवश्यक असलेले विविध कंपन्यांचे वॉरनेश, बेगड, झुली, यासह अनेक साहित्यांनी सजली आहेत. शेतात वर्षभर राबणा-या बैलांना पोळ्याच्या पूर्व संध्येला नदी, नाल्यावर स्वच्छ धुवून खंडमळणी केली जाऊन घरधनींनीच्या हस्ते पूजा करून नैवद्य दाखविला जातो आणि मनोभावे पूजा करून, आज आवतान उद्या जेवायला असे निमंत्रण दिले जाते. 

परंतु या वर्षी म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील १६ तालुक्यांपैकी बहुतांश तालुक्यातील नदी, नाले, तलाव कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे काही तालुक्यात आजही पाणी टंचाई जाणवत असून, अनेक ठिकाणच्या नागरिकांची तहान टैन्कर द्वारे पाणी पुरवठा करून भागविली जात आहे. परिणामी जनावरांना भीषण चारा टंचाईचा सामना करावा लागत असून, पिण्यासच पाणी नाही तर बैल पोळ्यासाठी बैलांना घाईच बाकीटातील पाण्याने अंघोळ घालावी लागणार आहे.     

तसेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा बैलपोळ्यासाठी लागणा-या साहित्याच्या दरात दीडपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. गतवर्षी अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतक-यासमोर यंदाही अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती व चारा - पाणी टंचाईचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील कमी-जास्त रिमझिम पावसामुळे पाणी असलेल्या शेतकयांच्या शेतीतील पिके साधारण तर ७० टक्क्याच्या वरून पिके हातची गेली, तर पाऊस उशिरा झाल्याने १० टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी पाडीत पडल्याने शेतकरी संकटाच्या फे-यात सापडला आहे. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईचा सामना करणे जिकीरीचे ठरत आहे. त्यामुळे शेतक-यांसमोर हा सण साजरा करणे कसरतीचे ठरत आहे. शेतकरी जास्त किंमतीचे साहित्य खरेदी करण्याऐवजी कमी किंमतीचे लहान साहित्य खरेदी करीत असून, ते सुद्धा तुरळक प्रमाणात असल्याने साहित्य विक्रेते शेतकरी ग्राहकांच्या प्रतीक्षेत असल्याचे व्यापी वर्गातून सांगितले जात आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी