शालेय पोषण आहार प्रकरणातील शासकीय साक्षीदारास जीवे मारण्याची धमकी
पत्रकार संघटनेने केली आरोपींना अटक करण्याची मागणी
हिमायतनगर(वार्ताहर)नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील खव्वा सेंटरवर शालेय पोषण आहाराचे धान्य व साहित्य काळ्या बाजारात जात असताना पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले. सदर घटनेत शासकीय साक्षीदार म्हणून पत्रकार गोविंद गोडसेलवार हे होते. हि बाब आरोपीच्या लक्षात येताच सरसम गावातील त्यांच्या नातेवाईकांनी आमच्या विरोधात साक्ष का देतो असे म्हणत अंगावर धावून येत धक्का - बुक्की केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड - किनवट राज्य रस्त्यावरील सदगुरु खव्वा सेन्टरवर दि.१४ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शालेय पोषण आहारचे धान्य काळ्या बाजारात नेण्याच्या उद्देशाने उतरविताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले होते. यातील प्रमुख सूत्रधार हा चार जिल्ह्यांचा शालेय पोषण आहाराचा पुरवठाधारक गुत्तेदार प्रदीप चाडावार असून, त्यांच्यासोबत वाहतूकदार गिरिधर मदरेवार, खवा सेंटर मालक शंकर देशमुख, माजी सरपंच तथा विद्यमान ग्राम पंचायत सदस्य सुनील वानखेडे व तीन ते चार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ट्रक चालक शिवाजी तोंडसुरे, अशोक सुरनर, बालाजी पंढरीनाथ येरनाडे, यांना घटनास्थळी पोलिसांनी अटक केली आहे. पोषण आहार हेर - फेरी प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह बडे मासे पोलिसांना गुंगारा देवून अद्यापही पसार आहेत. यातील मुख्य आरोपी अटक पूर्व जामीन मिळविण्याच्या तयारीत आहेत, याबाबतचे वृत्त अनेक दैनिकातून प्रकाशित होताच, आरोपितांचे पित्त खवळले आहे. याचा राग मानता धरून सर्सम गावातील आरोपी असलेल्याचे नातेवाईक संतोष वानखेडे यांनी या घटनेतील साक्षीदार गोविंद गोडसेलवार यांना धमकी देवून पत्रकारितेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे. हि बाब निंदनीय असून, येथील मराठी तालुका पत्रकार संघ, प्रेस फोरम व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशील चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या घटनेतील साक्षीदार गोविंद गोसेलवार हे पत्रकार तथा इलेक्ट्रिक वायरमनचे काम करतात, त्यामुळे त्यांना ये - जा करताना रात्री उशीर होता, त्यामुळे आरोपींकडून व धमकी देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांकडून धोका होण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्या आरोपींवर कठोरातील कठोर कार्यवाही करून तातडीने अटक करावी. तसेच शालेय पोषण आहार काळा बाजार प्रकरणातील शासकीय साक्षीदार तथा पत्रकारास संरक्षण द्यावे अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे.