नांदेड ग्रंथोत्‍सवाची उत्‍साहात सांगता

मराठीचा अभिमान आणि अस्‍सल मराठीपण जपा 
ज्‍येष्‍ठ साहित्यिक प्रा. लक्ष्‍मीकांत तांबोळी यांचे आवाहन


नांदेड ग्रंथोत्‍सवाची उत्‍साहात सांगता 
ग्रंथ प्रदर्शन आणि विक्रीला प्रचंड प्रतिसाद 

नांदेड(अनिल मादसवार)आपल्‍या मराठीचा अभिमान बाळगतानाच आपली अस्‍सल मराठी जीवंत ठेवण्‍यासाठी सर्वांनी छत्रपतींच्‍या जयंतीदिनी निर्धार केला पाहिजे, असे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ मराठी साहित्यिक आणि राज्‍य भाषा सल्‍लागार समितीचे सदस्‍य प्रा. लक्ष्‍मीकांत तांबोळी यांनी केले. 'नांदेड ग्रंथोत्‍सव 2014' च्‍या सांगत समारंभात ते अध्‍यक्षस्‍थानावरुन बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्‍येष्‍ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव, राज्‍य साहित्‍य संस्‍कृती मंडळाचे सदस्‍य आणि कवी डॉ. सुरेश सावंत, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमवाड, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी, जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांची व्‍यासपीठावर उपस्थिती होती. 

महाराष्‍ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्‍ट्र राज्‍य साहित्‍य आणि संस्‍कृती मंडळ, जिल्‍हा परिषद नांदेड आणि जिल्‍हा माहिती कार्यालय नांदेड यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने 17 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत 'नांदेड ग्रंथोत्‍सव-2014' चे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यांची सांगता शिवछत्रपतींच्‍या जयंतीदिनी झाली. 
यावेळी बोलताना ज्‍येष्‍ठ इतिहास संशोधक डॉ. प्रभाकर देव म्‍हणाले की, मराठी भाषेतला पहिला ग्रंथाचा मान मराठवाड्याला आहे. शालीवाहन काळात 'गाथा शालीवाहन' हा सातशे कथांचा तो संग्रह होता. हा उज्‍वल ऐतिहासिक वारसा मराठीला आहे. 

डॉ. सुरेश सावंत यांनी ग्रंथाचे महत्‍व सांगून ग्रंथ विचारांची साठवणूक करतात म्‍हणून 'राकट देशा, कणखर देशा' प्रमाणे आता 'वाचकांच्‍या देशा' अशी आपली ओळख निर्माण झाली पाहिजे, असेही ते म्‍हणाले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी यु. ए. कोमावाड, प्रकाशक निर्मलकुमार सूर्यवंशी यांनीही मार्गदर्शन केले. तर प्रास्‍ताविकात जिल्‍हा माहिती अधिकारी अनिल आलूरकर यांनी ग्रंथोत्‍सवातील कार्यक्रमाचा आढावा घेतला. प्रारंभी शिवजयंतीनिमित्‍त छत्रपती शिवरायांच्‍या प्रतिमेचे पूजन सर्व मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

यावेळी ग्रंथोत्‍सवात घेण्‍यात आलेल्‍या निबंध स्‍पर्धा व वक्‍तृत्‍व स्‍पर्धेतील विजेत्‍यांना पारितोषिकांचे वितरण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाचे सुरेख संचालन पद्माकर कुलकर्णी यांनी केले तर व्‍यंकट कल्‍याणपाड यांनी आभार मानले. यानंतर ज्‍योती जैन आणि भरत जेठवाणी यांच्‍या संचाने सुगंध संस्‍कृतीचा हा सांस्‍कृतिक कार्यक्रम सादर केला. 

विजेते स्‍पर्धक 
-------------- 
नांदेड जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्‍यांसाठी 'मराठी भाषेच्या समृद्धीसाठी माझी भुमिका' या विषयावर वक्‍तृत्‍व स्‍पर्धेत प्रथम क्रमांक किरण देशमुख, द्वितीय अक्षय पंतगे, तृतिय क्रमांक मिलींद वाघमारे यांनी पटकावला आणि मुक्‍ता पवार, माणिक पावडे, बाबु जिंकलोड, सचिन मगर, अविनाश खैरगे यांना उत्‍तेजनपर पारितोषिके प्रदान करण्‍यात आली. 

शासकीय कार्यालयातील कर्मचा-यांसाठी 'मराठी भाषा ही शासकीय कामकाजात समृद्ध कशी होईल' या विषयावर आयोजित निबंध स्‍पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती ज्‍योती कदम, द्वितीय क्रमांक पी. एच. रावके आणि तृतीय क्रमांक श्रीमती सारिका कदम यांनी पटकावला तर श्रीमती संध्‍या तुंगेवार, स्‍नेहलता स्‍वामी, राम शेळके, शिशिर सिबदरकर यांना उत्‍तेजनपर पारितोषिके प्रदान करण्‍यात आली. सर्व विजेत्‍यांना रोख पारितोषिके, सन्‍मा‍नचिन्‍ह आणि प्रशस्‍तीपत्रे देवून गौरविण्‍यात आले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी