मराठीच्या विकासासाठी एकत्रितरित्या कार्य करणे गरजेचे – माजी खासदार, साहित्यिक डॉ. भालचंद्र मुणगेकर -NNL


मुंबई|
“ग्रंथालये ही मराठी वाचन संस्कृतीचे, विचार मंथनाचे, साहित्याचे, नाटक-शास्त्राचे, भावजीवनाची केंद्र व्हावीत. मराठीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितरित्या कार्य करावे”, असे प्रतिपादन मुंबई मराठी ग्रंथ चे उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात मुंबई शहर ग्रंथोत्सव 2022 चे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथोत्सवादरम्यान देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदान करण्यात आले. यावेळी साहित्यिक, शिक्षणतज्ज्ञ, माजी खासदार डॉ. मुणगेकर बोलत होते.

मराठीतील दुर्मिळ ग्रंथांच्या प्रदर्शनाचे यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी उद्घाटन केले. या प्रदर्शनात विविध भाषांतील तसेच मराठीतील २०० पेक्षा अधीक काळ जुने ग्रंथ ठेवले आहेत. कार्यक्रमाला राज्य शासनाच्या दर्शनिका विभागाचे सचिव डॉ. दिलीप बलसेकर, व्याख्याते प्राध्यापक डॉ. राजेंद्र कुंभार आणि महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.मुणगेकर म्हणाले की, मराठीच्या वाढीसाठी मुंबई ग्रंथालयाने अधिक कार्यक्रम करावेत. वाचनप्रेमी निर्माण करावेत. २०० वर्षे जुने ग्रंथ आणि सर्वांत जास्त ग्रंथसंपदा या ग्रंथालयात आहे. या ग्रंथांतील विचार सर्वदूर पोहोचविणे गरजेचे असून, त्यांसाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. डॉ. बलसेकर म्हणाले की, माहिती व तंत्रज्ञान युगात आपण कार्यरत आहोत. मात्र, ग्रंथांशिवाय पर्याय नाही.  वाचन संस्कृती रूजविणे आणि वाढविणे गरजेचे आहे. “महाराष्ट्राचे ७५ समाजसुधारक आणि विचारवंत” हे पुस्तक आपण लवकरच प्रकाशित करीत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ग्रंथोत्सवात बालकथांपासून, शासकीय ग्रंथ, लोकनेत्यांचे चरित्र, महापुरूषांची आत्मचरित्र, विज्ञान आधारित कथा, स्त्री प्रधान साहित्य, संत साहित्य, राजकारण, पत्रकार लिखीत पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराजांची गाथा, प्रबोधनकार, गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे साहित्य, कविता, अभंग, ललित, गुढ कथा, भारतीय साहित्याच्या निर्मात्यांची ओळख, नवतंत्रज्ञान, पत्रकारिता, राज्याचा इतिहास उलगडणारे साहित्य असे विविध ग्रंथ विद्यार्थ्यांना पहायला मिळाली.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी