नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रचेतना-२०२२ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात फुले-शाहू-आंबेडकर यांच्या सामाजिक कार्याचा जागर कलावंतांनी जलसा या कलाप्रकारातून प्रेक्षकांसमोर उजागर केला.
लोकशाहीर वामनदादा कर्डक मुख्य मंचावर मंगळवारी जलसा कलाप्रकार सादर झाला. आंबेडकरी आणि सत्यशोधकी जलासातून स्पर्धकांनी महापुरुषांचे प्रबोधनात्मक विचार आणि कार्य गायनाच्या माध्यमातून मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, वंचितांसाठी केलेले सामाजिक कार्य त्याचबरोबर शिक्षणामुळे झालेला विकास जलस्यातून पुढे आला.
जळकोटच्या संभाजी केंद्रे महाविद्यालयाच्या स्पर्धकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट, चवदार तळे, दीक्षा भूमी, याचा इतिहास गायनाच्या माध्यमातून मांडला. 'त्यांनी भारताचा घटनाकार झाला माझा भीमराव' हा जलसा सादर केला. 'बा भीमा तूच माझा बाप, तूच माझी माय' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक कार्याचा आलेख श्री हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीरच्या भाग्यश्री आचार्य, मनीषा गायकवाड, समीक्षा काळे, चैतन्य जोशी, यांनी सादर केला.
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या 'रक्त पिणारे सारे सारे, मी वादळवारा' हा जलसा शिवानंद कांबळे, शुभांगी कांबळे, सीमा कांबळे, वैष्णवी निरखिले, इंदू पटके, राधा सोळुंके, यांनी पहाडी आवाजात सादर केला. दयानंद विधी महाविद्यालय लातूरच्या अपेक्षा डाके, शुभम बिराजदार, ;चिन्मय पिटके, श्रुती कसवे, अनिकेत शीतले, रुखसानी रजक या स्पर्धकांनी तुला भीम म्हणावं की, भीमराव म्हणावं हा कार्याची महती सांगणारा जलसा सादर करून प्रेषक मंत्रमुग्ध केले. तर शिवाजी महाविद्यालय, परभणीच्या शाहीर प्रथमेश दळवी यांनी आंबेडकरी चळवळ आणि संविधानाचा जागर जलाशयातून उजागर केला.
'जगात देखणी बाई माझ्या भीमाची लेखणी' हा जलसा महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपुरच्या युवती कलावंतांनी गाऊन सादर केला. संविधानाने स्वतंत्र समता बंधुता ही मूल्य दिल्याची जाणीव करून दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतावादी समाज रचना प्रस्तापित केल्याचे जलस्याच्या माध्यमातून मांडले. हा जलसा ऐश्वर्या पांचाळ, अंबिका शास्त्री, श्वेता कच्छवे मयुरी चिळकटवर, वैष्णवी सावरगावकर, आदींनी सादर केला. नांदेड येथील नारायणराव चव्हाण विधी महाविद्यलयाच्या श्रुती सरपते, रमा हटकर, अमित थोरात, भास्कर हस्सेकर, अजित सोनकांबळे, शिवाणी जोगदंड यांनी जलशातून मतदानाचा अधिकारा विषयी प्रबोधन केले. तर बळीराम पाटील महाविद्यालय, किनवटच्या स्पर्धकांनी आंबेडकरी जलसा सादर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक आणि राजकीय कार्याचा पट उलगडून दाखविला.
यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, अधिष्ठाता डॉ. एल . एम. वाघमारे, डॉ. अजय टेंगसे, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विद्यार्थी विकास विभागाचे संचाकल डॉ. सूर्यप्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. विजय पवार, सल्लागार समिती सदस्य डॉ. अंबादास कदम यांची विशेष उपस्थिती होती.
जलसा कलाप्रकारातून लोककवी वामनदादा कर्डकांचे स्मरण
'राष्ट्रचेतना- २०२२' च्या आंतर महाविद्यलयीन युवक महोत्सवाच्या मुख्य मंचास लोककवी तथा लोकशाहीर वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात आले आहे. वामनदादा कर्डक यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याची कास धरून त्यांची विचार मूल्य लोकमानसात रुजविण्याचा प्रयत्न केला. युवक महोत्सवातील आंबेडकरी आणि सत्यशोधकी जलशातून स्पर्धकांनी सामाजिक मूल्य उजागर केली. विद्यापीठाने यावर्षी महाविद्यलयानी जलसा कलाप्रकार सादर करतांना तो विशिष्ठ संहितेत असावा याबाबत सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखाची कार्यशाळा घेतली होती. याच संहितेत जलसा कलाप्रकार सादर झाला. त्यास प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.