नांदेड| असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ई श्रम कार्ड उपलब्ध करुन देण्या संदर्भात कामगार संघटनांनी जनजागृती करावी असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त सय्यद मोहसीन यांनी केले.केंद्र सरकारने असंघटीत क्षेत्रातील कामगारांना ई श्रम कार्ड जनजागृतीसाठी सेवा सप्ताह निमित्त विविध कामगार संघटना पदाधिकार्यांची बैठक सहाय्यक कामगार आयुक्त सय्यद मोहसीन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात पार पडली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, ई श्रम कार्ड द्वारे केंद्र सरकारने सध्या नैसर्गिक मृत्यू व अपघातातील नुकसान भरपाईसह सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. कामगारांचा विम्याचा प्रिमीयम केंद्र सरकार भरत असून याचा लाभ कामगारांना होत आहे.
नांदेडमध्ये एका मृत कामगाराला 2 लाख तर अपघातग्रस्त कामगाराच्या खात्यावर 1 लाख रुपये जमा झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना सरकारच्या विविध योजनेत सहभागी करुन घेण्यासाठी ई श्रम कार्ड अत्यंत उपयुक्त आहे. या निमित्ताने असंघटीत क्षेत्रातील कामगारांची नोंद शासन दरबारी केली जात आहे. कामगार संघटनांनी आपापल्या पातळीवर पुढाकार घेवून ई श्रम कार्ड बद्दल असंघटीत क्षेत्रातील कामगारांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन मोहसीन यांनी यावेळी केले. या बैठकीस सरकारी कामगार अधिकारी अविनाश देशपांडे यांच्यासह कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, फारुख अहेमद, विष्णू गोडबोले, ऍड.श्रीधर कांबळे, देशमुख यांच्यासह कामगार क्षेत्रातील कार्यकर्ते उपस्थित होते.