किनवट, माधव सूर्यवंशी| सोयाबीनवरील पिवळा मोझॅक (केवडा) रोगाच्या प्रादुर्भावामुळे सिरमेटी येथिल गोपीनाथ येनगे या शेतकर्याचे दहा एक्कर सोयाबीन वाया गेले. जवळपास सातही मंडळातील शेतकर्यांना कमी-अधिक प्रमाणात फटका बसला आहे. परिणामी सोयाबीनच्या उत्पन्नात ७५% ची घट होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे कृषी विभागाने यापुर्वी कळवले होते.
केवडा रोग हा विषाणूमुळे होतो आणि त्याचा प्रसार पांढरी माशी करते. सुरुवातीला याचा प्रादुर्भाव कमी असतांनाच लक्ष नाही दिले तर खूप मोठ्या क्षेत्रावर प्रादुर्भाव होऊ शकतो. विशेषतः ज्या शेतकर्यांनी केडीएस.७२६ या वाणाची पेरणी केली त्यांनी वेळीच लक्ष द्यावे. कारण मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण करणे सोयीचे होणार नाही. त्याचा अनिष्ठ परिणाम होऊन सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची संकेत तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडेंनी दिले होते. अगदी त्याचा तंतोतंत प्रत्येय सिरमेटीतील गोपीनाथ येनगेंसह प्रधानसांगवी, दाभाडी, बोधडी, पार्डी, निसपूर, अंबाडीसह सातही मंडळातील शेतकर्यांना आल्याचे चित्र दिसते.
सततच्या अतीपावसामुळे शेतकर्यांना वेळोवेळी खताचीमात्रा, किटकनाशकाची फवारणी, निंदन आणि डवरणी करता आली नाही. दुबार ते तिबार पेरणीचे संकट, पुराच्या पाण्यामुळे पिकांसह जमिनी खरडल्या अशा संकटाचा मारा झेलत असतांनाच सोयाबीनही पिवळ्या रोगाने हातच गेल्यात जमा आहे. कापसाच्या उत्पादनाचाही मार बसून मागच्या वर्षी सारखाच उतारा येण्याची लक्षणे दिसत असल्याने शेतकरीराजा चिंताक्रांत दिसत आहे.
