नांदेड| महिला कुटुंबाचा महत्वाचा घटक असून महिलांच्या सहभागातून कोणताही कार्यक्रम यशस्वी करण्यात येतो. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या हर घर तिरंगा या उपक्रमामध्ये जिल्ह्यातील महिलांचा सहभाग मिळवण्यासाठी गाव स्तरावरील महिला बचतगटांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले.
आज सोमवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी आभासी पद्धतीने जिल्ह्यातील सर्व स्वयंसहायता समूहातील महिलांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे त्या म्हणालया, भारताला स्वातंत्र्य मिळून देताना अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहे. या स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून गेल्या 75 वर्षात भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणे हा आपल्या सर्वांसाठीच अभिमान आणि गौरवाचा क्षण आहे.
अमृत महोत्सवाचा हा सोहळा संपूर्ण देशभर आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्याच्या आपण साक्षीदार ठरणार असून बचत गटातील प्रत्येक महिलांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा तसेच गावस्तरावर जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करून harghartirangananded.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. बचतगटामार्फत गाव स्तरावर तिरंगा झेंडे तयार करून विक्री करावी. यातून बचत गटांना उत्पन्न देखील मिळणार आहे. विशेष: 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये हर घर तिरंगा म्हणजेच घरो घरी तिरंगा या उपक्रमात महिलांच्या हातून झेंडा फडकवला जावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांनी यावेळी माहिती दिली. ते म्हणाले, महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी आखणी केली आहे. स्वयं सहायता मार्फत तिरंगा झेंडे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे गाव पातळीवरच तिरंगा झेंडा उपलब्ध होणार आहे. प्रत्येकाने घरो घरी तिरंगा या उपक्रमात सहभागी होऊन स्वतःचे घर, कार्यालय येथे अभिमानाने तिरंगा फडकवून हे अभियान यशस्वी करावे असेही ते म्हणाले.
महाराष्ट्र जीवनोन्नती अभियानांतर्गत नांदेड जिल्ह्यात 16 हजार 296 स्वयं सहायता समूह असून यात 1 लाख 60 हजार महिला जोडल्या गेल्या आहेत. तसेच जिल्ह्यामध्ये स्वयं सहाय्यता समूहाचे 720 ग्राम संघ आणि 41 प्रभाग संघ स्थापन करण्यात आलेले आहेत. स्वयं सहायताच्या माध्यमातून जिल्ह्यात हर घर तिरंगा या उपक्रमासाठी गृह भेटीतून जनजागृती केली जात आहे.