हदगाव| महाराष्ट्र राज्य सरकारने विद्युत बिल वाढविण्याचा व अधिभार लावण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. त्या निर्णयामुळे विनाकारण गोरगरीब जनता, व्यापारी, उद्योजक, नोकरदारांना आर्थिक विवंचनेत टाकणारा हा निर्णय आहे. सततच्या वाढत्या महागाईने बेरोजगार, शेतकरी, मजुरदार हे हैराण झालेले असताना त्यात वीज दरवाढ करुन त्यांच्या समस्येत राज्य शासनाने अधिकची भर घातली असल्याचा आरोप हदगांव आम आदमी पार्टीच्यावतीने करण्यात आला आहे.
जनतेची आर्थिक लूट करण्यात पटाईत झालेल्या महाराष्ट्र सरकारला धडा शिकविण्यासाठी आम आदमी पार्टी तालुका शाखा हदगाव जि. नांदेड च्या वतीने भरपावसात निदर्शने करण्यात आली. तसेच यावेळी आपल्या निषेधाचे निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तहसीलदार हदगाव यांच्यामार्फत पाठविण्यात आले आहे. यावेळी निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालयात कार्यकर्ते गेले असता त्याठिकाणी तहसीलदार यांच्याऐवजी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील उपस्थित होते. त्यांनी हे निवेदन स्वीकारले आणि आमचे म्हणणे मुख्यमंत्री यांना कळविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तहसील कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार हराळे यांनी निवेदन स्वीकारले. तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यालय प्रमुख बी.बी. हंबर्डे यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी आंदोलन करणार्या आम आदमी पार्टी च्या कार्यकर्त्यांना हदगाव पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस कॉन्स्टेबल वाय.के. राठोड यांनी चोख बंदोबस्त व संरक्षण दिले. यावेळी हदगाव तालुका संयोजक नागोराव गंगासागर, तालुका सचिव प्रा. शिवाजी जोजार पाटील, सहसचिव गिरीश गायकवाड पाटील, सहकोषाध्यक्ष विलास कांबळे, सदस्य सचिन काळे पाटील, कार्यकर्ते मारोती वारकड तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनामुळे सामान्य नागरिकांवर टाकले जाणारे दरोडेखोर सरकारचे कारनामे जनतेच्या लक्षात येत असल्याचे बोलले जात आहे.