स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षी देखील ज्येष्ठांची प्रतारणाच....! -NNL


जगात कुठल्याही देशाची संस्कृती, प्रगती तथा सुबत्ता त्या देशांतील ज्येष्ठ नागरिकांच्या राहणीमानावर ठरवण्यात येते. त्या देशातील किंवा राष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक किती सुखी तथा आनंदी जीवन जगतो यावर त्या देशाचीप्रगती गणली जाते. जगात आणि भारतातही ज्येष्ठ नागरिकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज जगात, भारतात तथा महाराष्ट्रात एकूण जनसंख्येच्या 18 टक्के ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. महाराष्ट्रात दीड कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. ज्येष्ठ नागरिकांपैकी अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरीरीने भाग घेतलेला आहे. कुटूंब, तांडा, माडा, वस्त्या, गाव, तालुका, जिल्हा, विभाग, प्रदेश तथा देश (राष्ट्र) उभारणीतही ज्येष्ठ नागरिकांचा सिंहाचा वाटा आहे. आज घर (कुटूंब) तिथे किमान एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत. राष्ट्रीय सणात किंवा कार्यक्रमात, स्थानिक स्वराज्य संस्था तथा सार्वत्रिक निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांचा 100 टक्के सहभाग असतो.


नोंदणीकृत आणि अनोंदणीकृत एकूण ज्येष्ठ नागरिकांपैकी फार मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागात राहतात. आदिवासी तथा अतिदुर्गम भागात राहणारांची संख्या सुद्धा बरीच मोठी आहे. त्यातही विधवा ज्येष्ठ महिलांची संख्या लक्षणीय आहे. जगात व भारत देशातही महाराष्ट्र राज्य सोडले तर ज्येष्ठ नागरिकांचे वय वर्ष 60 ग्राह्य धरले जाते. जगभरातील सर्व राष्ट्रात व भारत देशातील महाराष्ट्र राज्य सोडले तर इतर सर्व राज्यात ज्येष्ठ नागरिक धोरण अंमलात आणले जाते. अनेक शेजारील राज्यात ज्येष्ठांना मानधन दिले जाते. पण शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा असलेल्या महाराष्ट्र या पुरोगामी तथा प्रगत राज्यात ज्येष्ठांना मानधन दिले जात नाही. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अर्थात फेस्कॉम या ज्येष्ठ नागरिक संघटनेने गेली 30-35 वर्षापासून ज्येष्ठांचे प्रलंबित प्रश्न सोडवून घेण्यासाठी पाठपुरावा केला आहे व करत आहे. त्यासाठी आंदोलने व हजारो ज्येष्ठ नागरिकांचे मोर्चे पण काढले.आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सर्वांना निवेदने दिलेली आहेत. दिली जात आहेत. देशाच्या पंतप्रधानांना पण निवेदन दिलेली आहेत. सर्वपक्षीय आमदारांना प्रमिलहा स्वतःचे मानधन एकताने वाढवून घेता येते. घेतले आहेत.पण गरजू, दुर्बल, हतबल, दुर्लक्षीत, उपेक्षित, वंचित शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी, कामगार महिला पुरूष ज्येष्ठ नागरिकांना मानधन देणे ही त्यांना किरकोळ तथा क्षुल्लक बाब वाटली असावी.

खरं तर ज्येष्ठ नागरिक ही राष्ट्रीय संपत्ती आहे. अनुभवाचा सागर आहे. तो देश तथा राष्ट्राचा आरसा आहे. त्यांत देशाची प्रगती, संस्कृती तथा सुबत्ता प्रतिबिंबित होत असते.ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिकांना अन्न, पाणी, वस्त्र, निवारा, आरोग्य सुविधा आदी मूलभूत सुखसोई सुद्धा नाीत. दोन वेळेचे जेवण व चहापाणी सुद्धा मिळत नाही. राहण्यास निवारा नाही. अंगावर कपडा नाही. जवळ कोणी नातेवाईक नाही. चावडी, ग्रामपंचायत कार्यालय तथा मंदिराच्या पायर्‍या अशा सार्वजनिक ठिकाणी ते कसे बसे जीवन कंठत आहेत. अंगातले त्राण गेलेले आहे. नातेवाईक भीक मागू देत नाही. कुणी काम मागितले तर काम देत नाहीत व भीकही देत नाहीत. विषप्राशन करून जीवन यात्रा संपवावी म्हटलं तर विष विकत घेण्यासाठी जवळ दमडी नाही. ऐपत नाही. केवळ मरणाची वाटप पाहत केविलवाणी सडत पडलेले आहेत. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठांच्या न्याय मागण्या आहेत. आम्हीही भारतीय नागरिक आहोत. ज्येष्ठ धोरण महाराष्ट्रात अंमलात जाणले जावे. इतर राज्याप्रमाणे आमची वयोमर्यादाही 60 वर्षच गृहीत धरली जावी. गरजूू दुर्लक्षीत उपेक्षितांना तथा वंचिताुंना 3500 रू. प्रति मला मानधन देण्यात यावे. घटनाकार प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या 41 व्या कलमानुसार आमचे भरण, पोषण, सांभाळ व संरक्षण आणि इतरही सुविधा आम्हास प्राप्त करून द्याव्यात एवढेच.

विशेष म्हणजे जवळ जवळ 60 टकके आमदार, खासदार, मंत्री ज्येष्ठ आहेत. त्यांचे आई-वडील, जवळचे नातेवाईकही ज्येष्ठ आहेत. पण त्यांच्याकडून ज्येष्ठांच्या मागण्या मान्य करून अंमलात जाणल्या जात नाहीत. ज्येष्ठांची आजही केवळ चेष्टा, कुचेष्टा, थट्टा तथा प्रतारणा केली जाते. ज्येष्ठांच्या मागण्याकडे केवळ दुर्लक्ष केले जाते. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तरी शासनाने ज्येष्ठांच्या न्याय मागण्या मान्य करून धोरण अंमलात जाणावे व ज्येष्ठांना सन्मान करावा. राखावा. आम्ही सुद्धा घर घर ज्येष्ठ नागरिक, घर घर तिरंगा आनंदाने साजरा करू. येत्या पावसाळी अधिवेशनात आमच्या मागण्यावर विचार व्हावा अन्यथा तरू किंवा मरू या न्यायानी आम्हास शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून प्रशासकीय कार्यालयासमोर अन्न-पाणी त्याग आंदोलन केल्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. त्यांतच आता अतिव्रष्टी झालेली आहे. आता जगाव तरी कसं? हा यक्ष प्रश्न आमच्यासमोर उभा आहे. तेव्हा आम्हा ज्येष्ठ नागरिकांना न्याय द्या! आमची प्रतारणा त्वरित थांबवा! आमची चेष्टा, कुचेष्टा, उपासमार, प्रतारणा थांबवा! आमचा आक्रोश त्वरित ओळखार!


....डॉ.हंसराज वैद्य, अध्यक्ष, सहयोग ज्येष्ठ नागरीक संघ (फेस्कॉम) , नांदेड. मो.9423138385

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी