माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळे सिंचनाचा अनुशेष दूर
नांदेड| महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अडीच वर्षांच्या कार्यकाळात राज्याच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेता आले. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे नांदेडसह मराठवाड्यातील जुने आणि रखडलेले सिंचन प्रकल्पाचे प्रश्न मार्गी लावले याचे आपल्याला समाधान वाटते, असे प्रतिपादन राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज (दि.14) येथे केले.
शहरातील कुसुम सभागृहात गुरुवारी दैनिक सत्यप्रभाच्या वर्धापन दिनानिमित्त कै. साै. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कारांचे वितरण तसेच देशाचे माजी गृहमंत्री श्रद्धेय डॉ. शंकराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची माहिती असलेल्या दै. सत्यप्रभाच्या विशेष पुरवणीचे प्रकाशन माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हाेते. विशेष अतिथी म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक महेश काेठारे, तरुण पिढीतील आघाडीचे अभिनेते, दिग्दर्शक आदिनाथ काेठारे तसेच कै. साै. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्काराप्राप्त रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, लष्करी अधिकारी कॅप्टन स्वाती महाडिक, उद्याेजक शेखर देसरडा व सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हेसेकर यांची उपस्थिती होती. पुरस्कार प्राप्त पर्यावरणवादी विचारवंत डॉ. विश्वंभर चाैधरी काही काैटुंबिक अडचणीमुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत.
माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, की तुटीच्या सिंचन प्रकल्पाचा प्रश्न सोडवल्यानंतरच अन्यत्र पाणी वळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुकणे धरणातून १० ते १२ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी आणण्याचा प्रस्ताव आहे.तसेच वरील भागातील वळण बंधाऱ्याला गती देण्यात आली असून यातून मराठवाड्याचा पाण्याचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून आम्ही केला. नांदेड जिल्ह्यातील १४ प्रकल्पांना अलीकडेच मान्यता दिली असून टेंडर प्रक्रिया सुरु असल्याने लवकरच या कामांना प्रारंभ होणार आहे. नांदेडसह मराठवाड्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार हाेते. त्यावेळी व्हॅट ही कराची रचना अस्तित्वात हाेती. त्यावेळी आमच्या सरकारने अन्नधान्यांवर कर नकाे अशी भूमिका घेतली हाेती.
त्यामुळे आमच्या सरकारच्या काळात अन्नधान्याच्या किंमती वाढल्या नाहीत. उलट आज माेदी सरकारने विविध प्रकारच्या अन्नधान्यावर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे. यातून माेदी सरकार गरिबांचे अन्न महाग करत असल्याची टीकाही त्यांनी केली. देशात महागाई टोकाला पोहाेचली असताना याकडे प्रसार माध्यमांचे दुर्लक्ष होत आहे. सरकारला अपेक्षित तेच जनतेपर्यंत पोहाेचविण्याची व्यवस्था सरकारने या माध्यमातून केली आहे. मात्र, केंद्राची ही हुकूमशाही वृत्ती लोकशाहीला मारक आहे. अशा प्रवृतीच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहणार आहे. मंत्रिपदाच्या वेळी घेतलेल्या शपथेचा विसर आजच्या केंद्र सरकारमधील मंत्र्यांना पडला आहे. लोकनियुक्त सरकार पाडणे आणि आपले सरकार आणणे असा नवा लाेकशाहीला घातत असा प्रघात भाजपा सरकारच्या माध्यमातून सुरु झाला आहे.
काेणत्याही परिस्थितीत आपल्या पक्षाचे सरकार पाहिजे या वेड्या हव्यासापाेटी भाजपाने देशातील नऊ राज्यांतील सरकारे अशा प्रकारे पाडली आहेत. अशी सरकारे तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही पाडत असाल आणि तुमच्या पक्षाचे सरकार स्थापन करत असाल तर निवडणुका घ्यायच्याच कशाला असा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला. केंद्रीय यंत्रणाचा गैरवापर आज जेवढा केला जात आहे ताे कधीही झाला नव्हता. डाॅ. शंकरराव चव्हाण केंद्रात अनेक वर्षे गृहमंत्री हाेते. मात्र, त्यांच्या काळात कधीही ईडीसारख्या यंत्रणांची माहिती ग्रामीणच काय शहरी भागातील जनतेला सुद्धा नव्हती. तेव्हा केवळ बीडी हा शब्द ग्रामीण भागात माहिती हाेता. मोदी सरकारच्या काळात सर्वांनाच ईडीची माहिती झाल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
२०२४ ला आम्हीच येऊ
शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही गेली अडीच वर्षे प्रयत्न केले. आता विरोधी पक्षात असलो तरी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. या सर्वसामान्य जनतेच्या बळावरच पुन्हा मी नव्हे तर आम्ही २०२४ ला सत्तेत येऊ असा विश्वास जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात व्यक्त करताच उपस्थितांनी जाेरदार टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.
डॉ. शंकराव चव्हाण प्रेरणादायी व्यक्तिमत्व
देशाचे माजी गृहमंत्री डॉ. शंकराव चव्हाण यांनी सिंचनासह विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केले आहे. सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतल्यानंतर ते त्या निर्णयावर ठाम राहायचे. स्वाभीमानी आणि या ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाची प्रेरणा आगामी पिढीसाठी महत्वाची असून आम्ही सर्वजण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊनच काम करत आहाेत, असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांना अडचणींतून बाहेर काढण्याची गरज - माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण
देशातील सध्याच्या दूषित वातावरणातून बाहेर पडण्यासाठी विचारवंतांच्या विचारांची व वैचारिक बांधिलकीची गरज आहे, असे सांगतानाच मराठवाड्यातील पाण्याचा अनुशेष आम्ही गेल्या अडीच वर्षांत भरुन काढण्याचा प्रयत्न केला. यात आणखी काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी केले. डॉ. शंकरराव चव्हाण यांनी केलेले कार्य व त्यांचे विचार घेऊनच आम्ही मार्गक्रमण करीत आहोत. देशातील शेतकरी, वंचित, शोषितांच्या न्याय मागण्यांसाठी आमचा लढा असाच चालू राहील. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षाच्या काळात सर्वाना न्याय देण्याच्या प्रयत्न केला. आता विरोधी पक्षात असताना सामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी प्रयत्न केले जातील. गेल्या काही दिवसांपासूनच्या अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक जनावरे वाहून गेली. काही ठिकाणी जीवितहानी झाली. अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱी बांधवांना या अडचणींतून बाहेर काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असेही अशाेकराव चव्हाण म्हणाले.
पावसाळ्यात काेकण, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातून समुद्रात वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळवण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने अगाेदरच केला हाेता. आता नवे सरकार ते करत असेल तर आम्ही स्वागतच करताे. वाॅटर ग्रीड, नदीजोड प्रकल्प आणि तुटीच्या प्रकल्पाचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. त्यांच्या निर्णयामुळे नांदेडसह मराठवाड्यात अनेक सिंचन प्रकल्पांना मान्यता मिळाल्याचा उल्लेखही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केला. कै. साै. कुसुमताई चव्हाण पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याचा माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांनी आपल्या भाषणात गाैरव केला.
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना पतीला वीरगती प्राप्त झाली असतानाही कॅप्टन स्वाती महाडिक यांनी सर्व काैटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून पुन्हा लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेऊन देशातील महिला आणि तरुणींसमाेर मोठा आदर्श ठेवला आहे. हा पुरस्कार त्यांना देताना आम्हालाही विशेष आनंद हाेत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक, डॉ. दीपक म्हैसेकर, शेखर देसरडा, डॉ. विश्वंभर चाैधरी यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करुन या व्यक्तींनी परिश्रमातून, चिकाटीने आणि एका ध्येयाने प्रेरित हाेऊन आपआपल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेली आहे. हे सर्वच पुरस्कारप्राप्त मान्यवर देशाचा गाैरव आणि अभिमान आहेत. अभिनेते आणि दिग्दर्शक महेश काेठारे आणि त्यांचे पूत्र अभिनेते आदिनाथ काेठारे यांनी चित्रपटांच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्व निर्माण केले आहे. पाणी विषयावर त्यांनी एक चित्रपट तयार केला असून त्याचे चित्रीकरण नांदेड जिल्ह्यात झाले आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित हाेणार आहे, असेही माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण म्हणाले.
जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर झाला
जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष वाढला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गेल्या अडीच वर्षात माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या कामांना मान्यता दिली. अनेक कामे झाली. काही प्रस्तावित आहेत. तर काही कामे अंतिम टप्प्यात आहेत. यातून जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष बऱ्याच प्रमाणात दूर झाला आहे, असेही माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले. सर्व मान्यवरांचे स्वागत दै. सत्यप्रभाचे कार्यकारी संपादक संताेष पांडागळे, संचालक संदीप पाटील, सल्लागार बालाजी जाधव, सल्लागार सीए मनाेहर आयलाने, मुख्य संपादक शिवानंद महाजन यांनी केले. प्रास्ताविकात कार्यकारी संपादक संतोष पांडागळे यांनी दै. सत्यप्रभाच्या वाटचालीचा आढावा मांडला.
प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आ. अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आ. साै. अमिताताई चव्हाण, आ. मोहनअण्णा हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, आ. जितेश अंतापूरकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. गंगाधरराव पटणे, किशाेरअप्पा पाटील, गुलाबराव भाेयर, महापौर सौ. जयश्री पावडे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष गाेविंदराव शिंदे नागेलीकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ उपाध्यक्षा डाॅ. साै. मीनलताई पाटील खतगावकर, मारोतराव कवळे यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती हाेती. पावसाचे वातावरण आणि अनेक ठिकाणी संपर्क तुटलेला असताना, रस्ते वाहतुक बंद असताना केवळ नांदेड शहर आणि जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतूनच नव्हे तर विविध ठिकाणाहून डॉ. शंकरराव चव्हाण यांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर, आजी-माजी लाेकप्रतिनिधी, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित हाेते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुणाल रेगे यांनी केले. सीए मनाेहर आयलाने यांनी आभार मानले.
हभप रामराव महाराज यांनी जिंकली मने
सध्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाचा नेमका वेध घेत रामायणाचार्य रामराव महाराज ढाेक यांनी आपल्या मनोगतात सर्वांची मने जिंकली. आजच्या महाभारतासारखी परिस्थिती निर्माण झालेल्या वातावरणात रामायणाची कशी गरज आहे हे त्यांनी काही उदाहरणे देऊन पटवून दिले. प्रभू श्री रामांनी प्रथम सज्जनांची एकजूट केली, नंतर दुर्जनांचा संहार केला आणि नंतर रामराज्य स्थापन केले हे सांगतानाच रामराव महाराज यांनी आजही देशभरातील सज्जनांची अशीच एकजूट आवश्यक असल्याचे आग्रही प्रतिपादन केले. डॉ. शंकरराव चव्हाण केंद्रीय अर्थमंत्री असताना आळंदीला आले हाेते.
त्यावेळी आळंदीच्या इंद्रायणी नदीवरील घाटांची दुरवस्था झालेली हाेती. त्या कार्यक्रमात धुंडा महाराज देगलूरकर यांनी ही बाब डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी केलेल्या भाषणात डॉ. शंकरराव चव्हाण यांनी लगेच या घाटासाठी निधी मंजूर केल्याची घोषणा केली. आजही हे घाट डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या कार्याची साक्ष देतात अशी आठवणही रामराव महाराज ढोक यांनी सांगितली. जगाचा पाेशिंदा असलेला शेतकरी आणि भारतीय सीमेवर 24 तास आपल्या देशाचे संरक्षण करणारे सैनिक यांच्याबद्दल नेहमी आत्मीयता बाळगा. दुपारी जेवताना तुम्हाला शेतकरी आठवला पाहिजे तर रात्री झोपताना सैनिकाची आठवण राेज झालीच पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. देशातील विशेषतः महाराष्ट्रातील अलीकडे घडलेल्या सत्तांतरावर रामराव महाराज यांनी सज्जनांची एकजूट कशी आवश्यक आहे हे पटवून दिले.
उद्योजक शेखर देसरडा यांनी डॉ. शंकरराव चव्हाण आणि कै. साै. कुसुमताई चव्हाण यांच्याबरोबरच्या काही आठवणींना उजाळा दिला. आपले वडील चंपालालजी देसरडा यांच्याबराेबर आणि नंतर उद्याेग-व्यवसायानिमित्त डाॅ. शंकरराव चव्हाण यांना भेटण्याचा योग आला. या भेटीत डॉ. शंकरराव चव्हाण यांचे कणखर आणि शिस्तप्रिय नेतृत्व आपल्याला जवळून अनुभवता आले. केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना डाॅ. शंकरराव चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयांचे महत्व किती आहे याची जाणीव आजही आपल्याला हाेते, हेही शेखर देसरडा यांनी सांगितले.
सेवानिवृत्त सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी नांदेड महापालिकेचे आयुक्त, पुण्याचे विभागीय आयुक्त आणि सेवानिवृत्तीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बराेबर काेविड व्यवस्थापनात काम करताना आलेल्या अनुभवांना उजाळा दिला. डॉ. शंकरराव चव्हाण आणि आपले वडील कै. डॉ. गाे. रा. म्हैसेकर यांच्या त्यावेळी अनेकदा भेटी होत. त्या भेटीत किंवा नंतर आपल्या प्रशासकीय कारकिर्दीतही डाॅ. शंकरराव चव्हाण यांचा मलाही सहवास लाभला. अगदी वयाच्या पाचव्या वर्षी माझा पहिला फाेटाे काढण्याचा प्रसंगही डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्याबरोबर आला याची ह्रदय आठवण डॉ. म्हैसेकर यांनी सांगितली.
काही कौटुंबिक कारणांमुळे पर्यावरणवादी विचारवंत डाॅ. विश्वभंर चाैधरी या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाही. त्यांचा पुरस्कार नांदेड येथील ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्ते सतीश कुलकर्णी यांनी स्वीकारला. तसेच डॉ. चौधरी यांचे मनोगत वाचून दाखविले. मेधा पाटकर, अण्णा हजारे यांच्या कामातून आपण प्रेरणा घेऊन पर्यावरण आणि सामाजिक कार्य सुरु केल्याचे सांगून डॉ. चौधरी यांनी आजच्या राजकीय परिस्थितीवर सुस्पष्ट चिंतन मांडले. प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश काेठारे यांनी आपल्या मनाेगतात माजी मुख्यमंत्री अशाेकराव चव्हाण यांच्या कल्पनेतून डाॅ. शंकरराव चव्हाण यांच्या जीवनावर आपण एक चित्रफित तयार केली हाेती, अशी आठवण सांगताना कै. साै. कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. पुरस्कार वितरण करताना पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या कार्याची माहिती नांदेडकरांना व्हावी या हेतूने प्रत्येकाच्या कार्याची ध्वनी चित्रफीत तयार करण्यात आली हाेती. ती चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. याचे सर्वांनीच स्वागत केले.