हिंदु राष्ट्राची मागणी हा घटनात्मक अधिकार -NNL

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ची यशस्वी सांगता


गोवा|
काही वर्षांपूर्वीपर्यंत ‘हिंदु राष्ट्र’ या शब्दाकडे हेटाळणीच्या दृष्टीने पाहिले जात होते; मात्र आज केवळ भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही ‘हिंदु राष्ट्रा’चा उद्घोष होऊ लागला आहे. हिंदु राष्ट्राचा नारा जनसामान्यांपर्यंत पोचवण्यात ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चा सिंहाचा वाटा आहे. याच अधिवेशनामधून वर्ष 2012 मध्ये भारतभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन करून ‘हिंदु राष्ट्रा’चा उद्घोष करण्यात आला होता. दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ ही एकप्रकारे हिंदु राष्ट्राची विजयादशमीच आहे. हिंदूंच्या दमनाचा वनवास संपून येत्या 3 वर्षांत रामराज्यरूपी हिंदु राष्ट्राची पहाट उजाडेल. 12 ते 18 जून 2022 या कालावधीत श्रीरामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे पार पडलेले हिंदु राष्ट्र अधिवेशन याची प्रचिती देणारे ठरले.

 अमेरिका, हाँगकाँग, नेपाळ, फिजी आणि इंग्लंड यांसह भारतातील 26 राज्यांतील 177 हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे 400 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. अमेरिका, नेदरलँड, स्कॉटलंड, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया आदी या देशांतील धर्मप्रेमी हिंदूंनी ‘आमचा हिंदु राष्ट्र अधिवेशनाला पाठिंबा आहे’, अशा प्रकारचे फलक हातात घेऊन हिंदु राष्ट्र अधिवेशनाला समर्थन दिले आहे. समितीचे ‘यू-ट्यूब’ चॅनेल HinduJagruti, तसेच समितीच्या www.hindujagruti.org या संकेतस्थळावरून अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. 3 लाख 91 हजारांहून अधिक हिंदूंपर्यंत ‘ऑनलाईन’ माध्यमातून हे अधिवेशन पोहोचले.


विशेष परिसंवादांतून विविध समस्यांवर विचारमंथन आणि उपाय ! : अधिवेशनामध्ये हिंदु राष्ट्राविषयी घेतल्या जाणार्‍या आक्षेपांचे वैचारिक स्तरावर खंडण करण्यात आले. ‘हिंदु राष्ट्राची मागणी हा हिंदूंचा नैसर्गिक आणि घटनात्मक अधिकार आहे. वर्ष 2025 मध्ये हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्यासाठी व्हावे’, असे आवाहन बीजवक्तव्यात करण्यात आले. सध्याच्या लोकशाही व्यवस्थेत हिंदुहित साध्य केले जात नाही, उलट हिंदूंचे दमन आणि अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केले जात आहे. जिहादी, साम्यवादी, सेक्युलरवादी, नास्तिकतावादी आणि मिशनरी यांची हिंदुविरोधी युती सनातन हिंदु धर्माचे दमन करण्याचा प्रयत्न करत आहे. या हिंदुविरोधकांना पराभूत करून हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्याचा निर्धार अधिवेशनामध्ये करण्यात आला.

विध्वंसित मंदिरांचे पुनर्निर्माण : त्या जोडीला मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांकडे सोपवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या देशव्यापी मोहिमेला गती देण्याचेही या अधिवेशनात निश्चित करण्यात आले. अयोध्येमध्ये राममंदिराचे निर्माण होत असतांना काशी विश्वनाथ मंदिर, मथुरेमधील श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य श्रीकृष्ण मंदिर यांच्या निर्माणाच्या मागणीनेही देशभरात जोर पकडला आहे. देशातील अनेक मंदिरे आज इस्लामी अतिक्रमणामुळे दडपली गेली आहेत. विध्वंसित मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी जनमत तयार करण्यासह कायदेशीर पातळीवरही लढा देण्याचा निश्चय अधिवेशनामध्ये करण्यात आला. काशी विश्वनाथ मंदिराच्या मुक्तीसाठी कायदेशीर लढाई लढणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि अधिवक्ता हरि शंकर जैन हेही या अधिवेशनात सहभागी झाले होते. ‘आता तो दिवस दूर नाही, जेव्हा हिंदु एकत्रित येऊन काशी विश्वनाथ मंदिरात श्री विश्वनाथाचे पूजन करतील’, असा दृढविश्वास अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी व्यक्त केला.

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन : जिहादी आतंकवादामुळे भारतात विस्थापित होऊन 32 वर्षे झाली, तरी आजही काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून त्यांचे भीषण हत्यासत्र आजही चालू आहे. अखेर काश्मिरी हिंदूंना न्याय कधी मिळणार ? असा प्रश्न काश्मिरी हिंदूंच्या वतीने अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. काश्मिरी हिंदूंचे काश्मीरमध्ये सन्मानाने ‘पनून काश्मीर’ या स्वतंत्र प्रांतात पुनर्वसन करावे, या मागणीला अधिवेशनात सहभागी हिंदुत्वनिष्ठांनी पूर्ण समर्थन दिले.


धर्मांतर बंदी :
धर्मांतराच्या भीषण समस्येविषयीही अधिवेशनात चर्चाविमर्ष करण्यात आला. धर्मांतराची समस्या देशव्यापी असल्याने राज्यघटनेतील कलम 25 मध्ये सुधारणा करून त्यातील धर्माचा ‘प्रचार करणे’ (Propagate) हा शब्द काढण्याची मागणी अधिवेशनात करण्यात आली. हा शब्द काढल्यावर धर्मांतर रोखण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा, याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. धर्मांधांकडून केल्या जाणार्‍या दंगली, आक्रमणे यांमध्ये देशभर हिंदूंना लक्ष्य केले जाते. या पार्श्वभूमीवर अधिवेशनात उपस्थित हिंदुत्वनिष्ठांना आत्मरक्षणासाठी सिद्ध होण्याचे आवाहन करण्यात आले.

हिंदु राष्ट्र संसद : ‘हिंदु राष्ट्र संसद’ हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य ठरले. जशी लोकप्रतिनिधींची संसद आहे, तशी धर्महिताच्या विषयावर चर्चा करण्यासाठी अधिवेशनामध्ये 3 दिवस धर्मप्रतिनिधींची प्रतिकात्मक ‘हिंदु राष्ट्र संसद’ भरवण्यात आली होती. ‘मंदिरांचे सुव्यवस्थापन’, ‘हिंदु शिक्षणपद्धती’ आणि ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा संवैधानिक मार्ग’ या विषयांवर या स्वतंत्र संसदांचे आयोजन करण्यात आले होते. आणीबाणीच्या काळात 42 वी घटनादुरुस्ती करून राज्यघटनेत घुसडण्यात आलेले ‘सेक्युलर’ आणि ‘सोशालिस्ट’ हे शब्द वगळावेत, कायद्यांची मांडणी भारतीय संस्कृतीनुसार व्हावी, भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी धर्माधारित गुरुकुल शिक्षण द्यावे, हिंदूंची मंदिरे सरकारच्या ताब्यातून मुक्त करून ती भक्तांच्या ताब्यात देण्यात यावीत आदी प्रस्ताव या संसदेत ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’च्या जयघोषात संमत करण्यात आले.

हलाल जिहाद ग्रंथाचे प्रकाशन : अधिवेशनामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे लिखित ‘भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवीन आक्रमण : हलाल जिहाद ?’ या मराठी आणि हिंदी भाषेतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘हलाल अर्थव्यवस्थे’ला विरोध करण्यासाठी आंदोलन उभे करण्याचे ठरवण्यात आले.

दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त संमत झालेले ठराव : भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्यात यावे, हिंदूंच्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारा ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट 1991’ हा कायदा त्वरित रहित करून काशी, मथुरा, ताजमहल, भोजशाळा आदी मोगल आक्रमकांनी बळकावलेली हजारो मंदिरे आणि भूमी हिंदूंच्या ताब्यात द्यावी, गोव्यात ‘इन्क्विझिशन’च्या नावाखाली 250 वर्षे गोमंतकीयांवर केलेल्या अमानवीय आणि क्रूर अत्याचारांविषयी ख्रिश्चनांचे धर्मगुरु पोप यांनी गोव्यातील जनतेची जाहीर माफी मागावी, भारतात ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’(FSSAI) आणि ‘एफ्.डी.ए.’(FDA) यांसारख्या शासकीय संस्था असतांना धार्मिक आधारावर ‘समांतर अर्थव्यवस्था’ निर्माण करणार्‍या ‘हलाल सर्टिफिकेशन’ वर त्वरित बंद घालावी, राष्ट्रीय स्तरावर गोहत्याबंदी कायदा करण्यात यावा, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका येथील हिंदूंवरील अत्याचारांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना आणि भारत शासन यांच्याद्वारे चौकशी करून तेथील अल्पसंख्यांक हिंदूंना सुरक्षा द्यावी, नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी करावी आदी प्रस्ताव या अधिवेशनात संमत करण्यात आले.

हिंदु राष्ट्रासाठी वर्षभर कृती कार्यक्रम : राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या विषयांवर कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठी गटचर्चाही या अधिवेशनात घेण्यात आल्या. यात शेकडो हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले. येत्या वर्षभरात हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयी समाजात जागृती आणण्यासाठी समानसूत्री कार्यक्रमाच्या अंतर्गत देशभर मोठ्या प्रमाणावर ‘हिंदु राष्ट्र जागृती सभा’, ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’, ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’, ‘हिंदु राष्ट्र कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळा’, ‘काश्मिरी हिंदूंच्या समस्येवर जाहीर सभा’, ‘हलाल जिहादविषयी जनजागृती बैठक’ आदी विविध उपक्रम राबवण्याचे अधिवेशनात ठरवण्यात आले आहे.

थोडक्यात, हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात पार पडलेल्या दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त हिंदु राष्ट्रासाठी राबवण्यात येणार्‍या मोहिमांना गती देण्याचे, तसेच विस्तार करण्याचे निश्चित करण्यात आले. हिंदु राष्ट्राची संकल्पना केवळ राजकीय नाही, तर आध्यात्मिक आहे, ती रामराज्याच्या धर्तीवर आहे. ते साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करण्याचा हिंदुत्वनिष्ठांनी केलेला निर्धार, अधिवेशनाच्या माध्यमातून मिळालेले धर्मतेज, देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन, त्यांच्यामध्ये निर्माण झालेली धर्मबंधुत्वाची भावना, ही या अधिवेशनाची फलश्रुती म्हणावी लागेल. कालमहात्म्यानुसार हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. या कार्यामध्ये तन-मन-धन समर्पित करण्याची प्रेरणा सर्वांना मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना !

- संकलन : श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्र.: 99879 66666)


 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी