खडकी गाव महाराष्ट्रातील नकाशावर उठून दिसेल - मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे-NNL


नांदेड, अनिल मादसवार।
पाणीदार व स्मार्ट करण्यासाठी ग्रामस्थ पुढाकार घेत असल्याने यास प्रशासनाची साथ मिळत आहे. श्रमदानातून गावात जलसंधारणाची व स्वच्छतेची कामे होत आहेत. बाहेरून स्वच्छ, पाणीदार आणि मनाने स्वच्छ असलेल्या खडकी गावांने एक वेगळी ओळख निर्माण केली असून हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर उठून दिसणार आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी खडकी येथे केले.

सेवा समर्पण परिवार, प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने पन्नास दिवस श्रमदान करून खडकी हे गाव स्वच्छ सुंदर व पाणीदार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खडकी येथील श्रमदानात मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सहभागी होत एक तास श्रमदान केले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वैजयंता तरंगे, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नामदेव केंद्रे, रेखा काळम-कदम, कार्यकारी अभियंता अमोल पाटील, काँग्रेसचे


तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी  प्रशांत डिग्रसकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे, गट विकास अधिकारी अमित राठोड, सेवा समर्पण परिवारचे अध्यक्ष राजेश्वर रेड्डी लोकावाड, एस. ए. गंगोत्री, उपसरपंच गंगाधर आनरपोड यांची उपस्थिती होती  पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या, संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांनी जी ग्रामस्वच्छतेची प्रेरणा दिली या प्रेरणेने प्रेरित होऊन भोकर तालुक्यातील २० गावे स्वच्छ व सुंदर होत आहेत. नांदेड जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक चांगला पायंडा पाडला आहे. शासनाच्या विविध योजना असतात पण या योजना तेंव्हाच यशस्वी होतात त्यास लोकसहभाग जास्त असतो. आपण जसं सुंदर दिसतो तसं गाव सुंदर दिसावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 


पुढे बोलताना ठाकूर म्हणाल्या, महिला कमावती असली की तिला आदर मिळतो. बचत गट अन्य माध्यमांतून महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न केले जातील.‌ जिथं लक्ष्मीचा वास आहे तिथं काहीच कमी पडत नाही. यामुळे महिला सक्षमीकरण करण्यासाठी जास्त प्रयत्न करू असेही त्या म्हणाल्या. यावेळी बाळासाहेब रावणगावकर, जगदीश भोसीकर यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक गट विकास अधिकारी अमित राठोड, सुत्रसंचलान विठ्ठल फुलारी तर आभार  शेळके यांनी मानले.

बैलगाडीतून प्रवास व श्रमदान - पन्नास दिवस श्रमदान या मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घेगे यांनी खडकी येथे आल्यावर ग्रामस्थांनी त्यांना सजवलेल्या बैलगाडीत श्रमदानाच्या ठिकाणी घेऊन गेले. आणि ठाकूर यांनी सर्व विभागातील कर्मचाऱ्यांसोबत एक तास न थकता श्रमदान केले. श्रमदान करणाऱ्या सर्वांना प्रोत्साहित केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी