कुंटूरकरांच्या बालेकिल्यात बौद्ध व मातंग समाजांची पाण्यासाठी वणवण -NNL

मालक तुम्ही या हो पून्हा.... सुजलेगांवकरांचा टाहो sss


नायगांव बा., लक्ष्मण भवरे।
 कणखर, करारी,स्वाभिमानी अन् सर्वच समाजघटकांना समान न्याय देणारे लोकाभिमुख नेतृत्व व मालक म्हणूनही सुपरिचित असलेल्या माजी मंत्री गंगाधरराव कुंटूरकर यांच्या पश्चात त्यांच्या धुरंधर,कार्य व कर्तत्वाची ख्याती एकीकडे सर्वदूर चर्चिली जात असतांनाच दूसरीकडे मात्र त्यांच्याच बालेकिल्यात पूर्वग्रहदूषित जातियद्वेषातून त्यांचेच वारसदार समर्थकांसह प्रशासन यांच्या दुहेरी नाकर्तेपणामुळे बौद्ध व मातंग जनतेला चक्क पिण्याच्या पाण्यासाठी गत अनेक दिवसांपासून वणवण भटकंती करावी लागत असल्याने मालक तुम्ही या हो... पून्हा ss असा टाहो सुजलेगांवकर फोडत असून मालकांचा समर्थ वारसा जोपासण्यासाठी त्यांच्या वारसदार व समर्थकांनी सर्व समाजघटकांना समान न्याय देत सदैव कर्तव्यतत्पर असावं अशी संतप्त भावनाही व्यक्त करित आहेत. 

सविस्तर वृत्त असे की,माजी मंत्री स्मृतिशेष गंगाधरराव कुंटूरकर यांचा बालेकिल्ला म्हणून सर्वत्र सुपरिचित असलेलं सुजलेगांव.येथील ग्रामपंचायतीवर अपवादात्मक परिस्थिती वगळता सद्या व अनेकदा कुंटूरकर समर्थकांचेच वर्चस्व अबाधित आहे. सामाजिक व सांस्कृतिक वारसा जोपासणारं परंतू,राजकीय दृष्टीने सोबतच,विविध कारणांनीही बहुचर्चित म्हणून कुंटूर परिसरातच नव्हे तर, जिल्ह्याभरातही सुजलेगांव ओळखले जाते.स्मृतीशेष कुंटूरकर यांच्या हयातीत त्यांचे या गांवावर विशेष लक्ष होते.

  

कणखर,स्वाभिमानी व दिग्गज राजकारणी म्हणून त्यांचा सर्वत्र दरारा असला तरिही,सर्वच समाजघटकांना समान न्याय व जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ते सदैव कर्तव्यतत्पर असत.त्यामुळे लोकाभिमुख नेतृत्व व मालक म्हणूनही त्यांची ख्याती होती. विशेषतः कुंटूर व बरबडा परिसरातील प्रत्येक गांवातील जनतेच्या प्रत्येक समस्या निवारणासाठी प्राधान्याने ते तत्पर असत. त्यामुळे त्यांच्या पश्चात त्यांची उणीव या परिसरात निश्चितपणे जाणवते असून त्यांच्याच बालेकिल्यात सुजलेगांव येथे हा प्रत्यय येतो आहे.मुबलक पाणी पुरवठ्याची कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजनाच नसल्याने येथील जनता पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त बनली आहे. गांवात पाणी पुरवठ्याच्या एकही योजना सक्षमपणे राबविण्यात आलेली नसून नळयोजनाच नसल्याने विशेष नळजोडणी योजना कागदावरच आहे.

जागेअभावी (?) एका मंदिर परिसरात असलेले ग्रामपंचायतीचे जलशुद्धीकरण केंद्र सद्यातरी बंद अवस्थेत असून वार्ड क्रमांक २ मध्ये प्राप्त माहितीनुसार तब्बल ७५० मतदार असलेल्या बौद्ध व मातंग समाजाच्या वस्तीत जणू निर्जळीच आहे.विंधन विहीरीतील मोटारपंप नादुरुस्त असल्याने या वस्तीतील दोन्ही टाक्या पाण्यावाचून कोरड्याच आहेत.चार हातपंपापैकी सुरु असलेल्या अवघ्या एकाच हातपंपावर रात्रंदिवस तोबा गर्दीतून पाणी मिळविण्यासाठी जनता धडपडते आहे. उन्हाची तिव्रता वाढल्याने सद्या पाण्याची मोठी गरज आहे.वर्षाकाठी तब्बल चार आकडी रक्कम मोजूनच खाजगी लोकांकडून पाणी मिळवा किंवा पाण्यासाठी कोसो दूर वणवण भटकंती करा असे दोनच पर्याय येथील बौद्ध व मातंग वस्तीला असून आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने या वस्तीतील लहान-थोर व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी वणवण भटकत असल्याचे चित्र येथे पहावयास मिळते.

पाणी टंचाई निवारणासाठी स्थानिक ग्रामपंचायतीसह नायगांवच्या पंचायत समिती स्तरावर अनेकदा विनंती व तक्रारींवर ठोस कार्यवाहीऐवजी कागदोपत्री चौकशा योग्य ठरवून तक्रारी फाईलबंद करित तक्रारदारांनाच बदनाम करण्यात 'परफेक्ट' असलेल्या बहुचर्चित विस्तार अधिकारी शेख लतिफ यांचे स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यासमवेत आर्थिक हितसंबंध असल्यानेच येथील पाण्याचा प्रश्नही कायमच असल्याचा सूर ग्रामस्थांतून ऐकावयास मिळाला.
   
९ सदस्य असलेल्या या  ग्रामपंचायतीत ७ कुंटूरकर समर्थक देशमुख व पाटील गटाचे तर, दोन सदस्य कॉंग्रेसचे सुधाकर बकवाड व दत्ता आईलवार यांच्या गटाचे निवडून आलेले आहेत. सरपंचपदी सौ.ज्योती भगवान देशमुख व उपसरपंचपदी लक्ष्मण पाटील तर,पाणी टंचाई असलेल्या बौद्ध व मांतंग वस्तीतील वार्ड नं.२ मधून कुंटूरकर गटाचे बळिराम जाधव आणि लक्ष्मण सुर्यकार व विरोधी गटाच्या लक्ष्मीबाई बोरवाड असे तिन ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत.

परंतू,या एकाही पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी या वस्तीत जनतेच्या मुलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले नसल्यानेच येथे विविध प्रकारच्या समस्या पाठोपाठ पाणीटंचाई समस्या निर्माण झाली असल्याचे बोलल्या जात असून अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ग्रामसेवक बि.जी.जाधव यांच्या भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क झाला नाही तर,उपसरपंच लक्ष्मण पाटील यांच्या भ्रमनध्वनी क्रमांकावर संपर्क साधला असता त्यांनीही नित्याप्रमाणेच बोलणे टाळल्याने येथील पाणीटंचाई दूर होण्यास किती अवधी लागेल हा प्रश्न सद्यातरि अनुत्तरित आहे.
  
दरम्यान तालुक्यात नव्हे तर, देशात अन् राज्यात शासनाकडून आलेली प्रत्येक योजना सुजलेगांवात कागदोपत्रीच का असेना पण ती  सक्षमपणे (!) राबवून घेण्यासाठी येथील अनेकजण प्रयत्नशील असतात. त्यासाठी स्थानिक व पंचायत समिती नायगांव तसेच, जिल्हा परिषद नांदेडच्या कांही वा संबंधित अधिकारी-कर्मचारी यांचाही चांगलाच हातभार असतो.मात्र तरीही,येथे शासनाच्या वा ग्रामपंचायतीच्या विविध वित्त निधी वा पाणी पुरवठ्याच्या विविध योजना,विशेषतः अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे ( पूर्विची दलित वस्ती सुधार योजना ) या योजनेंतूनही येथील मागासबहुल वस्तीत पाणी पुरवठा- नळयोजना-विशेष नळजोडणी वा पाणी पुरवठ्याची अन्य योजना आजपर्यंत राबविण्यात आली नसेल यावर जणू संशोधन करुन चक्क प्रबंध लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे.
  
माजी मंत्री स्मृतीशेष गंगाधरराव कुंटूरकर यांनी आपल्या कार्यकाळात सर्वच समाजांना समान न्याय दिला व त्यांच्या मुलभूत गरजा भागविण्यासाठी प्रयत्न केले परंतू,त्यांच्या पश्चात त्यांच्या धुरंधर कार्य व कर्तव्यतत्परतेचा वारसा जोपासण्या ऐवजी त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या सुजलेगांवात त्यांच्याच वारसदारांनी व समर्थकांनी विशेषतः बौद्ध व मातंग वस्तीतील लोकांनाच जाणिवपूर्वक निर्माण केलेल्या पाण्याच्या निर्जळीमूळे वणवण भटकंती करण्याची वेळ आली असून या प्रकरणी कुंटूरकरांचे सुपुत्र युवानेते राजेश कुंटूरकर यांनीच स्वतः लक्ष देऊन स्थानिक सरपंच, उपसरपंच व अन्य सदस्यांसह प्रशासनाच्या मनमानी कारभाराला लगाम द्यावा अशी मागणी येथील जनतेतून जोर धरते आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी