नांदेड| आदिवासी कोळी समाज समन्वय समिती महाराष्ट्र राज्य शाखा नांदेडच्यावतीने दि. २४ मार्च २०२२ गुरुवार रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे अनुसूचित जाती- जमाती आयोगाचे (महाराष्ट्र राज्य राज्यमंत्री दर्जा) अध्यक्ष जयेश मो. अभ्यंकर हे नांदेड जिल्ह्याच्या दौर्यावर आले असता त्यांच्या समवेत समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक संपन्न होऊन सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी मराठवाड्यातील आदिवासी कोळी व मन्नेरवारलू समाजावर दिनकर पावरा, सहा. आयुक्त औरंगाबाद यांचेकडून जात वैधता प्रमाणपत्र देताना फक्त कोळी महादेव, टोकरे कोळी, मल्हार कोळी, मन्नेरवारलू या अनुसूचित जमातीवर हेतुपुरस्सर जामतीचे प्रमाणपत्राच्या वैधतेसंबंधी मुलाखत उशिरा घेणे, निकाल उशिरा देणे, जास्तीत जास्त प्रमाणपत्र अवैध (इनव्हॅलीड) करुन आदिवासी मुला-मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे कट- कारस्थान करीत आहेत, या व आदी प्रश्नांबाबत बैठकीत सखोल पुराव्यानिशी चर्चा करण्यात आली. यावेळी जयेश मो. अभ्यंकर यांनी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन आदिवासी विभागाची बैठक आपल्या समाजाच्या संघटना शिष्टमंडळा समवेत घेऊन आपल्या समाजावर जो अन्याय झालेला आहे व होत आहे तो सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न राहील असे आश्वासन देऊन निवेदन स्विकारले.
या शिष्टमंडळात मराठवाडा उपाध्यक्ष के.एन. जेठेवाड, समन्वयक आनंदा रेजीतवाड, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, सोपानराव मारकवाड, विजयकुमार भुसावार, रावसाहेब पपुलवाड, संजय यल्लमवाड, बळीराम कोनेरी, मारोती मामा मामीलवाड, दत्तात्रय अन्नमवाड, दादाराव कोठेवाड, शिवराम बोधगिरे, भगवान गुंजलवाड, बालाजी इंगेवाड, सुभाष येरमुनवाड, कैलास जेठेवाड, संदीप पिल्लेवाड, साईनाथ बोईनवाड, रमेश शिंदे, ऍड. सुधीर राऊतवाड इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.