जिल्ह्यातील प्राचीन वारसा समोर आणण्यासाठी नांदेड ग्रामीण पर्यटन हा महत्त्वाचा उपक्रम
नांदेड| आपलं गाव हा आपला समृद्ध वारसा आहे. अवतीभवतीचा परिसर, नद्या, डोंगर रांगा, प्राचीन वास्तू, लोकपरंपरा आपले जगणे प्रवाहित करीत असतात. म्हणून नांदेड जिल्ह्यातली असा प्राचीन व समृद्ध वारसा लोकांसमोर व विद्यार्थ्यांसमोर ठेवण्यासाठी नांदेड ग्रामीण पर्यटन हा उपक्रम असून, विद्यार्थ्यांना व नागरिकांना आपल्या जिल्ह्याची वैभवशाली परंपरा यातून समजण्यास मदत होईल, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज केले.
नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा व समृद्ध स्थळांची माहिती सर्वांना व्हावी यासाठी ग्रामीण पर्यटन पुस्तिका जिल्हा परिषद नांदेड व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नांदेडच्या वतीने तयार करण्यात येत आहे. याचे विस्तारित रूप म्हणून दृकश्राव्य स्वरूपात शिक्षकांच्या माध्यमातून व्हिडिओ निर्मिती करण्यात आली आहे. हे व्हिडिओज डायट नांदेड या यूट्यूब चॅनल वरून प्रसारित करण्यात येणार आहेत. आजपासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी आज या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. संपूर्ण तीर्थक्षेत्र विकास, ग्रामीण पर्यटन विकास, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, केंद्रीय पुरातत्व विभाग, राज्य पुरातत्त्व विभाग यांच्यासमोर या पर्यटन स्थळांची सूची आली तर पर्यटनस्थळांचा विकास करणे सुलभ होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
ज्येष्ठ अधिव्याख्याता श्रीकृष्ण देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डायटचे प्राचार्य डॉ. रवींद्र अंबेकर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाची भूमिका विशद केली. एकूण 15 व्हिडीओ तयार झाले असून नियमितपणे हा कार्यक्रम प्रसारित होणार असल्याचे सांगून निर्मिती करणार्या सर्व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले. आठवड्यातून एक वेळा याप्रमाणे सातत्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्राचार्य रवींद्र अंबेकर, जि. प. प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनात सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ. विलास ढवळे डायटचे विषय सहायक तथा निर्मिती तज्ञ संतोष केंद्रे, जिल्हा परिषदेचे जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी या कार्यक्रमाची आखणी केली आहे. आजच्या या प्रसारणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका कंधार येथील शिक्षिका अनिता दाणे व लोहा तालुक्यातील शिक्षक माधव जुंबाड यांनी तयार केलेली व्हिडिओ डॉक्युमेंटरी सादर करण्यात आली. याच वेळी श्री शिवाजी कॉलेज कंधार येथील इतिहास विभाग प्रमुख प्रा.सुभाष रगडे यांची अनिता दाणे यांनी मुलाखत घेतली. यात प्रा.सुभाष रगडे यांनी जगतुंग समुद्र, त्याची निर्मिती, राष्ट्रकूट काळ, तलावाचे उपयोग तलावाची सद्यस्थिती अशा अनेक विषयावर माहिती दिली.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी त्यांच्याशी ऑनलाइन संवाद साधला. विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारले त्याची उत्तरे त्यांनी दिली. दुर्लक्षित असलेला हा ठेवा उत्तम रीतीने जपावा व याचा पर्यटन दृष्टीने विकास करावा अशी मागणी पुढे आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष केंद्रे यांनी केले. ग्रामीण पर्यटनासंदर्भात जाणीव जागृती करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त असून याहीपुढे दर आठवड्याला डायट नांदेड या यूट्यूब चैनल वरून प्रसारित करण्यात येणार आहे.