हिमायतनगर,अनिल नाईक। लुक्यामध्ये गेल्या महिनाभरापासून दारूबंदीची चळवळ गतिमान झाली असून, आता पाचव्या नंबर गावाने सुद्धा दारूबंदीच्या विरोधात एल्गार पुकारून हिमायतनगर येथील पोलीस स्थानकात निवेदन देत दारुबंदी करावी अशी मागणी केली आहे.
आदिवासी व बंजारा बहुल भागात असलेल्या रमणवाडी तांडा येथे दोन दुकानांमधून देशी दारूची अवैध विक्री केली जात आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील पाच ते दहा गावातील लोक दारू पिण्यासाठी या ठिकाणी गर्दी करत असून, या दारुड्यांचा नाहक त्रास महिलांना व मुलींना सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर सहज रित्या दारू मिळत असल्याने गावातील लहान बालके व्यसनाच्या आधीन जात असून त्यामुळे भावी पिढी वाममार्गाला लागण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
ही बाब लक्षात घेता येथील गावकऱ्यांनी मागील चार दिवसापूर्वी संबंधित दुकानदारास महिलांसह गावातील नागरिकांनी घेराव घातला होता. तसेच यापुढे दारूची विक्री करू नका दारू विक्री झाली तर हिमायतनगर पोलिस ठाण्याला जाऊन निवेदन देऊन बंदोबस्त करायला लावू अशी तंबी दिली होती. तरी देखील या गावाच्या दुकानदारांनी दारू विक्रीचा धंदा बंद तर केलाच नाही उलट आणखी जोमाने सुरू केला आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना नाइलाजास्तव हिमायतनगर येथील पोलिस ठाण्यात धडक देऊन दारूबंदीच्या विरोधात निवेदन द्यावे लागले आहे.
या निवेदनावर यशोदाबाई जाधव, शिलाबाई जाधव, प्रेमाबाई जाधव, सिमाबाई जाधव, राजू बळीराम राठोड, बाळू जाधव, प्रवीण राठोड, अविनाश जाधव , विजय जाधव, उमेश जाधव, सुदाम राठोड, राजू राठोड, बाबू रामचंद्र यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत. पोलिसांनी यानंतर त्या दारू विक्रेत्यांवर कारवाई न केल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे. तसेच लवकरच किनवट येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्याकडे जाऊन निवेदन देत त्यानंतर दारूबंदीच्या विरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याच पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे या गावातील देशी दारूची अवैध विक्री बंद होईल का याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
