दहावी परीक्षेच्या सुधारित मुल्यमापन कार्यपद्धतीनुसार संगणकीय प्रणालीत गुणांच्या नोंदी घेण्याचे आवाहन -NNL


नांदेड|
माध्यमिक शाळांना संगणक प्रणालीत विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना काही अडचणी आल्या आहेत, त्यांनी त्या संबंधिच्या मूळ अभिलेखासह शुक्रवार 9 जुलै 2021 पर्यंत संबंधित विभागीय मंडळाशी त्यांनी निश्चित केलेल्या नियोजनानुसार संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 


इयत्ता दहावी परीक्षा सन 2021 सुधारित मूल्यमापन कार्यपद्धती संदर्भात तपशिलवार सूचना सर्व संबंधित माध्यमिक शाळा व विभागीय मंडळांना एका परिपत्रकाद्वारे यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी निहाय गुण नोंदणी करण्यासाठी मंडळामार्फत प्रथमच संगणकीय प्रणाली उपलब्ध करुन देण्यात आली होती. या प्रणालीमध्ये विद्यार्थी निहाय गुणांची नोंद करताना शाळा स्तरावर काही त्रुटी / चुका राहिल्याची बाब निदर्शनास आली आहे. या त्रुटी / चुकांची पडताळणी करुन यथानियम कार्यवाही करण्याबाबत विभागीय मंडळाना तपशीलवार सूचना देण्यात आल्या आहेत. 


शाळांना संगणक प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद करताना आलेल्या अडचणी या पुढीलप्रमाणे आहेत. संगणक प्रणालीमध्ये विहित मुदतीत काही विद्यार्थ्यांचे गुण भरलेले नाहीत. विद्यार्थी निहाय गुण भरले, निश्चित केले नाहीत. विद्यार्थी निहाय गुण भरले, निश्चित केले पण त्रुटी राहिल्या व चुका झाल्या आहेत. विद्यार्थ्यांचे एखाद्या विषयाचे / भागाचे गुण / श्रेणी भरलेले नाहीत. इयत्ता 9 वी, इयत्ता 5 वी ते 9 वी (लागू असल्याप्रमाणे) टक्केवारी भरलेली नाही. पुनर्परिक्षार्थीच्या बाबतीत श्रेणी विषयाची श्रेणी दर्शवितांना सध्याच्या तीन श्रेणी विषयांव्यतिरिक्त विद्यार्थ्यांचे जुने श्रेणी विषय असल्यास 4 श्रेणी / 1,2,3 श्रेणी दर्शविण्यात आलेली आहे. उशीराने अर्ज भरल्यामुळे बैठक क्रमांक प्राप्त झाला नाही व त्यामुळे संगणक प्रणालीत विद्यार्थ्याचे गुण / श्रेणी भरता आले नाही. आवेदन पत्र भरताना परीक्षार्थी प्रकार (जसे नियमित, पुनर्परिक्षार्थी, खाजगी, तूरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी) चुकल्याने संगणक प्रणालीत गुण / श्रेणी भरता आले नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्यांना विषयास सूट असताना प्रविष्ट दाखविणे / प्रविष्ट असताना सूट दाखविणे यामुळे संगणक प्रणालीत गुण / श्रेणी भरता आले नाही. याबाबत जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, माध्यमिक शाळा, शिक्षक व इतर सर्व संबंधित घटकांनी नोंद घ्यावी, असेही आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. 

  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी