मक्यावरील नवीन लष्करी आळी (फॉल अर्मीवर्म) व्यवस्थापन - विकास पाटील -NNL

कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे


पुणे|
मागील काही वर्षांमध्ये राज्यात मका तसेच काही प्रमाणात ज्वारी, ऊस व कापूस पिकावर नवीन लष्करी अळीचा (फॉल अर्मीवर्म) प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळून आलेला आहे. तसेच चालू हंगामात पेरणी झालेल्या मका पिकावर देखील अल्प प्रमाणात काही ठिकाणी प्रादुर्भाव आढळून येत आहे. फॉल आर्मीवर्म ही कीड बहुभक्षी प्रकारची असून १०० च्या वर वनस्पतींवर उपजिविका करते. या किडीचा प्रसार होण्याचा वेग खूप जास्त असून पतंग अंडी देण्याअगोदर ५०० किमीपर्यंत जाऊ शकतात. एका रात्रीत पतंग १०० कि.मी. प्रवास करु शकतो. 

वाऱ्याचा वेग अनुकुल असल्यास ३० तासात १६०० किमीपर्यंत गेल्याची नोंद आहे. या किडीचे वर्षभर जीवनचक्र चालू असते व तिच्या जीवनक्रमात सुप्तावस्था नाही. कीड ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे अळीच्या डोक्याच्या पुढच्या बाजूस उलट Y आकाराची खूण असते व शरीराच्या शेवटून दुसर्या सेग्मेंट वर चोंकोणी आकारात चार ठिपके दिसून येतात व त्या ठिपक्यावर केसही आढळून येतात. ही कीड झुंडीने आक्रमण करत असल्यामुळे काही दिवसातच पीक फस्त करत करते. त्यामुळे या कीडीचा प्रदुर्भाव दिसून येताच वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्वभुमीवर  मक्यावरील नवीन लष्करी अळी (फॉल अर्मीवर्म) या किडीचा  प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकरी बंधुंनी खालील उपाय योजना करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

बीज प्रक्रिया केलेल्या बियाण्याचा वापर करावा. पिकाची फेरपालट फेरपालट करावी. वारंवार एकाच शेतात मका पीक घेण्याचे टाळावे.

मका पिकाभोवती नेपियर गवत या सापळा पिकाची लागवड करावी तसेच, मका पिकात कडधान्य वर्गीय आंतरपिकांची लागवड करावी. किडीच्या नैसर्गिक शत्रूंना आकर्षित करण्यासाठी तसेच त्यांच्या संगोपनासाठी बांधावर झेंडू, कारळा, तीळ, सूर्यफूल, कोथंबीर, बडीशेप इत्यादींची लागवड करावी.

पक्षांद्वारे फॉल अर्मीवर्म किडीचे नैसर्गिकरीत्या नियंत्रणाचे दृष्टीने पक्षांना आकर्षित करण्यासाठी प्रति एकरी 10 पक्षी थांबे उभारावेत. पीक पेरणीनंतर लगेच प्रति एकरी 4 कामगंध सापळे उभारुन त्यात अडकलेल्या पतंगांची नियमित पाहणी/सर्वेक्षण करावे. किडीसाठी पर्यायी यजमान पिकांची उपलब्धता होऊ नये म्हणून शेत स्वच्छ आणि तणमुक्त ठेवावे.

किडीचे अंडीपुंज व नवजात समुहातील अळ्या वेचव्यात व चिरडून टाकाव्यात.

रेती किंवा माती + चुनकळी यांचे 9:1 या प्रमाणातील मिश्रण पिकाच्या पोंग्यात सोडावे.

कामगंध सापळ्यात प्रति दिन प्रति सापळा एक पतंग सापडल्यास अथवा सापळा किंवा मुख्य पिकावर किडीचा 5 % प्रादुर्भाव दिसून येताच 5 % निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन 1500 पीपीएम (1लिटर /एकर) 5 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी.

किडीचे मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासाठी प्रति एकरी 15 कामगंध सापळे लावावेत (यशस्वीतेकरीता सार्वजनिकरीत्या सर्वांनी कामगंध सापळे लावावेत) 

अंड्यातील परोपजीवी कीटक उदा. टेलेनोमस रिमस 4 हजार अंडी प्रति एकर अथवा ट्रायकोग्रामा प्रिटीओसम 50 हजार अंडी प्रति एकर प्रमाणे एक आठवड्याच्या अंतराने दोन वेळा प्रसारण करावे. (मोठ्या प्रमाणात पतंग पकडण्यासाठी कामगंध सापळे लावल्यास परोपजी किटकांचे प्रसारण करु नये)

किडीचा प्रादुर्भाव 5 ते 10 % पर्यंत असल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका जैविक किटकनाशकाचे द्रावण पिकाच्या पोंग्यात सोडावे. बॅसिलस थुरिनजिनसीस व्ही. कुर्सटकी (400 ग्रॅम प्रति एकर) 2 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा 1X108  सीएफयू/ग्रॅम इतके बिजाणुचे प्रमाण असलेले मेटाऱ्हायझियम ॲनिसोप्लि अथवा बिव्हेरिया बासीयाना (1 किलो/एकर) 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी किंवा एसएफएनपीव्ही (66 मिली/एकर) 3 मिली प्रति लिटर पाणी किंवा कीडरोगजनक सुत्रकृमी (ईपीएन) (4 किलो/एकर) 20ग्रॅम प्रति लिटर पाणी.

किडीचा प्रादुर्भाव 10 %पेक्षा जास्त असल्यास पुढीलपैकी कोणत्याही एका रासायनिक किटकनाशकाचे द्रावण पिकाच्या पोंग्यात सोडावे. क्लोरॅनट्रानीलीप्रोल 18.5 % एस.सी. (80 मिली/ एकर) 0.4 मिली प्रति लिटर पाणी किंवा थायामेथॉक्झाम 12.6% + लॅमडा सायहॅलोथ्रीन 9.5% झेड.सी. (50 मिली/ एकर) 0.25 मिली प्रति लिटर पाणी किंवा स्पिनेटोरम 11.7% एस.सी. (100 मिली/ एकर) 0.5 मिली प्रति लिटर पाणी किंवा इमामेक्टीन बेंझोएट 5 % एस.जी. (80 ग्रॅम/एकर) 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाणी. (चारापिक म्हणून घेण्यात येणाऱ्या मका पिकावर रासायनिक किटकनाशकाची फवारणी शक्यतो टाळावी. जर रासायनिक किटकनाशकाची फवारणी केली तर शेवटचा वापर व चारा पीक काढणी या दरम्यान किमान ३० दिवसांचे अंतर असल्याची खात्री करावी व त्यादृष्टीने किटकनाशकाचा वापर करताना काळजी घ्यावी.)


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी