हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन - विकास पाटील -NNL

कृषि संचालक, (विस्तार व प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे


पुणे|
ऊस हे महाराष्ट्रातील कापूस पिकाच्या खालोखाल प्रमुख नगदी पीक आहे. राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था बहुतांशी ऊस उद्योगावर अवलंबून असून ऊस लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे. प्रतिकुल हवामान, कमी पाऊसमान यामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. हुमणी ही किड ऊसाची पांढरी मुळे खात असल्याने ऊस उत्पादनात मोठया प्रमाणात घट येण्याची शक्यता असते. 

हुमणी किडीच्या प्रामुख्याने दोन महत्वाच्या प्रजाती महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. यापैकी होलोस्ट्रॅकिया सिराटा या जातींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने महाराष्टाच्या नांदेड, बुलढाणा, अहमदनगर, धुळे, सांगली, कोल्हापूर इत्यादी जिल्हयात दिसून येतो आणि ल्युकोफोलीस लेपिडोफोरा या प्रजातीचा तीव्र प्रादुर्भाव महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्हयाच्या पश्चीम भागात दिसून येतो. ही कीड ऊसाबरोबरच इतर पिकांनाही नुकसान करत असल्याने हया किडीचा वेळीच बंदोबस्त करणे गरजेचे आहे. 

हुमणीचा नुकसानीचा प्रकार- हुमणीच्या प्रथम अवस्थेतील अळया सुरुवातीच्या काळात कुजलेल्या सेंद्रिय पदार्थावर उपजिविका करतात व त्यानंतर ऊसाची तंतुमय मुळे खातात, तर प्रौढ भुंगा बाभूळ, कडुनिंब, बोर इत्यादी झाडावर उपजीविका करतात. या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने एका रेषेत असतो. या अळयांनी झाडांची मुळे कुरतडल्यामुळे प्रादुर्भावग्रस्त झाडे सहजरीत्या उपटली जातात. तसेच जोराचे वादळ आल्यास ही झाडे कोलमडून पडतात. हुमणीमुळे ऊसाच्या उगवणीत 40 टक्के नुकसान होऊ शकते.

आर्थिक नुकसानीची पातळी- हुमणीची एक अळी प्रति चौरस मीटर क्षेत्रावर आढळल्यास तसेच झाडांवर सरासरी 20 किंवा त्यापेक्षा जास्त भुंगेरे  आढळल्यास किड व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

हुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन-

खोडव्यामध्ये पाचट न जाळता ते सरीमध्येच कुजविण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करावे. पाचटामुळे हुमणीचा प्रादुर्भाव होत नाही याकरीता प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात यावे.

पावसाच्या पहिल्या सरी बरोबरच भुंगेरे जमिनीतून बाहेर येण्यास सुरुवात होते. संध्याकाळी भुंगेरे झाडावर दिसून येतात हा काळ त्यांच्या मिलनाचा असतो या काळातच बाभूळ, बोर व कडुनिंबाची झाडे हलवल्यास झाडाच्या पानावरील भुंगेरे जमिनीवर पडतात, हे पडलेले भुंगेरे गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकल्याने अर्ध्या तासात ते मरतात. भुंगेरे मेल्याने एक पिढी नष्ट होते त्यामुळे त्यांचा जीवनक्रम खंडित होऊन पुढील नुकसान टळते. हा उपाय शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या करावा. त्यामुळे अंडी घालण्यापूर्वीच भुंगेऱ्यांचा नायनाट होईल. 

अति प्रादुर्भावग्रस्त शेतात हुमणीस कमी बळी पडणारे म्हणजे हळद व केळी, पपई व द्विदल वर्गीयमध्ये हरभरा, उडीद, मूग, चवळी, ढैंचा आणि ताग ही पिके घेऊन पिकांची फेरपालट करावी.

आंतरमशागतीच्या वेळेस अळ्या गोळा करुन लोखंडी हुकच्या सहाय्याने किंवा खुरप्याने माराव्यात. 

भुंगे गोळा करण्यासाठी प्रकाश सापळ्यांचा एक हेक्टर क्षेत्रात एक प्रकाश सापळा या प्रमाणे वापर करावा. या सापळ्यातील भुंगे गोळा करून नष्ट करावेत.

पिकास पाणी देताना ते जास्त काळ साचून राहील याकडे लक्ष द्यावे जेणेकरून, साचलेल्या पाण्यामध्ये आळ्या गुदमरून मारतील.

हुमणीग्रस्त शेतातील सुकलेली पिकांची रोपे उपटावीत व मुळा शेजारील अळ्यांचा रॉकेल मिश्रित पाण्यात नाश करावा.

जैविक उपाय:

हुमणी किड अनेक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे, त्यामुळे शेतात पक्षी थांबे लावावेत.

हुमणीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तिच्या नैसर्गिक शत्रूंचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. बगळा, चिमणी, कावळा, घार इ.पक्षी व मांजर, कुत्रा, रानडुक्कर, मुंगूस, उंदीर इ. प्राणी हुमणीच्या अळ्या आवडीने खातात.

जिवाणू (बॅसीलस पॉपीली) व सुत्रकृमी (हेटरोऱ्हॅब्डेटीस) हे होलोट्रोकिया हुमणीचे नैसर्गिक शत्रू आहेत. 

हुमणच्या अळीला रोगग्रस्त करणाऱ्या सुत्रकृमी चा वापर करावा. यासाठी 50 मिलि. ई.पी.एन. कल्चर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारावे किंवा 2.5 लिटर कल्चर प्रति हेक्‍टर याप्रमाणे ठिबक/ प्रवाही सिंचनातून द्यावे.

दोन किलो बिव्हेरिया बॅसियाना व मेटारायझियम ॲनीसोप्ली ही परोपजीवी जैवीक बुरशी २० किलो/हेक्टरी या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून पीक लागवडी अगोदर जमिनीत मिसळावी म्हणजे प्रथम अवस्थेतील अळ्यांचा बुरशीमुळे नाश होईल. अथवा शेणखतातून पिकाच्या बुंध्यापाशी टाकावे व पिकास हलके पाणी द्यावे. 

एरंडी वासाकडे हुमणीचे भुंगेरे आकषिर्त होतात, एरंडी अमिश सापळ्यांच्या वापराने हुमणीचे भुंगेरे त्याकडे आकषिर्त होऊन त्यातील पाण्यात पडून मरतात. असे सापळे कमी खर्चात तयार होतात व प्रौढ भुंगेऱ्यांचे अंडी घालण्यापूवीर्च व्यवस्थापन होते.

रासायनिक उपाय:

जमीन तयार करताना अथवा शेणखतामधून फोरेट (10 टक्के दाणेदार) या औषधाचा 25 किलो प्रति हेक्‍टर या प्रमाणात वापर करावा.

हुमणीच्या नियोजन नियंत्रणासाठी पहारीच्या सहाय्याने बुंध्यालगत किंवा दोन बुंध्यांच्यामध्ये छोटासा खड्डा घ्यावा. याकामी ऊस पिकात खत घालण्याची जी पहार आहे तिचा खास वापर करावा. फवारणी पंपाचे नोझल काढून बुंध्यालगत 40 मिली क्लोरोपायरीफॉस 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणाची बुंध्यालगत तयार केलेला खड्ड्यात आळवणी करावी.

ऊस व इतर पिकांतील हुमणी नियंत्रण:

ऊस व इतर पिकांतील हुमणी नियंत्रणाकरीता खालील प्रमाणे रासायनिक किटकनाशकांचा वापर करावा. किटकनाशक हे पिकाच्या बुंध्याभोवती जमिनीत मिसळून द्यावे व त्यानंतर पिकास हलके पाणी द्यावे. 

पीक

किटकनाशके

मात्रा

भुईमूग

कार्बोफयुरॉन ३ टक्के दाणेदार

३३ कि. ग्रॅ. / हेक्टर

घेवडा

कार्बोफयुरॉन ३ टक्के दाणेदार

२३.३ कि. ग्रॅ. / हेक्टर

बाजरी, ज्वारी, ऊस, भुईमूग

फोरेट १० टक्के दाणेदार

२५ कि. ग्रॅ. / हेक्टर

ऊस   

फिप्रोनील ०.३ टक्के दाणेदार

३३ किलो हेक्टर

ऊस   

फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रीड ४० टक्के डब्ल्यु.जी.

प्रती हेक्टर ५०० ग्रॅम १२५० लिटर पाण्यात मिसळून तोटी काढलेल्या पंपाने ऊस लागवडीच्या ओळीत सोडावे.

 

 

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी