सांगली| स्थलांतरीत करताना अधिकची सतर्कता बाळगा. अपघात होणर नाही याकडे कटाक्षाने लक्ष द्या. जास्तीत जास्त रस्त्याने, पायवाटेने स्थलांतरण करा. बोटीची आवश्यकता पडणार नाही याप्रमाणे स्थलांतराची प्रक्रिया राबवा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.
वाळवा, शिरगाव येथील पूरपरिस्थितीची पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी बोलत होते. यावेळी तहसिलदार दिक्षांत देशपांडे, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे, वाळव्याच्या सरपंच शुभांगी माळी, वैभव नायकवडी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, स्थलांतर प्रक्रियेसाठी जिल्हास्तरावरून आवश्यक ती मदत तातडीने उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या ठिकाणी नागरिक स्थलांतरास सहकार्य करणार नाहीत त्या ठिकाणी सक्तीने स्थलांतर करण्यात यावे. कोणताही धोका पत्करू नये.
जिल्हा नियोजन मधून देण्यात आलेल्या 10 बोटींचा आवश्यकतेनुसार उपयोग करावा. एनडीआरएचची एक टीम तैनात असून तीच्या मदतीने स्थलांतर करण्यात यावे. सातारा जिल्ह्यामध्ये उद्या अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे अधिकचा पाऊस झाल्यास कोयनेतून होणाऱ्या विसर्गाचे पाणी साधरणत: 8 ते 10 तासात सांगली जिल्ह्यापर्यंत पोहोचते. त्या अनुषंगाने त्वरीत स्थलांतराची प्रक्रिया राबवावी. वाळव्यासाठी 75 लाईफ जॅकेटचा पुरवठा करण्यात आला आहे. स्थलांतर करत असताना प्रत्येक व्यक्तीला लाईफ जॅकेट घातल्याशिवाय त्यांचे स्थलांतर करू नये. बोटी चालविणाऱ्या व्यक्ती प्रशिक्षीत असल्याशिवाय त्यांना बोटी हाताळू देवू नये.
वाळवा गावामध्ये आत्तापर्यंत सुमारे 4 हजार व्यक्तींचे स्थलांतरण करण्यात आले असून 4 ठिकाणी निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये 300 व्यक्तींना आश्रय देण्यात आला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, ज्या कुटुंबांची स्थलांतरासाठी स्वतंत्र सोय असेल, ज्यांची नातेवाईकांकडे जाण्याची इच्छा असेल अशांनी त्या ठिकाणी स्थलांतरीत व्हावे. वाळवा व परिसरात पाण्याची धोक्याची वाढती पातळी पाहता त्या परिसरात रात्रीच्या वेळी जागरूक रहावे. तसेच पाण्याची पातळी ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणे गावात सूचित करण्यात यावे. रात्री वाढणाऱ्या पाणी पातळीवर लक्ष ठेवण्यात यावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.
