दिशादर्शक फलक आणि सूचना फलक गायब... रात्रीचा प्रवास धोकादायक
हिमायतनगर, अनिल नाईक। हदगाव ते हिमायतनगर रस्त्यावर असलेल्या जवळगाव नजीकच्या पुलाचे बांधकाम बंद पडल्याने या रस्त्याने प्रवास करतांना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या भागाचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या मूळ गावाजवळच मोठ्या संख्येने पुलाचे बांधकाम ठेकेदारने रखडत ठेवल्याने या भागांतील नागरिकांना ठेकेदारच्या नावाने बोटे मोडावे लागत आहे. याकडे आमदार महोदयांनी लक्ष देऊन मंत्री नितीन गडकरीं यांच्याकडे ठेकादारांची तक्रार करून काम लवकरात लवकर मार्गी लावावे अशी मागणी जोर धरत आहे.
मागील काळात अवकाळी पाऊस झाला त्यामुळे या रस्त्याचे प्रचंड प्रमाणात हाल झाल्यामुळे प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. मागील काही दिवसांमध्ये एका रेल्वे कर्मचार्यांचा या अर्धवट राहिलेल्या पुलामुळे आपला जीव गमवावा लागला होता. तरी या रस्त्याचे काम करणारा गुत्तेदार रुद्राणी कंपनीच्या ठेकेदार आणखीन किती जणांचे बळी घ्यायच्या विचारात आहे असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. विशेष म्हणजे या पुलाच्या भोवताली कुठल्याही प्रकारची दिशानिर्देश किंवा काम चालू असल्याचे फलक लावण्यात आलेले नाही. काही ठिकाणी तर पावसामुळे पूर्ण रस्ता खचलेला आहे जर आणखी एकदा अवकाळी पाऊस झाला तर नक्कीच एखादी मोठी विपरीत घटना घडू शकते. यासाठी संबंधित गुत्तेदार यांनी या भागाचे काम त्वरित पूर्ण करावी अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना व्यक्त होत आहे.
जर गूत्तेदारानी विद्यमान आमदाराच्या गावाच्या परिसरात होणाऱ्या पुलांची काम रखडत ठेवून आणि जे रस्त्याचे काम अर्धवट ठेवून जणू काही आमदार महोदयांना तुमच्या भागातील कामे जाणीवपूर्वक उशिरा करणार असे आव्हान देत असावे अशी भावना जनमानसातुन व्यक्त होत आहे. तरी या हदगाव - हिमायतनगर रस्त्यावर होत असलेल्या अर्धापूर - फुलसांगवी या राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा. अशी मागणी परिसरातील नागरिक ,शेतकरी करत आहे. मागील पावसामुळे या नाल्याच्या बाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर मोठ मोठे नाले आहेत त्यामुळे पाण्याचे प्रवाह वाढला तर रस्ता तर बंद पडेलच जर जिवीत हानी झाली तर त्याची जबाबदारी घेणार कोण....? असा प्रश्न वाहनधारक व शेतकरी विचारीत आहेत.
निदान लोकप्रतिनधीच्या गावाशेजारी कामे तरी गुत्तेदार तातडीने पूर्ण करण्याची भूमिका घेत नसेल तर मतदार संघात इतर ठिकाणी काय..? अवस्था असेल ही कल्पना न केलेली बरी. त्यामुळे आमदार महोदयांनी या प्रकरणी काम करणाऱ्या गुत्तेदार यांना जाब विचारून राहिलेली काम ताबडतोब पूर्ण करण्याची सूचना करावी. अन्यथा तेच काम दुसऱ्या काम करणाऱ्या गुत्तेदारास देण्याच्या सूचना संबंधित विभागास द्याव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.