नांदेड| संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी १०० ठिकाणी योग यज्ञ करण्यात येणार आहे. महा एनजीओ फेडरेशन ही महाराष्ट्रातील २००० संस्थांचे संघटन करणारी संस्था आहे. जागतिक योग दिनानिमित्त महा एनजीओ फेडरेशनच्या १०० सदस्य संस्था राज्यभरात एकाच वेळी योग शिबीर घेणार आहेत.
सदरील योग शिबिरे श्री श्री रविशंकरजी यांच्या बेंगलोर येथील तज्ञ योग प्रशिक्षिका रुची सूद यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहेत. पुणे येथील महा एन.जी.ओ फेडरेशन च्या कार्यालयातून ऑनलाइन लिंक द्वारा घेण्यात येणारे हे शिबीर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रोजेक्टर वर दाखवून २५ ते ५० व्यक्तींच्या सहभागाने योगासने ,ध्यान , प्राणायाम व देशभक्तीपर गीतांचे श्रवण या उपक्रमांनी साजरे केले जाणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्याम जी जाजू ( उपाध्यक्ष, भाजपा) हे मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना) हे सुद्धा त्यांचे मनोगत सांगणार आहेत.
आर्ट ऑफ लिविंग या संस्थेचे अंकित बत्रा हे त्यांचे सुमधुर आवाजात देशभक्तीपर गीत सादर करणार आहेत. राज्यातील कोरोनाजन्य परिस्थितीचा विचार करून सर्व नियमांचे पालन करून ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. कोरोना हा आजार मनुष्याच्या फुप्फुसांवर आघात करतो. योगा व प्राणायामानी फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. या शिबिरांचा निश्चितच कोरोना पासून बचाव तथा कोरोनामुक्ती साठी उपाय म्हणून उपयोग होवू शकतो.
म्हणून या शिबिराचा जास्तीत जास्त व्यक्तींनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन महा एन जी ओ फेडरेशन चे संस्थापक शेखर मुंदडा , मुख्य कार्यवाहक विजय वरुडकर , उपक्रम प्रमुख गणेश बाकले व मुकुंद शिंदे व रयत सेवाभावी संस्थेचे संचालक प्रा.इरवंत सुर्यकार,राजू बोरगावकर यांनी केले आहे. सहभागी व्यक्तीना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. कार्यक्रमाची सांगता महा एनजीओचे शशांक ओंबासे यांच्या पसायदानाने होणार आहे.