तरच पैनगंगा नदीकाठावरील गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल
हिमायतनगर| विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवर साखळी पद्धतीने उच्च प्रतीचे बंधारे उभारून हदगाव, हिमायतनगर, उमरखेड तालुक्यातील शेकडो गावातील पिण्याच्या पाण्याचा कायम स्वरूपी प्रश्न सोडवावा. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी शासनाने तातडीने बंधारे उभारण्याला सुरुवात करावी. यासाठी सत्ताधारी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा अशी रास्त मागणी नदीकाठावरील शेतकरी व गावकऱ्यातून केली जात आहे.
मागील अनेक वर्षांपासून कमी - अधिक पावसामुळे पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले शेकडो गावातील पिण्याच्या व सिंचनाचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दसरा संपताच म्हणजे सप्टेंबर महिन्यात पैनगंगा नदीचे पात्र कोरडेठाक पडते. त्यामुळं भर उन्हाळ्यात नदीकाठावरील गावकर्यांना सिंचनासह पिण्याच्या प्रश्न गंभीर बनून पशु पक्षांना सुद्धा थेम्ब थेम्ब पाण्यस्तही तडफडावे लागते आहे. तर पावसाळ्यात पडलेले मुसळधार पाणी बंधारे बांधले गेले नसल्यामुळे पूर्णपणे वाहून जाते आणि नदीकाठावरील गावकर्यांना पावसाळ्यात नुकसानीचा सामना करावा लागतो हे वास्तव आहे. पावसाळा संपला की पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. या परिस्थितीचा सामना विदर्भ - मराठवाड्यातील नदीकाठावरील जनतेला सतत सहन करावा लागतो आहे. आजपर्यंत या भागात अनेक खासदार, आमदार झाले मात्र एकानेही सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न केले नाही. त्यामुळे या भागातील जनता पाण्याच्या समस्येपासून होरपळून निघते आहे.
या प्रश्नावर लवकर लवकर उपाययोजना करण्यात यावे म्हणून शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांनी तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तसेच पैनगंगा नदीच्या पात्रात नदीकाठावरील शेकडो गावच्या लोकांनी १५ दिवस पाण्यासाठी उपोषण करून नदीवर बंधारे उभारावेत आणि इसापूरचे पाणी सोडण्यात यावे यासाठी प्रयत्न केले. नदीकाठावरील जनतेला पाणी मिळाले मात्र जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इसापूर धरणापासून - तेलंगणा राज्याकडे जाणाऱ्या पैनगंगेच्या पात्रात साखळी पद्धतीने २० कि.मी. अंतरावर पांगरा, हदगाव तालुक्यात ४६ कि.मी.अंतरावर असलेल्या गोजेगाव येथे, ६८ कि.मी. अंतरावर असलेल्या बनचिंचोली येथे, हिमायतनगर तालुक्यात १०० कि.मी.अंतरावर घारापूर या ठिकाणी उच्च प्रतीचे बंधारे उभारण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. मात्र यावर अंमलबजावणी झाली नसल्याने कायमस्वरूपी जलस्रोतांचा प्रश्न अद्यापही भेडसावत आहे.
या प्रस्तावास जलसंपदा विभागाच्या वतीने मान्यता मिळाली असल्याचे समजते, मंजुरी मिळून बंधारे उभारल्या गेले तर पैनगंगा नदीच्या तीरावर वसलेले शेकडो गावातील लोकांचा पिण्याचा व हजारो हेक्टर क्षेत्रवरील जमिन सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा अनुशेष कायमस्वरूपी भरून निघेल. साखळी पद्धतीने बंधारे असल्यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी बंधाऱ्यात साचून नदीत पाण्याची पातळी वाढेल व बारमाही पाणीसाठा उपलब्ध राहणार आहे. यामुळे पैनगंगा नदी काठावरील शेकडो गावातील हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन त्याचा फायदा हदगाव, उमरखेड, हिमायतनगर तालुक्यातील शेकडो गावातील नागरिक व शेतकऱ्यांना होईल. तसेच नदीकाठावरील गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल. यासाठी विदर्भ - मराठवाड्यातील आमदार खासदारांनी लक्ष देऊन सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत नदीकाठावरील गावकरी बोलून दाखवीत आहेत.