नांदेड| येथील गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड संस्थेतील कर्मचाऱ्यांचा चालू महिन्याचा पगार अद्यापही देण्यात आला नसून कोरोना काळाची गंभीरता पाहता त्वरित पगार देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता स. लखनसिंघ लांगरी यांनी गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. वरील निवेदनाची प्रत मा. जिल्हाधिकारी साहेब आणि गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक यांनाही सादर करण्यात आल्या आहेत.
प्रस्तुत निवेदनात स. लखनसिंघ लांगरी यांनी कोरोना संक्रमण काळात उद्भवलेल्या परिस्थितीची जाणीव करून देतांना गुरुद्वारा बोर्ड अध्यक्ष यांच्याकडे विनंती केली आहे की, गुरुद्वारा बोर्ड कर्मचाऱ्यांचा पगार यंदा वेळेवर न झाल्यामुळे त्यांना असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक कर्मचाऱ्यांचे बँक लोन, खासगी लोन, घरभाडे, वीमा इत्यादि प्रलंबित आहेत.
या शिवाय दवाखान्यातील उपचार आणि वैद्यकीय खर्चासाठी सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेव्हा गुरुद्वारा बोर्डात कार्यरत स्थायी, अस्थायी आणि इतर श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे वेतन त्वरित देण्यात यावेत असे नमूद करण्यात आले आहे. गुरुद्वारा बोर्डात जवळपास दीड हजार कर्मचारी कार्यरत आहेत.