ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे कॅन्सरग्रस्तांना चांगली सुविधा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर (नृसिंह न्यूज नेटवर्क) कॅन्सरवर आज अनेक आधुनिक उपचार उपलब्ध आहेत. त्याद्वारे कोणत्याही टप्प्यातील कॅन्सर बरा केला जाऊ शकतो. त्यामुळे कॅन्सर रुग्णांनी निराश होऊ नये, असे सांगून कॅन्सरवरील उपचारासाठी जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान कोल्हापूरमध्ये आणल्याबद्दल मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी ॲपल सरस्वती हॉस्पिटलचे अभिनंदन केले. ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोणीही कॅन्सरग्रस्त उपचारापासून वंचित राहणार नाही. असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ देऊन गरीबातील गरीबालाही उपचार देऊन कॅन्सरमुक्त करावे. असे अवाहन केले.

कोल्हापुरातील नामांकित ॲपल हॉस्पिटलतर्फे सुरु करण्यात आलेल्या ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट या अत्याधुनिक कॅन्सर इन्स्टिट्यूटचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, दै. पुढारीचे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शौमिका महाडिक, खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, ॲपल हॉस्पिटलचे चेअरमन व कार्यकारी संचालक डॉ. अशोक भुपाळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त कॅन्सर रुग्णांची संख्या असून अत्याधुनिक उपचार करणाऱ्या इन्स्टिट्यूटची संख्या कमी आहे. टाटा हॉस्पिटलमध्ये देश विदेशातून येणाऱ्या रुग्णांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. अनेक राज्यांना कॅन्सरवरील उपचारासाठी मुंबईत येणाऱ्या त्यांच्या रुग्णांच्या निवासाच्या सुविधेसाठी भवन बांधण्यासाठी विशेषत: नवी मुंबईमध्ये जागाही उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तरीही रुग्णांच्या सुविधांसाठी जागा कमी पडत आहे. यासाठी महाराष्ट्रात किमान 20 ठिकणी कन्सरवर अत्याधुनिक उपचार उपलब्ध असले पाहिजेत. ॲपल हॉस्पिटलतर्फे अत्याधुनिक ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट सुरु केल्याबद्दल डॉ. भुपाळी यांचे अभिनंदन करुन त्यांना अनेक रुग्ण दुवा देतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. या इन्स्टिट्यूटमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोणतीही व्यक्ती उपचारापासून वंचित राहणार नाही. असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ देऊन गरीबातील गरीबालाही उपचार देऊन कॅन्सरमुक्त करावे. असे अवाहन केले.  

कॅन्सरवरील उपचारांसाठीच्या यंत्रणांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागते असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गरीबातील गरीब रुग्णालाही उपचार उपलब्ध झाले पाहिजेत यासाठी महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जे रुग्ण कोणत्याही योजनेत बसत नाहीत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. यातून गतवर्षी 28 हजार रुग्णांवर अत्यंत दुर्धर आजारावरील शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मुंबई, नागपूर नंतर राज्यातील तिसरे अत्यंत प्रगत रेडिएशन मशिन कोल्हापूर येथे उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी ॲपल हॉस्पिटलचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी स्वत:ही या आजाराला सामोरे गेलो असून  त्यावेळी झालेली मनस्थितीही विषद केली. आज विज्ञान-तंत्रज्ञान अत्यंत प्रगत झाले असून आधुनिक उपचार या आजारावर उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांनी धीर धरुन खंबीर रहावे असे सांगितले. 

यावेळी डॉ. भुपाळी यांनी मेक इन कोल्हापूर, मेक हॉस्पिटल इन कोल्हापूर हे तत्व पाळत असल्याचे सांगून ग्रामीण भागातील जनतेला अत्याधुनिक आरोग्य सेवा देण्याचा कसोशीने प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. कॅन्सरवरील उपचार पध्दती अत्यंत खर्चिक असून ॲपल हॉस्पिटलमध्ये जगातील अत्यंत अधुनिक उपकरणे उपचारासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या तंत्रज्ञानाने अचूक निदान करुन जलद उपचार देता येतात. वीस खाटांचे हे या भागातील अत्यंत अधुनिक असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये पूर्णत: मोफत उपचार उपलब्ध करुन देण्यात आल्याचेही यावेळी सांगितले. शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सर्व प्रकारच्या कॅन्सरवरील उपचार पूर्णत: मोफत होणार आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. भुपाळी यांनी केले, तर आभार डॉ. गिरीष प्रधान यांनी मानले. यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी