मुंबई (नृसिंह न्यूज नेटवर्क) राज्यात शिक्षण, अन्न प्रक्रिया उद्योग, वस्त्रोद्योग तसेच संरक्षणासाठी लागणाऱ्या उद्योगांमध्ये हंगेरीने गुंतवणूक करण्यास पुढे यावे, राज्यात सध्या गुंतवणुकीसाठी तसेच उद्योग उभारणीसाठी पोषक वातावरण असल्याने दोन्ही देशांमधील औद्योगिक वाढीला चालना मिळेल, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे सांगितले.
एस.एम.ई. चेंबर ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र इंडस्ट्रियल ॲण्ड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असोसिएशन आणि युरोप – इंडिया एस.एम.ई. बिझनेस कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इंडिया-हंगेरी बिझनेस समिट’ या कार्यक्रमात ते बोलत होते. उद्योगमंत्री श्री. देसाई म्हणाले, भारत हा देश आता स्वयंपूर्णतेकडे जातो आहे. अनेक क्षेत्रात तो बऱ्याच देशांच्या पुढे गेला आहे. रॉकेट सायन्स, सॅटेलाईट, मिसाईल यासारख्या क्षेत्रातही भारताची कामगिरी उल्लेखनीय आहे. माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय युवकांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. औषध निर्माण क्षेत्रात भारताने पथदर्शी काम केले आहे. भारतातील औषधांना जागतिक स्तरावर मागणी आहे. देशाच्या (जीडीपी) प्रगतीमध्ये राज्याचा 15 टक्के वाटा आहे. देशातील 30 टक्के औद्योगिक क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. देशातून होणाऱ्या निर्यातीपैकी 35 टक्के पर्यंतच्या किंमतीच्या वस्तूंची निर्यात महाराष्ट्रातून होते. गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदार महाराष्ट्रालाच पसंती देत आहे. सुमारे 490 मोठ्या उद्योगांनी राज्यात उद्योग उभारणीस सुरूवात केली आहे.
राज्यात असलेल्या उत्कृष्ट पायाभूत सुविधा, जागेची उपलब्धता, वीज, पाणी याची मुबलकता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुशल मनुष्यबळ यामुळे राज्यात कोणताही व्यवसाय वाढीसाठीचे पोषक वातावरण आहे. हंगेरीतील उद्योग क्षेत्राने लाईफ सायन्स, वैद्यकीय उपकरणे, अन्न व अन्नप्रक्रिया, औषध निर्माण त्याचप्रमाणे डिफेन्स क्षेत्रात त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानासह आर्थिक गुंतवणूक केल्यास राज्य शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासनही उद्योगमंत्री श्री. देसाई यांनी दिले. हंगेरी कॉन्सुलेट जनरल डॉ. रेवे वॅरी नॉरबर्ट यांनी यावेळी बोलताना सांगितले, तीन वर्षांपूर्वी कॉन्सुलेटची स्थापना करण्यात आली. हंगेरीसाठी महाराष्ट्रातून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. गेल्या वर्षभरात सुमारे दहा हजार विसा हंगेरीसाठी काढण्यात आले आहे. युरोपमध्ये उद्योग सुरु करण्यासाठी हंगेरी हे गेट वे ठरले आहे. तेथे असलेले उद्योगासाठी पोषक वातावरण आणि सुटसुटीत करप्रणालीमुळे भारतीय उद्योजक आकर्षित होत आहे. शिक्षण क्षेत्रातही भारतीय विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करुन देण्यासाठी सुमारे 200 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. या संधीचा भारतीय विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. भारतातील उद्योग क्षेत्रातील बदलाचे भागीदार होण्यासाठी हंगेरी उद्योग जगत तयार असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
यावेळी बोलताना एसएमई चेंबरचे श्री. साळुंखे यांनी हंगेरीतील उद्योजकांनी माहिती तंत्रज्ञान, आरोग्य आणि औषधी उद्योगात गुंतवणूक करावी तसेच स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम राबवावा असे सांगितले. भारतातील तरुण उद्योजक ज्यांना व्यवसाय वृध्दिंगत करायचा आहे त्यांच्या उद्योगातही हंगेरियन गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी, अशा सूचना केल्या. यावेळी हंगेरीचे कॉन्सुलेट जनरल डॉ. रेवे वॅरी नॉरबर्ट त्याचप्रमाणे हंगेरी चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे ॲड्रस रिव, सांस्कृतिक आणि वाणिज्यिक दूत ॲन्डस रेव, एस.एम.ई. चेंबर ऑफ हंगेरीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे आदी उपस्थित होते.