कोळी समाजाचे रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती होणार!

नवी दिल्ली, राष्ट्रपतीपदासाठी बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावावर एनडीएकडून आज शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्या नावाची घोषणा केली असून दि.२३ जून रोजी ते राष्ट्रपतीपदाचा अर्ज भरतील. दलित समाजातून येणाऱ्या कोविंद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन या समाजाला भाजपकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न मोदी-शहा जोडीने केला आहे. एनडीएच्या सर्व घटक पक्षांना कोविंद यांच्या उमेदवारीविषयी कळविण्यात आल्याचे अमित शाह यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून रामनाथ कोविंद यांनी बिहारच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
८ ऑगस्ट २०१५ रोजी त्यांची बिहारच्या राज्यपालपदी निवड करण्यात आली होती.  

रामनाथ कोविंद हे भारतीय जनता पक्षाच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष होते. माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे ते खाजगी सचिव होते. उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर त्यांची दोन वेळा निवड झाली होती. भारतीय जनता पक्षाचे ते राष्ट्रीय प्रवक्ते राहिले आहेत. पेशाने वकील असलेले रामनाथ कोविंद हे ऑल इंडिया कोळी समाजाचे अध्यक्ष राहिले आहेत. रामनाथ कोविंद यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील लखनऊ जिल्ह्यातील पारुंख हे आहे. १९७७ ते १९७९ दरम्यान त्यांनी भारत सरकारचे वकील म्हणून दिल्ली हायकोर्टात काम पहिले. १९७८ पासून त्यांनी सुप्रीम कोर्टातही वकील म्हणून काम करायला सुरुवात केली. १९९१ पासून ते राजकारणात सक्रीय आहेत. रामनाथ कोविंद यांनी १९९० मध्ये भाजपच्या तिकिटावर घाटमपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. रामनाथ कोविंद हे कॉमर्समधील पदवीधर असून कानपूर विद्यापीठातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली. समाजातील दलित, आदिवासी आणि मागास घटकांसाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. विद्यार्थीदशेपासूनच ते या चळवळीत ओढले गेले. आपल्या १२ वर्षाच्या खासदारकीच्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी कार्य केले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी