हिमायतनगर(अनिल मादसवार)कृषी प्रधान भारत देशात " बळीराजाचा बैलपोळा " हा सर्वात महत्वाचा सन आहे. या उत्सवाच्या पूर्व संध्येला येथील युवक शेतकर्यांनी जंगल परिसर पिंजून काढून पाच पानाचा देठवा आणून अन्नदात्याची खांदे मळणी केली. आणि बळीराजाला उद्याच्या जेवणाचे निमंत्रण दिले आहे. गेल्या महिन्याभरापासून पाऊस नसल्याने वाळू लागलेल्या पिकांची चिंता करत पोळ्याचा उत्सव साध्या पद्धतीने करण्याचे ठरविले आहे.
शेतात घाम गळून काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकर्यांसोबत खांद्याला खांदा लाऊन काम करणाऱ्या (ऋषभराजाचा) बैल पोळा उत्सव संबंध देशभरात आनंदात साजरा केला जाणार आहे. वर्षभर याच वृषभराज्याच्या खांद्यावर शेतीच्या मशागतीची जबाबदारी ठेऊन शेतीत पिके उगवली जातात. याच बळीराज्याच्या पोळा उत्सवाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनि बाजरपेठेत साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. परंतु उत्सवावर वाढत्या महागाईचे ढग असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले आहे. बैलांना सजविण्यासाठी लागणारे घुंगरमाळ, मोरके, कासारे, झुली, गोंडे, बेगडी, बाशिंग, वार्निश, नाडापुडी, नागेलीचे पान, चुना - गेरू, या सह अन्य साहित्याचे भाव गगनाला भिडले होते. यावर्षी खरीप हंगामाच्या पावसावर उगवलेली पिके पाण्याबावी वाळू लागेल्याने शेतकऱ्यांचा खिसा अजूनही रिकामाच आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून, त्याचा प्रभाव वृषभराजाच्या पोळा उत्सवावर झाला आहे. वाढती महागाई व आर्थिक टंचाईमुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांनी केवळ वार्निश घेऊन व घरदाराच्या दोन्ही बाजूने पळसाच्या मेंढ्या लाऊन, ग्रह लक्ष्मीच्या हाती अंगणात रांगोळ टाकून, पूजा - अर्चनेने पोळाउत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यावर भर दिला आहे.
उद्या दि.31रोजी भारत देशात पोळा साजरा होणार असून, या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील शहरातील उत्साही युवक शेतकरी विनोद काळे, सुभाष हेंद्रे, अशोक काळे या तिघांनी मंगळवारी अमावस्येच्या प्रारंभी संपूर्ण जंगल परिसर पिंजून काढला. आणि बळी राज्याच्या खांदे मळणीसाठी पाच पानाचा देठवा उपलब्ध केला आहे. याबाबत त्यांनी कि, मृगनक्षत्रानंतर येणाऱ्या वैशाख महिन्यातील जांभळ अमावास्येच्या दिवशी ज्या पळसाच्या झाडाची मूळ तोडली जाते. त्याच झाडाला पाच पानाचा देठावा लागतो, त्याचा उपयोग पोळ्याच्या पूर्व संद्येला वृषभराजाची खांदे मळणी करिता केला जातो. तत्पूर्वी वृषभ राजाला अंघोळ घालून सायंकाळी पळसाच्या देठव्याने हळदी - कुन्कुमार्जन करून बैलांना बाशिंग बांधले जातात. त्यानंतर ताट वाजवून आज आवताण...उद्या जेवला या हो... असे सांगून निमंत्रण दिले जाते. याप्रसंगी वृषभ राजाची मनोभावे पूजा - अर्चना करून मटकी, घुगऱ्या, आदींसह पंचा पक्वान्नाचे भोजन दिले जाते. त्यामुळे खांदे मळनीच्या दिवशी या पाच पानाच्या पळसाच्या देठ्व्याला विशेष महत्व प्राप्त आहे. म्हणूनच आम्ही एवढी मेहनत करून पाच पानाचा देठवा उपलब्ध केल्याचे बोलताना सांगितले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष पांडुरंग गाडगे, सचिव कानबा पोपलवार, रवी वाघमारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. www.nandednewslive.com