चुकीच्या ठिकाणी बंधारा उभारल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

जलशिवारच्या निकृष्ट व अर्धवट बंधाऱ्याने 
आवळला शेतकऱ्यांच्या कासरा 
हिमायतनगर (अनिल मादसवार) तालुक्यातील मौजे किरमगाव - टेभुर्नी शिवाराला जोडणाऱ्या कासार नाल्यावर गेल्या महिन्यात सुरू केलेल्या बंधाऱ्याचे काम गुत्तेदाराने अर्धवट ठेवून पलायन केले आहे. त्यामुळे तालुक्यात जलयुक्त शिवार कार्यक्रमाचा बोजवारा उडाला असून, पाण्याच्या प्रवाहाने बांध फुटून परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीतील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन बाळसे धरलेल्या पिकांच्या कुळवणीसाठी फिरणारा वखर बंद पडला असून, या नुकसानीची भरपाई देऊन बंधाऱ्याचे काम पूर्ण करून संबंधितांवर कार्यवाही करावी. अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करणार असल्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे.   

हिमायतनगर तालुक्यातील पाण्याची पातळी वाढावी यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने शासनाच्या महत्वकांक्षी जलयुक्त शिवार अभियानातून मौजे किरमगाव ते खडकी बा. नाल्याला जोडणाऱ्या कासार नावाच्या नाल्यावर लाखोंच्या निधीतून बंधारा उभारण्यात आला. परंतु संबंधित गुत्तेदार व अभियंता यांनी मिलीभगत करून नाल्याचे सरळीकरण न करता बंधाऱ्याचे काम केले. खरे पाहता नाल्यातून वाहणाऱ्या पाणी जाण्यासाठी नाल्याचे खोदकाम करून यातील झाडे - झुडपे तोडणे गरजेचे होते. तसेच परिसरातील शेतकर्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहमतीनुसार जास्तीत जास्त पाणी साठून जमिनीत मुरले पाहिजे यासाठी नाल्याच्या चढावर बंधारा उभारणे गरजेचे होते. परंतु संबंधित गुत्तेदार व अभियंत्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करून केवळ निधी लाटण्याच्या उद्देशाने नाल्याच्या वळणावर बंधारा बांधला. 


तसेच बंधाऱ्याचे काम दर्जेदार पद्धतीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे असताना काम अर्धवट ठेवले आहे. तेही काम अत्यंत निकृष्ठ पद्धतीचे व चुकीच्या ठिकाणी करण्यात आले असून, या दर्जाहीन कामामुळे पहिल्याच पावसात बांध फुटून पिकांसह जमीन खरडून गेली आहे. सदर बंधाऱ्याचे काम गुत्तेदार व अभियंत्यांनी स्वतः आणि आपल्या मर्जीतील एक शेतकऱ्याच्या फायद्यासाठी करून आम्हा शेतकऱ्यांचे नुकसान केल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे. तेंव्हा या कामाची चौकशी करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. आणि चुकीच्या ठिकाणी थातुर - माथूर पद्धतीने बंधारा उभारणाऱ्या गुत्तेदार व अभियंत्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी राधाबाई रावते, नामदेव उट्टलवाड, श्याम नारखेडे, खंडू दंतलवाड, गजानन राणे, नेव्हल साहेब, माधव माने यांच्यासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकांनी, लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.   

अन्यथा न्यायालयात धाव घेणार - नारखेडे

चुकीच्या व अर्धवट बंधाऱ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याची चौकशी करवून भरपाई द्यावी या मागणीचे निवेदन घेऊन लघु पाटबंधारे विभागाकडे गेलो. मात्र त्यांनी निवेदन घेण्यास नकार देऊन सगळे बंधारे असेच झाले, याच्याने काय होणार..? असे म्हणून आम्हाला बाहेर काढले. नुकसानीचा मोबदला मिळविण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करणार आहोत. यावरही न्याय न मिळाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचे शेतकरी श्याम नारखेडे यांनी प्रस्तुत बोलून दाखविले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी